संविधानातील पंचतत्त्वे आणि विकासासाठी पंचसूत्री

0
210
  • शंभू भाऊ बांदेकर

स्वतंत्र भारतातील समाजवादी लोकशाहीने आपल्याला बरेच काही दिले आहे, तरी अजूनही आपल्याला बरेच मिळवायचे आहे. काय, केव्हा, कसे मिळवायचे यावर प्रजासत्ताकाच्या निमित्ताने संबंधितांनी विचार करणे ही आज देशाची व देशवासियांची निकड होऊन बसली आहे.

आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पहिली कामगिरी सुरू झाली ती भारतीय संविधानाच्या रचनेची. स्वातंत्र्यानंतर तब्बल अडीच वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी आपल्याला स्वतंत्र राज्यघटना मिळाली आणि भारत खर्‍या अर्थाने ‘प्रजासत्ताक’ बनला. आपल्या राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे इतर अनेक देशांच्या राज्यघटनेचा विचार करून आपली राज्यघटना बनविण्यात आली, तरीही इतर देशांच्या राज्यघटनांची निर्मितीप्रक्रिया आणि आपल्या देशाच्या राज्यघटनेची निर्मितीप्रक्रिया यांच्यात खूप फरक आहे.
आपली राज्यघटना तयार व्हायला जरी अडीच-तीन वर्षांचा काल उलटला तरी अमेरिका व दक्षिण आफ्रिका तसेच कॅनडा या देशांच्या राज्यघटना तयार व्हायला अनुक्रमे चार महिने, एक वर्ष आणि दोन वर्षे लागली होती, तरी त्या देशांची राज्यघटना आपल्या देशांच्या तुलनेत लहान आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या राज्यघटना समितीची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली. त्या तारखेपासून विचार केला तर राज्यघटना पूर्ण व्हायला बरोबर २ वर्षे ११ महिने व १७ दिवस इतका कालावधी लागला. या काळात भारताच्या राज्यघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे अथक परिश्रम घेतले, त्याला तोड नाही. आपण एकदा लक्षपूर्वक या राज्यघटनेकडे पाहिले, तरी त्या दोघांच्या कार्यकर्तृत्वाची महानता आपल्या लक्षात यायला वेळ लागणार नाही.

राज्यघटनेचा विचार केला असता आपल्या लक्षात येते की, भारताने स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या पाच तत्त्वांना, या पाच मूल्यांना महत्त्व देणारी व सर्व जातीधर्माचा, गोरगरीब, श्रीमंत, सामान्य, अतिसामान्य जनांचा विचार करूनच राज्यघटनेला जन्म दिला आहे. अर्थात, घटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार, हक्क, कर्तव्ये प्राप्त करून दिली ही गोष्ट खरी असली तरी स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत येथील गरीबी, महागाई, जातीयता आपण नष्ट करू शकलो नाही. नष्ट करू शकलो नाही म्हणण्यापेक्षा आपण कमी तरी करू शकलो का, असा प्रश्‍न केला तर नाईलाजाने त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. यात वाढती लोकसंख्या हा महत्त्वाचा अडसर आहे, हे विसरून चालणार नाही.

देशात लोकशाही रुजली आणि ‘एक माणूस, एक मत’ हे तत्त्व स्वीकारून शासनपद्धतीच्या आधारे वाटचाल सुरू केली असली, तरी ही वाटचाल हवी तितकी सरल नाही, सोपी नाही हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एका बाजूने घटनेतील पाच मूल्यांचा आधार घेऊन येथे सर्वधर्मसमभाव नांदावा, भारताची लोकशाहीवादी राजकारणाची घडी नीट बसावी, येथील अर्थकारणाला बळकटी यावी, सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक व महत्त्वाच्या गरजा उपलब्ध व्हाव्यात असा विचारवंतांचा, समाजसेवकांचा, राज्यकर्त्यांचा विचार असतो यात शंका नाही; पण या सार्‍यांना अजूनही हवे तसे यश आलेले नाही, ही वस्तुस्थिती मान्य केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

एकीकडे देशाने जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने बघायची, त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करायची तर दुसर्‍या बाजूने आमच्या लोकशाहीला, आमच्या परराष्ट्र धोरणाला, आमच्या जागतिकीकरणाच्या प्रयत्नांत खो घालण्याचे काम करण्यास आमचे शेजारी शत्रू पाक आणि चीनने प्रयत्न करायचा. यामुळे आमची जी कुचंबणा होत आहे, ती शब्दातीत म्हणावी लागेल.

असे असले तरी गोमंतकीय सुपुत्र शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी घटनेच्या पाच तत्त्वांबरोबर देशाच्या विकासासाठी देश जगात बलवान व्हावा यासाठी जी पंचसूत्री सांगितली आहे, तिचा आपण गंभीरपणे विचार करून ती जाणीवपूर्वक अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर भारत स्वतः यशस्वी वाटचाल करू शकेलच, पण जगही आपल्याकडे नव्या आशेने पाहू शकेल, असे वाटते.

डॉ. माशेलकर म्हणतात, ‘आपल्याला एकीकडे जगाच्या शर्यतीत धावण्याचे आव्हान, तर दुसरीकडे प्रचंड मोठ्या लोकसंख्येला सोबत घेऊन पुढे जाण्याचे आव्हान आहे. लोकसंख्या आणि त्यातून निर्माण झालेल्या अन्य समस्या भीषण असून, मानवकेंद्रित विकासाचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. ही आव्हाने पेलण्यासाठी आपल्याला एका पंचसूत्रीचे पालन करावे लागेल. कोणती बरे ही पंचसूत्री? तर पहिले सूत्र म्हणजे विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, दुसरे स्त्रीकेंद्रित समाज, तिसरे मानवकेंद्रित विकास, चौथे ज्ञानकेंद्रित नागरीक आणि पाचवे नवसंकल्पनाकेंद्रित भारत.

आपल्याकडे असलेल्या अंतर्गत व बाहेरच्या डोंगराएवढ्या आव्हानांचा यामुळे आपण यशस्वीपणे मुकाबला करू शकू असा पूर्ण विश्‍वास या जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञाला वाटतो आहे. आपल्या देशाने व देशातील प्रत्येक राज्याने या पंचसूत्रीचा डोळसपणे अभ्यास केला पाहिजे. सोबतीला भारतीय संविधानातील पंचतत्वे आहेतच.
स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे, याचा आपण विसर पडू देता कामा नये. पण त्याचबरोबर देशापुढे अनेक आव्हानेही उभी ठाकली आहेत. देशाचे सार्वभौमत्व टिकविण्याचा जेव्हा प्रश्‍न येतो, तेव्हा आपण पक्षभेद, धर्मभेद विसरून एकत्र येतो, हा आपला इतिहास आहे. स्वतंत्र भारतातील समाजवादी लोकशाहीने आपल्याला बरेच काही दिले आहे, तरी अजूनही आपल्याला बरेच मिळवायचे आहे. काय, केव्हा, कसे मिळवायचे यावर प्रजासत्ताकाच्या निमित्ताने संबंधितांनी विचार करणे ही आज देशाची व देशवासियांची निकड होऊन बसली आहे.