संरक्षणाची नवी दिशा

0
146

ह्या नववर्षाच्या प्रारंभीच भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन घटना घडल्या. भारताचे २८ वे लष्करप्रमुख म्हणून एक मराठी सेनानी एम. एम. नरवणे यांनी आपल्या पदाचा ताबा घेतला, तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या नवनिर्मित पदावर माजी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत विराजमान झाले. या दोन्ही घटनांना महत्त्व आहे, कारण त्यातून संरक्षणक्षेत्रासंदर्भातील भारताच्या बदलत्या प्राधान्यांचे संकेतही जगाला मिळाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद आपण नव्याने निर्माण करून लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमध्ये एकवाक्यता आणि समन्वय राहावा याची तरतूद विद्यमान सरकारने केली. आजच्या काळातील आव्हाने विचारात घेता अशा प्रकारच्या एकत्रीकरणाची नितांत आवश्यकता निश्‍चित होती. या तिन्ही सेनादलांमध्ये नाही म्हटले तरी एकमेकांविषयी सुप्त असूया आणि स्पर्धा कायम असायची. लष्कर स्वतःला सैन्यदलांचे सर्वांत महत्त्वाचे अंग मानायचे. नौदल आणि हवाई दलांना आपल्या सामर्थ्याचा अभिमान असायचा. आपल्या देशात खोलवर रुजून गेलेल्या अत्यंत सुदृढ लोकशाही व्यवस्थेमुळे या सैन्यदलांना राजकीय नेतृत्वाविरुद्ध दंड थोपटण्याची वेळ कधी आली नाही आणि वावही मिळाला नाही, परंतु एकमेकांशी त्यांची स्पर्धा मात्र अनेकदा दिसून येत असे. त्यामुळे सीडीएसच्या निर्मितीनंतर ही सुप्त स्पर्धा थांबणार आहे. बिपीन रावत हे स्वतः लष्करामधून जरी आलेले असले तरी आपले पद हे निष्पक्ष राहील याची ग्वाही त्यांनी पदभार स्वीकारताच दिली आहे. एक अधिक एक अधिक एक याचे उत्तर गणितात जरी तीन असले तरी ही तिन्ही सेनादले एकत्र येतात तेव्हा त्यातून मिळणारे उत्तर कैक पटींनी अधिक असते असे ते म्हणाले ते सार्थ आहे. भारताचे नवे लष्करप्रमुख नरवणे यांनी देखील आपल्या बदलत्या प्राधान्याचे सूतोवाच पदभार स्वीकारताच केले आहे. आजवर भारत आपल्या पश्‍चिमी सीमेला खूप महत्त्व देत आला, परंतु उत्तर आणि ईशान्य सीमेला यापुढे तेवढेच महत्त्व आपली सेना देईल आणि त्यादृष्टीने व्यूहरचना करील असे नरवणे म्हणाले त्याचा संकेत अर्थातच चीनकडे आहे. पाकिस्तान त्याच्याविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आणि बालाकोटच्या धडक कारवाईनंतर बराच नरमला आहे. नियंत्रण रेषेवर त्याच्या कुरबुरी जरी अधूनमधून सुरू असल्या, तरीही भारत आता आपल्या कुरापती निमूट सहन करणार नाही, केवळ शाब्दिक इशारे देणार नाही, तर प्रत्युत्तराची कारवाई करू शकतो आणि तसे झाले तर आधीच डगमगलेल्या आपल्या आर्थिक स्थितीत स्वतःहून ओढवून घेतलेला तो आत्मघात ठरेल हे पाकिस्तानी लष्करशहांना निश्‍चितपणे उमगलेले आहे. त्यामुळे तेथील राजकीय आणि लष्करी नेतृत्व जरी आपल्या जनतेला खूश करण्यासाठी भारतविरोधी भावना धुमसत ठेवत असले, तरी प्रत्यक्षामध्ये भारताविरुद्ध पाऊल उचलण्यावेळी दहा वेळा विचार ते केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे पाकिस्तानपेक्षा आज भारताला खरा धोका चीनपासून आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे आर्थिक हितसंबंध आहेत आणि भारताविरोधात वापरण्याचे एक हुकुमी हत्यार म्हणून तो पाकिस्तानचा वापर आजवर करीत आला आहे हे तर खरेच आहे, परंतु चीन भारताच्या उत्तर व ईशान्येकडील सीमेपलीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून साधनसुविधांचा प्रचंड विकास करीत आलेला आहे. त्या तुलनेमध्ये आपण खूपच मागे आहोत. आजवर पाकिस्तानने पश्‍चिम सीमा धगधगत ठेवल्याने आजवरच्या लष्करप्रमुखांनी तिथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडेच लक्ष केंद्रित केले, त्यामुळे चीनला लगटून असलेल्या सीमेसंदर्भात जेव्हा जेव्हा विवाद उद्भवले, तेव्हाच आपल्याला या नव्या धोक्याची जाणीव झाली. परंतु चीनशी देखील भारताचा पूर्वापार चालत आलेला सीमावाद आहे आणि तो पाकिस्तानशी असलेल्या विवादाइतकाच जटील आहे. या सीमेवर शांतता प्रस्थापित करून सीमाविवाद सोडवण्याच्या दिशेने आम्ही पावले टाकू शकू असा विश्वासही नरवणेंनी व्यक्त केला आहे. उत्तर व ईशान्य सीमेवरील सैन्यदलांच्या संख्येत आणि सज्जतेत वाढ केली जाईल असे नरवणे यांनी स्पष्टपणे जाहीर केलेले आहे. याचाच अर्थ पाकिस्तानपेक्षा चीनला भारत आता अधिक गांभीर्याने घेऊ लागला आहे. पाकिस्तानशी झालेली आजवरची सगळी युद्धे आपण जिंकलो, परंतु चीनशी झालेल्या युद्धामध्ये भारताच्या सैन्यदलांची त्रेधा उडाली होती हा इतिहास आहे आणि तो विसरून चालणार नाही. दोन्ही देशांदरम्यानची सीमा ही तब्बल ३४०० किलोमीटर लांबीची आहे. त्याबाबत अनेक वादही आहेत आणि ते सोडवण्यासाठी बैठकांची कित्येक सत्रेही वेळोवेळी पार पडलेली आहेत, परंतु हे वाद सुटलेले नाहीत. चीनचे भारतीय भूमीवरील दावे कायम आहेत आणि सातत्याने भारताच्या भूभागावर मालकीचा दावा तो देश करीत आलेला आहे. त्यामुळे नव्या वर्षातील नवा भारत चीनलाही शिंगावर घेण्यास मागेपुढे पाहणार नाही हा इशाराच लष्करप्रमुखांनी नववर्षाच्या प्रारंभीच देऊन टाकला आहे!