संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता

0
152
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारताविरुद्ध अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिली आहे. दुसरीकडे उत्तर कोरियालाही अण्वस्त्रांची खुमखुमी आलेली दिसते आहे. याचे परिणाम भयावह ठरू शकतात…

गॅलॅक्सी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या पाकिस्तान ऍटॉमिक एनर्जी कमिशनला संलग्न असलेल्या कंपनीने उत्तर कोरियाला इनकोनेल आणि मोनेल या युरेनियम एन्रिचमेन्टद्वारे आण्विक व रासायनिक हत्यारे बनवण्याच्या कामी येणार्‍या दोन ‘‘स्पेशलाइज्ड करोजन रेसिस्टन्ट निकेल अलॉय मेटल्स’चा नुकताच केलेला पुरवठा अमेरिकेच्या सेंट्रल इंटलिजन्स एजन्सीने उजेडात आणल्यामुळे चीनच्या अखत्यारीत स्थापन झालेल्या पोनग्यांग आणि इस्लामाबादमध्ये निर्माण झालेले अवैधानिक आण्विक संबंध भारत आणि अमेरिका दोघांसाठी गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत.
अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. त्यापाठोपाठ उत्तर कोरियाचे हुकुमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही ‘उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असून आता आम्ही अधिकाधिक आण्विक शस्त्रे निर्माण करणार आहोत ज्याचे बटन माझ्या टेबलावरच आहे’ अशी धमकी दिली आहे. या दोन्ही धमक्यांचे विश्‍लेषण अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच दिवशी पाकिस्तानला लष्करी मदत थांबवण्याच्या दिलेल्या इशार्‍याच्या आणि खरोखरीच थांबवलेल्या २८५ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी मदतीच्या संदर्भात केले असता यासंबंधीच्या चिंतेची व्याप्ती व गांभीर्य लक्षात येते.

याच्याच जोडीला पाकिस्तानमध्ये हाफिज सईद व मौलाना मसुद अजहरसारख्या आतंकवादी नेत्यांनी तेथील सरकारवर सर्व मुस्लीम देशांचे गठबंधन करुन अमेरिका व काफीर राष्ट्रांविरुद्ध जिहाद पुकारण्यासाठी दबाव टाकला आहे. या दबावाला मिळालेला सकारात्मक आंतरराष्ट्रीय मुस्लीम प्रतिसाद आणि पाकिस्तानने अमेरिकेला दिलेले उद्दाम उत्तर यांमुळे आगामी लढ्याचे स्वरुप स्पष्ट होते.

चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारु शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत ‘चिकन गेम’ आणि ‘गेम थियरी’ अंगिकारु शकतात.
संरक्षण क्षेत्रातील विश्‍लेषकांना चिकन गेम आणि गेम थिअरी या शब्दव्याप्तींची कल्पना आहे. चिकन गेममध्येे एकच गाडी जाऊ शकणार्‍या अरुंद पुलाकडे दोन चालक आपल्या गाड्या परस्परविरुद्ध दिशेने भरधाव नेत असतात; अशा वेळी पूल जवळ येत जातो तसा अन्योन्य विनाश (म्युच्युअल डिस्ट्रक्शन) अटळ होत जातो. अशा वेळी जो चालक थोडी देखील कच खातो तो दुसर्‍याला पुलावरुन जाण्याची संधी देतो. दोन्ही गाड्यांची टक्कर चालकांसाठी घातकच असली तरी प्रत्येक चालक शेवटपर्यंत दुसर्‍यावर कुरघोडीसाठी प्रयत्न करीत असल्यामुळे त्यांचा अहंकार, आत्मसन्मान आणि विश्‍वासपात्रता यांची सरशी झाली तरी प्राणहानी व संसाधनहानी अटळ असते.

घाबरुन कच खाणारा चालक चिकन माइंडेड (कोंबडीसारखा भित्रा) असतो. म्हणून याला चिकन गेम हे नाव आहे. गेम थियरीमध्ये खेळल्या जाणार्‍या सामरिक डावपेचांमुळे विविध युद्धप्रश्‍नांसंबंधी भिन्न/विविध स्तरीय उत्तरे मिळतात.
गेम थियरी आणि चिकन गेमच्या आधारे आण्विक युद्धाचा ‘वॉर गेम’ खेळत असतांना या प्रकारच्या युद्धातील सामरिक डावपेच आणि त्यांच्या संभाव्य भीषण परिणामांची कल्पना येते. आपापसांतील प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आण्विक युद्ध हा अवाजवी आणि अतार्किक पर्याय आहे. आजमितीला अमेरिका, उत्तर कोरिया, भारत आणि पाकिस्तान हे चौघे त्यांच्यातील अन्योन्य प्रश्‍न सोडवण्यासाठी आण्विक हत्यारे आणि गतिमान प्रणाल्यांच्या माध्यमातून मिळालेल्या अणुप्रतिबंध क्षमतेमुळे आण्विक युद्धाच्या वल्गना करताहेत.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तानने गैरआण्विक ते आण्विक देश ही मजल संभवत: स्वत:च्या अस्तित्वाची जपणूक आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी मारली आहे. अमेरिका व भारताकडून होणार्‍या संभाव्य धोक्यांना शह देण्यासाठी इराकवरील अमेरिकन आक्रमणानंतर उत्तर कोरियाने आणि भारताविरुद्ध छेडलेल्या प्रच्छन्न युद्धांचा फासा उलटल्यानंतर पाकिस्तानने प्रतिस्पर्ध्यावर सामरिक प्रतिबंध घालण्यासाठी आणि सरकार उलथवण्याच्या विचारांना आळा घालण्यासाठी अण्वस्त्रांची कास धरली. पाकिस्तानने उत्तर कोरियाला अण्वस्त्रांची गोपनीय माहिती दिली; तर उत्तर कोरियाने पाकिस्तानला ’न्युक्लियर फ्यूजन रिऍक्टर्स’ आणि क्षेपणास्त्रे दिली. आज हे दोघेही अमेरिका व भारत यांच्याशी युद्धासाठी तडफडत आहेत. तसे झाल्यास आम्ही त्याचा सर्वकष ताकदीनी मुकाबला करु अशा गर्जना करत आहेत.

अणुबॉम्बचा वापर झालेले युद्ध अनंत काळपर्यंत संपत नाही. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस हिरोशिमा व नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बनी अनुक्रमे १,४०,००० व ८१,००० लोक मारले गेले. मात्र त्यानंतर आण्विक अस्त्रांची मारक शक्ती प्रचंड वाढल्यामुळे अमेरिकन राष्ट्रपती जॉन केनेडींनी ‘‘आपण सर्व अतिशय तरल व नाजुक धाग्याला बांधलेल्या आण्विक तलवारीच्या धारेवर बसलो आहोत, जो केव्हाही अविचार अथवा वेडाच्या भरात तोडला जाऊ शकतो’ अशी ताकीद १९६२ मध्ये दिली होती. पण त्याला कोणी महत्त्व दिले नाही, कारण मानसशास्त्रानुसार, शोककाळात किंवा स्वअस्तित्व संपूर्णत: धोक्यात आल्यानंतर त्या संबंधातील कुठल्याही धोक्याला नाकारणे ही स्वाभाविक मानसिकता आहे. त्याला अनुसरुन किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष व राजनेते आण्विक युद्धाच्या धमक्या देताना राजकीय व सामरिक सुज्ञता, आण्विक युद्धातील स्फोट, अग्नीवर्षाव, प्रभावी उत्सर्जित किरण वर्षाव आणि फर्स्ट रिस्पांडर्स’ व संसाधनांची कमतरता याकडे संपूर्णत: दुर्लक्ष करतात.

३० टक्के आवक जावक असलेल्या कॅलिफोर्नियातील पोर्ट ऑफ लांग बीच या मोठ्या अमेरिकन बंदरावर कन्टेनर शिपच्या माध्यमातून आणून वापरलेल्या एक मेगाटन वजनाच्या अण्वस्त्रांनी होणार्‍या संंसाधनिक, नागरिक व आर्थिक हानीचे भवितव्य जाणून घेण्यासाठी रँड कॉर्पोरेशनने केलेल्या आगाऊ सामरिक अंदाज सर्वेक्षणामध्येे असे आढळून आले की अशा ग्राऊंड ब्लास्ट न्युक्लियर वेपनच्या स्फोटानंतर काही लाख लोक मृत्युमुखी पडतील. तसेच या स्फोटाच्या ’न्युक्लियर फॉलआऊट’मुळे भयंकर आर्थिक परिणामाच्या जोडीला शेकडो चौरस किलोमटर्सचे क्षेत्र कुठल्याही प्रकारच्या निवासासाठी अयोग्य घोषीत केले जाईल. बंदराजवळील सर्व तेलसाठे नष्ट झाल्यामुळे संपूर्ण वेस्ट कोस्टमध्येे तेलाचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवू लागून नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडेल. आण्विक स्फोटानंतरच्या वादळी आगीमुळे आणि आण्विक उत्सर्गामुळे सर्व संसाधनीय गोष्टींचा विद्ध्वंस तर होईलच; पण जागतिक जहाज वाहतूक बंद झाल्यामुळे तरल अमेरिकन आणि जागतिक आर्थिक व्यवस्था पार कोलमडून जाईल.

इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर प्रिव्हेंशन ऑफ न्युक्लियर वॉरच्या अहवालानुसार, एक मेगाटन अणुबॉम्बचा स्फोट होताच एक सेकंदात स्फोटाच्या ठिकाणी १२०० फुट त्रिज्येचा ३०० फूट खोल खड्डा पडतो आणि २५०० फुट त्रिज्येचा आगीचा लोळ निर्माण होतो. त्या आगीच्या लोळाच्या परतीचे तापमान आणि प्रकाश तेवढ्याच मोठ्या सूर्यक्षेत्रापेक्षा तीन पट जास्त असेल. ही आग तेथील जीवजिवाणू आणि संसाधनांना क्षणात भस्मसात करील आणि पुढील १२ सेकंदांमध्येे किमान पाच ते सहा किलोमिटर्स दूरपर्यंत झेपावून तेथील माणसांचा व संसाधनांचा ठिक्कर कोळसा करेल. किमान २५० किलोमीटर वेगाने वाहाणार्‍या गरम झोतांनी त्यांना भुईसपाट केले जाईल. त्यापुढच्या पाच किलोमीटरमधील कमान ४५ टक्के लोक तत्काळ मृत्युमुखी पडतील आणि उर्वरितांना झपाट्याने येणारा आगीचा लोळ आणि आण्विक ऊत्सर्गाचे शिकार व्हावे लागेल.

या स्फोटामुळे निर्माण झालेल्या ब्लास्ट अथवा शॉक वेव्हजमुळे ग्राऊंड झिरोपासून किमान २५ किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात वार्‍याच्या वेगाने उडणार्‍या मलब्यामुळे असंख्य जीवहानी व अमाप वित्तहानी होईल. किमान दोन लाखांपेक्षा जास्त आगी लागल्यामुळे आगीची वादळे निर्माण होऊन तापमान १५०० अंश सेल्सियसपर्यंत पोचेल. संपूर्ण पेयजल व्यवस्था व पाणीसाठा सुकून जाईल. खाद्यपदार्थ व खनीज तेल जळून जाईल आणि आरोग्य व्यवस्था, वीज पुरवठा ठप्प होईल. याच्याच जोडीला आण्विक उत्सर्गामुळे आगामी काही वर्षांसाठी ते क्षेत्र अणुबाधीत राहील. भारतातील मुंबई व चेन्नई, पाकिस्तानमधील कराची व पोर्ट कासीम आणि उत्तर कोरियातील चांगजिन व वांगसांग यासारखी बंदरे आणि इतर असंख्य महानगरे देखील रँड कॉर्पोरेशनच्या पोर्ट ऑफ लांग बीचवरील अहवालाच्या कसोटीवर तंतोतंत खरी उतरतात.

आजमितीला जगात किमान ३१,००० अण्वस्त्रे असून त्यांपैकी अमेरिका, रशिया व चीनकडे सर्वात जास्त म्हणजे १४ हजार अण्वस्रे आहेत. ब्रिटन, फ्रांस, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, इराण व इस्त्रायलकडे उरलेली अण्वस्त्रे आहेत. अमेरिका व रशियाकडे प्रत्येकी किमान ४५०० स्ट्रॅटॅजिक न्युक्लियर वॉर हेडस् ऑन हाय अलर्ट स्टेटस आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया किंवा भारत आणि पाकिस्तानमध्येे आण्विक युद्ध झाल्यास त्यामध्येे केवळ एकच अणुबॉम्ब टाकला जाईल, अशी आशा वेडेपणाची आहे. लॉंग बीचवरील अणुबॉम्ब एक मेगाटन शक्तीचा होता. आजमितीला अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचे अणुबॉम्ब तयार आहेत. ही अण्वस्त्रे केवळ काही मिनिटांमध्येे लॉंच होऊन त्याद्वारे शत्रूच्या सैनिकी, औद्योगिक, नागरिकी/सैनिकी/राजकीय/औद्योगिक नेतृत्त्व आणि आण्विक लक्ष्यांचा संपूर्ण विध्वंस करू शकतात. जगातील प्रत्येक माणूस, जीवित प्राणी, वनस्पती व संसाधनांना नष्ट करण्याची क्षमता या देशांमध्येे आहे.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तान दोघेही चीनची सामरिक संपत्ती आहेत. दोघांपाशी लांब दूरीची क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे अमेरिकेची थाड क्षेपणास्त्र प्रणाली, पॅट्रियॉट क्षेपणास्त्र, बी-१बी लॉंग रेंज बॉंबर्स आणि एफ १५/२५ जेटस् किंवा भारताचे ब्रम्होस/अग्नी क्षेपणास्त्र, एस ४०० क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली व मिराज/सुकॉय ३० विमानांमुळे त्यांची आण्विक समिकरणे बदलणार नाहीत. गेम थियरी आणि चिकन गेममध्येे उत्तर कोरिया व पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विश्‍वासार्ह्यतेबरोबरच असे आण्विक अविचार सर्वंकष युद्धामध्येे परिवर्तीत होण्याचे सांभव्य देखील पणाला लागते. जर त्यांनी आपल्या अण्वस्त्रांनी अमेरिका आणि भारतावर पहिला वार केला तर त्या दोघांचा संपूर्ण विनाश अटळ आहे. पण जर दोघांनीही पहिले अण्वस्त्र न वापरता पारंपारिक युद्धाचा निर्णय घेतला तर अमेरिका व भारताची संरक्षणदले उत्तर कोरिया व पाकिस्तानला दणक्या मार देतील. अमेरिका, उत्तर कोरिया, भारत व पाकिस्तानमधील बेनबाव सामरिक व राजकीय तणाव आणि सैनिकी उन्मादाऐवजी मुत्सद्देगिरीने सोडवायचा सल्ला रशियन राष्ट्रपती पुतीनने कोरियन क्षेपणास्त्र परिक्षण आणि पाकिस्तानी युद्धसंधी उल्लंघन संदर्भात दिला आहे. जर उत्तर कोरियन सर्वेसर्वा किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष कमर बाजवांना आपली सत्ता अबाधित राहावी असे वाटत असेल तर दोघेही युद्धाची कास न धरता आपली आण्विक अस्त्रे सुरक्षा प्रतिबंधासाठी वापरतील. नाही तर या आण्विक चिकन गेममध्ये हरणारा कोंबडा कोण हे येणारा काळच सांगेल.