सकारात्मकतेने कार्य केल्यानेच धर्मा चोडणकर यशस्वी : श्रीपाद

0
101
धर्मा चोडणकर यांच्या सत्कारानंतर त्यांच्यासमवेत पत्नी रजनी चोडणकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गुरमीत सिंग सोधी, आमदार विष्णू वाघ, ऍड. रमाकांत खलप, गुरुदास सावळ आदी. (छाया : किशोर नाईक)

धर्मा चोडणकर यांनी नेहमी सकारात्मक विचार करून प्रत्येक कार्य केले. म्हणून ते यशस्वी झाले असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल त्यांच्या षष्ठ्यपूर्ती सोहळ्यानिमित्त समारंभात बोलताना केले. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सहकार क्षेत्रात धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कामगिरी केलेल्या माजी आमदार चोडणकर यांना त्यांच्या हितचिंतकांतर्फे गौरव करण्यात आले. मिळालेल्या संधीचा चांगल्या कामासाठी उपयोग करून घ्यायचे ठरविल्याने कळत नकळत हातून चांगले कार्य घडले व समाजाने त्याची दखल घेतली याचा आनंद व्यक्त करून आपल्या षष्ठ्यद्बिपूर्ती सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना धर्मा चोडणकर यांनी सांगितले की मी सामाजिक कार्य करत करत साठी कधी गांठली हे कळलेच नाही. समाजाने माया, प्रेम सातत्याने दिले आणि बुर्जुगांनी मार्गदर्शन केले त्यामुळे इथवरचा प्रवास कळला नाही, असे ते म्हणाले. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, चांदीची गणेश मूर्ती धर्मा यांना सत्कारार्थ प्रदान करण्यात आली तर सत्कार समितीचे अध्यक्ष ऍड्. रमाकांत खलप यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. यावेळी विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रीय सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष पंजाबमधील आमदार राणा गुरुमित सिंग सोधी उपस्थित होते. व्यासपीठावर सत्कार समितीचे सचिव गुरुदास सावळ, धर्मा यांच्या पत्नी सौ. रजनी चोडणकर आदी मान्यवर उपस्थित होते. सुभाष जाण यांनी मानपत्राचे वाचन केले.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की प्रत्येक माणसाने स्वत:साठी न जगता समाजासाठी जगायला हवे तरच त्याचे जगणे सत्कारणी लागते. धर्मा यांनी असे जीवन जगून आदर्श निर्माण केला आहे. अर्थात सगळेच धर्मा यांच्याप्रमाणे नसतात. परंतु त्यांच्यासारख्या हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा लोकांमुळे समाजाची प्रगती होत असते. धर्मा यांनी नेहमी सकारात्मक विचार करून प्रत्येक कार्य केले म्हणून ते यशस्वी झाले. श्री. वाघ म्हणाले धर्मा यांची चिकाटी, उत्साह ३० वर्षांपूर्वी होता तो आजही टीकून आहे. १९९१ साली गोवा राजकीय परिवर्तनातून जात होता. तेव्हा ते मगो पक्षासाठी वेडे होऊन फिरत होते. सॉफ्टबॉलमध्ये राष्ट्रीय पातळीवर पाच गोमंतकीय खेळाडू नेण्याची कामगिरी करून त्यांनी दाखविली, असे त्यांनी सांगितले.