संवादाचा वाद

0
83

आजचा शिक्षक दिन ‘गुरू उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा फतवा मोदी सरकारने काढला आहे. ते स्वतः आज देशभरातील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांचे ते भाषण देशातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश जारी झाले आहेत. हे भाषण प्रक्षेपित करण्यासाठी दूरचित्रवाणी संच, इंटरनेटची व्यवस्था मुख्याध्यापकांनी करावी, शालेय विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी असले, तरी त्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी दुपारी होणार्‍या या थेट प्रक्षेपणाला उपस्थिती लावावी वगैरे निर्देश शिक्षण खात्याने शाळांना दिलेले आहेत. पंतप्रधानांचे भाषण ऐकण्याची अशा प्रकारची सक्ती देशात पहिल्यांदाच झाली आहे. मोदी आणि विद्यार्थी यांचा हा संवाद ऐच्छिक असता, तर त्याला कोणाचा आक्षेप नसता, परंतु ज्या प्रकारे घिसाडघाईने आणि जबरदस्तीने हे भाषण या विद्यार्थ्यांना ऐकवले जात आहे, तो प्रकार आक्षेपार्ह आहे. मोदी हे काही उत्तम वक्ते म्हणता येणार नाहीत. वाजपेयींच्या भाषणातील माधुर्य आणि परिणामकारकता मोदींच्या भाषणात नाही. त्यामुळे या भाषणातून विद्यार्थ्यांची जीवनदृष्टीच बदलून जाईल अशा प्रकारचा काही हा संवाद असेल अशी अपेक्षा बाळगता येत नाही. त्यामुळे या सार्‍या खटाटोपातून साध्य काय होणार हा खरा प्रश्न आहे. या संवादाच्या निमित्ताने या देशातील लक्षावधी शाळांमधील दुःस्थितीचे जे विदारक दर्शन घडणार आहे, त्याची दखल मोदी घेणार असतील तर या सार्‍या उपक्रमाचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल. देशातील असंख्य शाळांना वीजपुरवठा नाही. कुठल्या तरी कुबट – कोंदट जागेमध्ये वर्ग भरतात, दाटीवाटीने मुले वर्गात बसतात, अनेक शाळांत मुलांना बाकही नाहीत. शिक्षकांचा दर्जा यथातथाच आहे. प्रयोगशाळा, संगणक कक्ष यांचा तर अनेक शाळांत मागमूसही नाही. या परिस्थितीत देशात शाळा चालतात, गोरगरिबांची मुले ‘शिकतात’! ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधाही नाहीत, अशा शाळांमध्ये झालेली ही भाषणसक्ती हा विनोदच म्हणायला हवा. कोणतेही नेतृत्व हे उत्स्फूर्तपणे उमलावे लागते. ते असे लादता येत नाही. गांधीजींसारखा दुसरा नेता या देशात झाला नाही. गांधीजींचा एकेक शब्द कानात साठवण्यासाठी लाखो भारतीय आतुर असत. तेव्हा तर वर्तमानपत्रे वगळता दुसरी माध्यमेही नव्हती. तरीही गांधीजींचा शब्द लाखो भारतीयांनी प्रमाण मानला, कारण गांधीजींचे आचार आणि विचार यामध्ये अंतर नव्हते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्या सदाचारी वृत्तीचे दर्शन घडत असे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाख चुका केल्या असतील, परंतु या देशातील बाळगोपाळांशी त्यांनी आपल्या सहजस्फुर्त वागण्या-बोलण्यातून प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित केले होते. नेतृत्व हे असे सहजपणे उमलत असते. ते लादता येत नाही. मोदींच्या भाषणासाठी देशातील लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याच्या या प्रयत्नाचा त्यांच्या बालमनावर उलटा परिणामच अधिक होईल. जो गुरू उत्सव साजरा करण्याचा आग्रह सरकार धरीत आहे, त्या गुरूंची आणि त्यांच्या अध्यापनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असते, तर तो अधिक समर्पक ठरला असता. भुकेल्या पोटी उत्सव साजरे होत नसतात. उत्सव तेव्हाच साजरा होईल जेव्हा या देशातील लाखो शाळांमधील कोट्यवधी मुलांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध होईल. त्यांच्या शाळांमध्ये मूलभूत साधनसुविधा उपलब्ध होतील, गरीबांच्या शाळा हे एक टोक आणि उच्चभ्रूंच्या शाळा हे दुसरे टोक ही आजची विदारक परिस्थिती असणार नाही. या देशाला भाषणांपेक्षा कृतीची गरज आहे. देशाने भाषणे खूप ऐकली. मोदींची तर गेल्या निवडणुकीत खूप भाषणे ऐकली. आता कृतीची वेळ आली आहे. सरकारचे सुकाणू हाती घेतल्यापासून त्यांनी संकल्प पूर्तीच्या दिशेने पावले टाकायला सुरूवातही केली आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यामागचा त्यांचा हेतू जरी चांगला असला, तरी त्याचे फलित काय हा प्रश्नही उरतोच. त्यांनी आधी या देशातील गोरगरिबांच्या मुलांना शालेय सुविधा पुरवाव्यात. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावावा आणि मग केलेल्या कर्तृत्वाचे डिंडिम जरूर वाजवावेत. उक्तीपेक्षा कृतीने घालून दिलेला आदर्श हा अधिक प्रभावी आणि परिणामकारक असतो. विद्यार्थ्यांना तो अधिक भावेल!