संवाद साधा, प्रश्‍न सुटतील!

0
94

चिनार डायरीज्
परेश वासुदेव प्रभू

‘‘अल्ला हू अकबर ऽऽ’’ कुठल्याशा मशिदीमधून अजानचे सूर ऐकू येतात. मी घड्याळात पाहतो तर पहाटेचे साडेतीन वाजलेत. काही मिनिटांत अनेक मशिदींवरील लाऊडस्पीकरवर बांग उठते आणि बघता बघता एका कल्लोळात या सगळ्याचे रुपांतर होते. आपण श्रीनगरमध्ये आहोत याची जाणीव प्रकर्षाने होते. समोर दल सरोवराचाच एक भाग दिसतोय. ओळीने हाऊसबोटी उभ्या आहेत. उत्तरेत पाच वाजताच उजाडत असल्याने साडेतीन म्हणजे त्यांची पहाटच की! विशेष म्हणजे हा काश्मीरचा उन्हाळा असला तरी बाहेर छान पाऊस रिमझिमतोय. बाहेर पूर्ण शांतता आहे. नितांतसुंदर काश्मीरचे हे रुप सुखावणारे आहे. विशेषतः वृत्तवाहिन्यांवर सातत्याने दाखवल्या जाणार्‍या दृश्यांच्या पार्श्‍वभूमीवर तर खासच.
सगळेच शहर दगडङ्गेक करतेय हे चित्र पूर्णतः ङ्गसवे आहे. श्रीनगरमधले व्यवहार सुरळीत सुरू आहेत. कुठेही तणाव जाणवत नाही. ङ्गक्त येथे काही घडू शकते याची जाणीव जागी करतात ते सुरक्षा दलांचे बंकर आणि तेथून सर्वत्र नजर ठेवणारे जवान. काही मोहल्ले दगडङ्गेकीसाठी बदनाम आहेत, पण ते जुन्या श्रीनगरात. इतर भागांत माणसे आपल्या दिनक्रमात नेहमीसारखी व्यस्त आहेत. पर्यटकांची प्रतीक्षा करीत आहेत, कारण त्यावरच त्यांचे पोट आहे. काश्मीरप्रश्‍नाकडे खुद्द काश्मिरी लोकप्रतिनिधी कसे पाहतात याविषयी उत्सुकता होती. त्यामुळे आम्ही गाठले एका अशा नेत्याला जो सातत्याने जम्मू काश्मीर विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येतो आहे, तोही दहशतवादग्रस्त कुलगाम जिल्ह्यातून. हा आमदार सत्ताधारी पीडीपी वा भाजपचा नाही किंवा विरोधी नॅशनल कॉन्ङ्गरन्सचाही नाही. हा आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा काश्मीरमधील एकमेव आमदार, जो १९९६, २००२, २००८ आणि २०१४ असा सातत्याने निवडून आला आहे. तो निवडून येतो तो स्वतःच्या लोकप्रियतेवर. या नेत्याचे नाव आहे महंमद युसूङ्ग तारीगामी.
श्री. तारीगामी यांचे कडेकोट सुरक्षेतील, गुपकार रोड वरील निवासस्थान गाठले तेव्हा बाहेरची गर्दी त्यांच्या लोकप्रियतेचा दाखला देत होती, पण आम्हाला क्षणात् आत प्रवेश मिळाला.
तारीगामी यांनी काश्मीर प्रश्‍नाची आपल्या परीने मांडणी केली. हा प्रश्‍न निर्माण होण्यास आजवरच्या राजवटी जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. काश्मीरचे वेगळेपण, लोकांच्या आकांक्षा, काश्मीरची प्रकृती या लोकांना कळली नाही त्यातून काश्मीर प्रश्‍न बिकट बनल्याचे तारीगामी म्हणाले. भारत हा वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. हे वैविध्य त्याचे दुबळेपण नसून सामर्थ्य आहे, असेही त्यांनी नमूद केले. काश्मीरचे राजे हरिसिंग जेव्हा भारतात विलीन व्हायला राजी नव्हते तेव्हा लोक विलीन होण्यास उत्सुक होते. टोळीवाले आले नसते तर हरिसिंगांनी पाकिस्तानशीच समझोता केला असता असे सांगून तारिगामी म्हणाले, काश्मीर भारताला जोडले गेले, पण काश्मीरी जनतेला जोडण्याचा प्रयत्न झाला नाही. ज्या घटनात्मक तरतुदी केल्या गेल्या त्यांचे पालनही झाले नाही. ‘‘काश्मीर प्रश्‍न पाकिस्तानच्या क्षमतेमुळे बिकट बनलेला नसून तो भारताच्या अकार्यक्षमतेमुळे बिकट बनला आहे’’, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
आज परिस्थिती अधिकच बिघडलेली आहे. निधर्मवाद धोक्यात आहे. असहिष्णुता, लव्ह जिहाद, गोरक्षक अशा विषयांमुळे काश्मिरी युवकांवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. वृत्तवाहिन्या तर जणू काश्मीरशी लढायला उभ्या ठाकल्या आहेत. भारतीयांना काश्मीरींविषयी आपुलकी राहिलेली नाही असे आज काश्मिरींना वाटू लागल्याचे तारिगामी म्हणाले. आमच्या व्यथा वेदनांना तुमच्याठायी काहीच स्थान नाही? असा सवाल त्यांनी केला. राजकारणी स्वतःच्या अपयशाचे ओझे लष्कराच्या खांद्यावर ठेवीत असल्याचे तारिगामी म्हणाले. भारताने काश्मिरींशी जणू युद्ध छेडले आहे असे वातावरण आपल्या राज्यात असल्याचे ते म्हणाले. भारत सरकार एकवेळ काश्मीरी लोकांच्या विरोधात असू शकते, पण भारतीय जनतेने तरी असू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काश्मीर समस्येचे व्यवस्थापन आणि सोडवणूक या दोन्ही अंगांनी उपाययोजनांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या निवडणुकीत लोकांनी भरघोस मतदान केले होते, मग तीनच वर्षांत ही सध्याची वेळ का आली? असा सवाल मी तारिगामींना केला. याला स्थानिक राजवट जास्त जबाबदार नाही का? असे विचारताच सूचकपणे त्यांनी हे मान्य केले. पीडीपी व भाजप हे दोन ध्रुव आहेत. ते एकत्र येऊच शकत नाही असे आपण म्हटले होते ते खरे ठरल्याचे ते उत्तरले.
आजच काश्मिरात सार्वमत घेतले तर कौल भारताच्या बाजूने लागेल की पाकिस्तानच्या या प्रश्‍नावर आज काश्मिरी लोक प्रचंड रागावलेले आहेत. आग लागली आहे, अशावेळी काहीही कौल येऊ शकतो असे तारिगामी उत्तरले. अशी आग लागते तेव्हा मुलगाही बापाला बाप म्हणत नसतो असे सूचक विधानही त्यांनी केले.
काश्मीर प्रश्‍नावर उपाय काय या माझ्या प्रश्‍नावर संवाद हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. संवाद कोणाशी झाला पाहिजे असे विचारता पाकिस्तानसह सर्व घटकांशी असे ते उत्तरले. वाजपेयींनी सुरुवात केली होती, मनमोहनसिंगांनी ती पुढे नेली, पण पुढे काहीच घडले नाही अशी तीव्र खंत युसूङ्ग तारिगामींनी व्यक्त केली. ‘‘कश्मिरियोंके साथ मजाक मत करो’’ असे उद्गार त्यांनी विद्यमान मोदी राजवटीला उद्देशून काढले. काश्मीर समस्येचे सर्वांशी संवाद हेच उत्तर आहे आणि त्यासाठी ‘बडा दिल चाहिए’ असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. अटलबिहारी वाजपेयींनी याच श्रीनगरच्या लाल चौकात ‘घटनात्मक चौकटीतच संवाद साधणार ना?’ या पत्रकारांच्या प्रश्‍नावर ‘इन्सानियत के दायरे में’ असे उत्तर दिले होते त्याची आठवण त्यांनी करून दिली. काश्मीर समस्या ही ‘‘मेहबुबा के कदसे बडी हैं’’ असे उद्गारही तारिगामींनी काढले.
सरकारने संवादाची दारे बंद केलेली असली तरी भारतीय जनतेवर आपला अजूनही विश्‍वास आहे. काश्मिरी जनतेला वार्‍यावर सोडू नका, संवाद साधा, प्रश्‍न सुटतील असे आवाहन त्यांनी केले. समाजाने त्यासाठी अधिक सक्रिय व्हायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यातून सातत्याने निवडून येणार्‍या या अनुभवी नेत्याचे म्हणणे चुकीचे कसे म्हणावे?