संमेलनाध्यक्षपद जनमानसाच्या मानसातला अधिकार

0
101
dav

>> ‘अक्षर मानव’चे संस्थापक राजन खान यांचे मत

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा अधिकार हा जनमानसाच्या मानसातला अधिकार असतो. आजवर लेखक म्हणून माणूस म्हणून जे काम करत आलो, ‘अक्षर मानव’च्या विविध उपक्रमांनी माणसं एकमेकांशी जोडून देण्याचे प्रयत्न करत आलो, साहित्याच्या आणि समाजाच्या विकासाचे प्रयत्न करत आलो, त्या सर्व कामांना अध्यक्षपदाच्या अस्तित्वाचे बळ मिळेल. भूमिका मांडायला व्यापक जागा मिळेल. ती भूमिका सर्वदूर पोहोचायला या अध्यक्षपदाचा उपयोग होईल, असा विश्‍वास वाटतो म्हणून मी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहे असे नामवंत साहित्यिक, ‘अक्षर मानव’ चळवळीचे संस्थापक राजन खान यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मत मांडले.

राजन खान म्हणाले, मी काही भूमिका घेऊन अध्यक्षपदासाठी उभा आहे. माणूस लिहीला, माणसाचे दु:ख लिहीले. चळवळी केल्या, आंदोलनात भाग घेतला. शेतकरी, आदिवासी, दलितांच्या चळवळीत राबलो. समाजातल्या सर्वच्या सर्व घटकांना कवेत घेणारी ‘अक्षरमानव’ चळवळ सुरू केली. गावोगावी तिचे उपक्रम चालू आहेत. ‘अक्षर मानव’ची स्थायी स्वरूपाची नऊ केंद्रे सर्व मराठी मुलाखात उभी करतो आहोत. या केंद्रांवर भाषा, साहित्य, इतिहास, चित्रपट, नाटक, कला, पाणी, शेती, विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण असे सर्व उपक्रम घेतले जातील. एक दोन वर्षांत ही चळवळ गोव्यातही आणू.

लेखकाला लायकी सिद्ध करावी लागते या गोष्टीबद्दल खेद व्यक्त करून राजन खान यांनी सांगितले, की साहित्य संमेलनावर केलेला खर्च वाया जातो असे म्हणणे चुकीचे आहे. संमेलनाचा खर्च हा सत्कारणी लागतो. अखिल भारतीय मराठी साहित्य आपण म्हणतो तेव्हा तसा खर्चही अपेक्षित असतो. साहित्य संमेलनाच्या निधीत अफरातफर करता येत नाही. शिल्लक निधीचा उपयोग चांगल्या उपक्रमांसाठी केला जातो.

फेसबुक, व्हॉटस्‌ऍपद्वारे
वाचन संस्कृती वाढलीय
वाचन संस्कृती आधी होती आणि आता नष्ट झाली असे झालेले नाही. फेसबुक, व्हॉट्‌सऍपद्वारे वाचन संस्कृती उलट वाढलीच आहे, असे संबंधित प्रश्‍नावर स्पष्ट करून खान म्हणाले, ही माध्यमे संवादासाठी खूप चांगली आहेत. साहित्य व्यवहारातील कोपर्‍या कोपर्‍यांतील माणसेसुध्दा संमेलनाच्या अध्यक्षपदी पोहचली पाहिजेत. संमेलनातील वाद विचारमंथनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. ज्ञानेश्‍वर, तुकारामाची संस्कृती आपण सांगतो तर संमेलनात त्याचे दर्शन घडले पाहिजे असे मत खान यांनी व्यक्त केले. गेली तीस-बत्तीस वर्षे मी साहित्य संमेलनात कधी संपादकाच्या भूमिकेतून, पुस्तक विक्रेत्याच्या तर कधी वक्ता म्हणून फिरतो आहे. सर्व गटातटांना एकत्र आणून ‘माणसे जोडणे’ हा ‘अक्षर मानव’ चळवळीचा उद्देश आहे असे खान यांनी सांगितले. त्यांनी आपली भूमिका, मते यावेळी प्रभावीपणे मांडली.