संभ्रम पसरवू नये

0
148

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा एकेक टप्पा मागे पडत चालला आहे, तसतशी निकालांबाबतची उत्सुकता वाढते आहे. देशाचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी यंदाची ही लोकसभेची निवडणूक आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत काही अगदी मोजके अपवाद वगळता मतदान सुरळीतपणे पार पडले आहे. परंतु विरोधी पक्षांनी मात्र मतदानयंत्रांवरच शंका घेत विरोधाची राळ उडवून दिलेली दिसते आहे. जवळजवळ एकवीस विरोधी पक्षांनी मतदानयंत्रांद्वारे निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेविषयीच साशंकता निर्माण करून जनतेमध्ये नाहक संभ्रमाचे वातावरण तयार केलेले दिसते. निकालांची विश्वासार्हताच संपवण्याचा हा डाव आहे हे उघड आहे, परंतु अशाने आपण भारतीय लोकशाहीच्या ह्या महान उत्सवाला गालबोट लावतो आहोत याचे भान या मंडळींना उरलेले दिसत नाही. निवडणूक मतदानयंत्रे काही आजच वापरली जात आहेत असे नव्हे. गेल्या अनेक निवडणुकांतून त्यांचा वापर झाला. त्यांच्याविषयी शंका उपस्थित केल्या गेल्याने व्हीव्हीपॅटचा वापर झाला. मतदान केले की ज्याला कोणाला मत दिलेले असेल, त्यालाच मत दिल्याची खातरजमा मतदारांना तेथल्या तेथे करता यावी यासाठी ही पूरक तरतूद आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंद ही पावती व्हीव्हीपॅट यंत्रात प्रत्यक्ष दिसते आणि मग खाली पेटीत पडते. मतमोजणी करतानाच तिच्याबाबत काही शंका असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी व्हीव्हीपॅटच्या या पावत्यांची मोजणी करून निकालाला दुजोरा देता येणे त्यामुळे शक्य झाले आहे. परंतु उद्या उठ सूट जो तो व्हीव्हीपॅटच्या दुजोर्‍याची मागणी करू लागला तर निवडणुकांचे निकाल खोळंबतील हे निश्‍चित. मतदानाबाबत शंका असेल तर तिचे वेळीच निराकरण करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. असे शंकानिरसन होणे हे मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने महत्त्वाचे नक्कीच आहे, परंतु व्हीव्हीपॅटच्या या तरतुदीचा गैरवापर होता कामा नये आणि निकालांना विनाकारण उशीर करण्याचा प्रयत्न होता कामा नये. जेथे मतांचा फरक कमी असेल तेथे व्हीव्हीपॅटद्वारे दुजोरा जरूर दिला जावा, परंतु उगाच अकारण केवळ आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या निर्विवाद विजयाला गालबोट लावण्यासाठी जर विरोधी उमेदवारांकडून मतदानाच्या विश्वासार्हतेवरच शंका घेतली जाऊ लागली तर अशाने मतदार संभ्रमित होतील आणि त्यांचा मतदानावरचा जनतेचा विश्वास उडेल. हे लोकशाहीसाठी घातक ठरेल. गोव्यामध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी शंका घेतल्या गेल्या. शिवोली आणि कुंकळ्ळीतील मतदान केंद्रांवर मतदानात अडथळा आला.
एका विशिष्ट उमेदवारालाच व्हीव्हीपॅट मते पडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आणि मतदानादिवशीच ते तत्परतेने पणजीत येऊन धडकले. त्यांची जागरूकता कौतुकास्पद आहेच, परंतु या तक्रारीमध्ये सत्यता किती आणि झालेला गैरसमज किती याची शहानिशा होणे गरजेचे होते. निवडणूक आयोगाने त्यानुसार वेळीच चौकशी सुरू केली. कॉंग्रेसच्या तक्रारीवरून तेथील निरीक्षकांनी निवडणूक अधिकारी व उमेदवारांच्या उपस्थितीत ही चौकशी पार पाडली. व्हीव्हीपॅट यंत्रातून काही काळ कोर्‍या पावत्या पडत होत्या असे त्यात निष्पन्न झाले. उमेदवारांच्या चिन्हांऐवजी त्यावर अल्फा, बीटा, गामा अशा डमी चिन्हांचे मुद्रण होत होते. मतदानादिवशीच हा प्रकार ध्यानात येताच तात्काळ ते व्हीव्हीपॅट यंत्र बदलले गेले होते व त्यानंतर सुरळीत मतदान झाले. कुंकळ्ळीत एकाच उमेदवाराला मते जात असल्याचा दावा काहींनी केला. पहिल्या नमुना मतदानावेळी भाजप उमेदवाराला सतरा मते गेल्याचा दावा सोशल मीडियावरून केला गेला, परंतु तो खोडसाळपणाचा असल्याचे आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. या नमुना मतदानावेळी सतरा मते कॉंग्रेसला दिली गेली होती असेही त्यांच्या खुलाशात म्हटले आहे. गोव्यातील यावेेळची निवडणूक अटीतटीची आणि दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळे पडणार्‍या प्रत्येक मताबाबत अशी तीव्र स्पर्धा असणे स्वाभाविक आहे, परंतु म्हणून मतदानप्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयीच शंका घेणे चुकीचे ठरेल. राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. काही पक्षांचे समर्थक तर सातत्याने मतदानयंत्रेच कशी पक्षपाती आहेत असा अपप्रचार कोणत्याही पुराव्यांविना करीत सुटले आहेत. मतदारांना केवळ संभ्रमित करणे हाच त्यामागील उद्देश दिसतो. अशाने मतदान प्रक्रिया बळकट होईल की जनतेचा तिच्यावरील विश्वास उडेल याचा विचार या मंडळींनी करायला नको? आपल्याला जनसमर्थन का नाही? आपल्याला मतदारांनी का नाकारले आहे याचा विचार त्याऐवजी त्यांनी केला तर बरे होईल. विरोधात असताना मतदानयंत्रांबाबत शंका घ्यायची आणि सत्तेवर येताच समर्थन करायचे हा प्रकार गेली अनेक वर्षे चालला आहे. हे कोठेतरी थांबायला हवे. आपल्या पराभवाचे खापर मतदानयंत्रांवर का म्हणून टाकावे?