संशयास्पद पाकिस्तानी जहाज स्फोटांत उद्ध्वस्त

0
126
आगीत भस्मसात झालेले जहाज.

तटरक्षक दलाने अडवताच पेटवून दिले
पाकिस्तानातून भारताकडे निघालेल्या एका संशयास्पद जहाजाला गुजरातच्या किनार्‍यावर पोरबंदरजवळ भारतीय तटरक्षक दलाने रोखताच, जहाजावरील चौघांनी आत्मसमर्पण करण्याऐवजी जहाजच पेटवून दिल्याने पुन्हा एकवार भारतीय भूमीत ‘२६/११’ करण्याचा हा प्रयत्न नव्हता ना, असा संशय निर्माण झाला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.पोरबंदरजवळ भर समुद्रात भारताच्या दिशेने निघालेल्या एका पाकिस्तानी जहाजाबाबत संशय आल्याने तटरक्षक दलाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जहाज तसेच पुढे निघाल्याने जवळजवळ अर्धा तास त्याचा पाठलाग करण्यात आला. तरीही जहाज थांबवले न गेल्याने तटरक्षक दलाने त्यावर गोळीबार केला. तेव्हा जहाजावर मोठमोठे स्फोट होऊन ते भस्मसात झाले.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी अशाच एका पाकिस्तानी जहाजाचा वापर करण्यात आला होता. गुजरातजवळ आल्यावर त्या दहशतवाद्यांनी ‘कुबेर’ नामक ट्रॉलर पळवून नेऊन मुंबईच्या किनार्‍याला लावला होता.
नववर्षाच्या पूर्वसंध्येस कराचीच्या केटी बंदरावरून एक जहाज अरबी समुद्रातून निघाले असल्याची खबर भारतीय गुप्तचर यंत्रणेला लागली. त्यामुळे तटरक्षक दलाने जवळजवळ साडे तीन तास शोध घेऊन सदर संशयास्पद जहाज पोरबंदर किनार्‍यापासून जवळजवळ ३६५ मैलांवर असल्याचे शोधून काढले. त्यासाठी तटरक्षक दलाने आपल्या जहाजांचा व डॉर्नियर विमानांचा वापर केला. त्या भागात गस्त घालणार्‍या तटरक्षक दलाच्या एका जहाजाला त्या पाकिस्तानी जहाजाच्या दिशेने पाठवण्यात आले. तटरक्षक दलाच्या जहाजाने त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्याची गती वाढवण्यात आली. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या जहाजाच्या दिशेने गोळीबार करताच त्यावरील चौघेजण डेकवरून जहाजाच्या खालच्या भागात गेले. तेथून त्यांनी त्या जहाजात स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. जहाजावर मोठमोठे स्फोट झाले आणि आग लागली. या भीषण आगीत ते जहाज भस्मसात झालेच, शिवाय त्यावरील खलाशांचाही मागमूस उरला नाही. संरक्षण मंत्रालयाने काल यासंदर्भात एक निवेदन जारी करून या घटनेची माहिती दिली. सदर जहाजावर स्फोट झाले तेव्हा काळोख असल्याने व खराब हवामानामुळे त्या जहाजावरील कोणाला पकडता आले नाही असे त्यात म्हटले आहे. येत्या २६ जानेवारीस दिल्लीत होणार्‍या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहणार असल्याने दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून सर्वत्र अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेला या संशयास्पद जहाजाविषयी माहिती मिळू शकली.