संपली सुट्टी…

0
97

– पौर्णिमा केरकर

शाळा-कॉलेजमधून शिकविणार्‍या शिक्षकांनी स्वतः सतत प्रयोगशील राहायला हवे. त्याचे ते स्वतःसाठीचे नव्याने जगणे असते. असे ताजे टवटवीतपणाने जगण्याचे क्षण शिक्षकी पेशातच येतात कारण शिक्षकांचं नातं एकाच वेळी असंख्य संवेदनशील मनाशी जोडले जाते. 

तुझ्या यशापेक्षाही सर्व गुणदोषांसकट तू माझी… तू माझा आहेस… माझं तुमच्यावर प्रेम आहे… ही भावना वाढीस लावताना श्रमातून, ध्यासातून शिकणं होतं, यशाची पायरी गाठता येते असा स्वावलंबी विचार मुलांना या टप्प्यावर ज्ञानसमृद्ध करणारा ठरेल! जीवनाचे यश यातच सामावलेलं असेल.

मार्च महिन्यातील परीक्षा प्रकरण संपलं की वेध लागतात ते प्रदीर्घ सुट्टीचे. एरव्ही अशी मोठ्ठी सुट्टी लागली की आमच्या पिढीला मोकळा आनंद मिळायचा. रानोमाळ हिंडत रानमेवा शोधणं – गुराढोरांमागं उंडारणं – हातापायांना वळ येईपर्यंत अंगाला माती माखून घेत खेळणं हे नित्याचे उपद्व्याप होतेच, त्याच्या जोडीला नदी-नाले पोहण्यासाठी खुणवायचे. परीक्षेचा म्हणून काही वेगळा ताण असतो याची जाणिव काही ठराविक जणांना सोडली तर बाकीचे.. परीक्षा अगदी सहजपणानेच द्यायचे. त्यामुळे सुट्टीसाठीचा मोकळा वेळ हा खर्‍या अर्थाने ‘मोकळं होणं’ यासाठीच राखीव असायचा. आज झपाट्याने या परिस्थितीत झालेला बदल पाहता… पालकांनाच प्रश्‍न सतावू लागतात. एवढ्या मोठ्या सुट्टीत मुलांना सांभाळायचे कसे? एक तर मूलं रिकामी राहिल्यानंतर उंडारणार. नको ते उद्व्याप करणार.. प्रश्‍न विचारून भंडावून सोडणार नाहीतर मोबाईल – दूरदर्शन यांच्या सहवासात सगळा वेळ घालवणार. त्यातच भर म्हणून त्याने जमविलेल्या मित्रमंडळींचा ताण पुन्हा पालकांवरच असतो. अशा वेळी पाल्यांची सगळी सुट्टी कशी व्यस्त करण्यात येईल याचं वेळापत्रक करण्यात येतं आणि सुरू होतात वेगवेगळे वर्ग! परीक्षेनंतरचा एखाद दुसरा दिवस सैलावल्यासारखा जातो न जातो तोच पुनश्‍च वर्गवारी सुरू होते. अशी खूप मुलं असतील ज्यांना आतून वाटत असेल की परीक्षेच्या व्यापात आपलं एखादं चांगलं पुस्तक वाचायचं राहूनच गेलं. निसर्गाची भ्रमंती, गडकिल्ल्यांची सैर अनुभवणं, मनमुराद मुक्त फिरणं, नामवंत व्यक्तिमत्वाला भेटणं, एखाद-दुसरं स्थळ बघणं या सार्‍या गोष्टी मनातल्या. काही बोलून दाखवतील… काहींना आवडीचे काही करायला मिळेलही. असे असतानाही आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्याचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होण्यासाठी वाट ही पहावी लागतेच. आपल्याला हवे ते करायचे राहूनच गेले, सुट्टीत काहीच करता आले नाही – सुट्टी किती लवकर संपली?.. असे प्रश्‍न एखादी सल मनात ठेवूनच नवप्रवेशाचा उल्हास चेहर्‍यावर आळवीतच शाळा- कॉलेजच्या रिकाम्या भींती गजबजू लागतात.
दहावीतून अकरावीचा सुरू होणारा प्रवास मुलांना प्रगल्भतेच्या वळणावर घेऊन जाणारा – शालेय जीवन संपून नवीन वाटा चोखाळण्यासाठी निर्णयाची परिपक्वता येणारे हे दिवस… उत्साहाचे बळ देणारे, तारुण्याच्या उंबरठ्यावरचे हे संवेदनशील हळवे वय… व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वय. आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करील आणि आपण पुढे जाणार ही अपेक्षा न ठेवता पुढे जाण्यासाठीचे खंबीरपण आपल्या आत तयार करावं लागतं ते याच दिवसांत. नवीन स्वप्नांचा हा प्रवेश असतो. दहावीच्या परीक्षेत पडलेल्या गुणांच्या टक्केवारीवर अकरावीत कोणती शाखा निवडायची याचा निर्णय अवलंबून असतो. दहावी-बारावीत अव्वल असलेल्यांचे गुणगौरव – कोडकौतुक अजून कोठे संपते न संपते तोच नव्याने अभ्यासाला सुरुवात होते. शालेय जीवन संपल्यानंतर एका वेगळ्या संस्थेत, वेगळ्या वातावरणात प्रवेश करताना उत्सुकता, आनंद, ताण, बेफिकिरपणा – उनाडपणाचा एक मिश्कील भाव घोळक्या घोळक्यातील चारदोन चेहर्‍यांवर तरी निश्‍चितच जाणवतो. अशा वेळी पालकांवर फार मोठी जबाबदारी असते. किंबहुना पालकांनी आपल्या मुलांकडून टक्केवारीच्या नुसत्या अपेक्षाच न बाळगता त्यांच्यासाठी पोषक असे वातावरण तयार करणे तेवढेच महत्त्वाचे असते. दैनंदिन व्यवहारातील कराव्या लागणार्‍या लटपटी खटपटी आणि नेमके जे आपल्याला हवे असते तेच मिळत नसल्याची खंत आयुष्यभर बाळगून आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवणे, त्यासाठी त्याचे जीवन चाकोरीबद्ध करणे यावर पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. एखादं मूल आपल्या जीवनातील सगळ्याच लढाया एकटेच काही लढू शकणार नाही. त्यासाठी शाळेत शिक्षक, घरी पालक यांची सोबत प्रेरणादायी तसेच आश्‍वासक अशी असते. यासाठी सर्जनशील विचार करत पालक शिक्षकांनी नव्या भिरभिरणार्‍या स्वप्नांना मोकळे आकाश द्यायला हवे. आपली विवेकशक्ती शाबूत ठेवून मुलांशी संवाद साधणे – त्यातून सावध दृष्टीने मुलांवर लक्ष ठेवत कणखर सुसंवादीपणाची साक्ष पटवून देत त्यांच्या आत्मिक विकासासाठीचे प्रयोगशील शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. शाळा-कॉलेजमधून शिकविणार्‍या शिक्षकांनी स्वतः सतत प्रयोगशील राहायला हवे. त्याचे ते स्वतःसाठीचे नव्याने जगणे असते. असे ताजे टवटवीतपणाने जगण्याचे क्षण शिक्षकी पेशातच येतात कारण शिक्षकांचं नातं एकाच वेळी असंख्य संवेदनशील मनाशी जोडले जाते. विद्यार्थ्यांना घडवत, त्यांची प्रेरणा बनणं हा भाग जरी बाजूला ठेवला तरीही स्वतःसाठी – नव्या परिपूर्ण अनुभवांसाठी कृतीशील शिक्षण मुलांना देणं महत्त्वाचं असतं. कधी कधी असंही होतं की स्वतः एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी – त्यांना कृतीशील करण्यासाठी काही श्रम घेतले तर त्याची तुलना इतर सरकारी शिक्षकांच्या श्रमाशी केली जाते. त्यामुळे खूप वेळा काम करण्यासाठीची निराशा येते. ‘आणखी कोणीच काही करीत नाहीत, मीच कशाला करू?’ हा मनाला पडलेला प्रश्‍न आपल्या आनंदाची वाट कोठेतरी अडखळवून टाकतो. हालचाल न करणारे स्नायू जखडतात, डबक्यात साचलेल्या पाण्यात शेवाळं दाटतं – वापरात नसलेली भांडी काळवंडून जातात – स्वतःहून जे नव्या परिश्रमात वाहून घेतात तेच प्रवाही राहतात. जिवंतपणा तेथेच शाबूत राहतो. नवा प्रयोग ही शिक्षकाची धडपड – आतील तळमळ असते. या आंतरिक तळमळीतून विद्यार्थ्याला संवेदनशील होण्याची ऊर्जा प्राप्त होते. स्वतःच्या समोर असलेली मने ही हळवी, कोमल तेवढीच सृजनशील – निरागस आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, सांस्कृतिक, बौद्धिक कुवत ओळखून वर्गातील वातावरणात तासिका कधी संपली याचाही विसर पडावा अशी समरसता निर्माण व्हायला हवी – किंबहुना ती तयार करायला हवी. निव्वळ कंटाळवाणे – आज काय नवे शिकवू? असा उदासीन विचार करीत वाचन-व्यासंग-प्रयोगशीलतेचा ध्यास न बाळगता कार्यरत राहिलात तर समोरच्या जिवंत प्रवाहाशी नाते तरी कसे निर्माण करणार? उच्च आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारी ही पिढी – माहितीचे भंडार उपजतच बुद्धीत घेऊन वाढणारी – त्यांना निव्वळ माहिती नको आहे तर त्यांना गरज आहे आपलेपणाच्या स्पर्शाची – सजीव नात्याची!
शिक्षकांसाठीची सुट्टी ही स्वतःला अनुभवसमृद्ध करण्यासाठी असते. सुट्टीत खूप ज्ञान संपादन करून स्वतःला आशयघन करत अध्यापन कौशल्य विकसीत करून नव्या चेहर्‍यांसमोर कणखर संवादाची भाषा शिक्षकांनी विकसीत केली की नव्या वातावरणात – काहीशा गोंधळलेल्या – भांबावलेल्या स्थितीत असलेल्या – आत्ताच कोठे तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या या कोवळ्या मनांना अंतर्मुख होऊन विचार करता येईल.
आपल्या पाल्याचा अकरावीतला शाळा प्रवेश – किंवा बारावीनंतरचा त्यांचा प्रवास हा नेहमीच प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. दहावी-बारावीतल्या टक्केवारीवर त्याचं ‘ढं’ किंवा ‘हुशार’ असणं अवलंबून असतं. ज्याप्रमाणे पालकाना समाजात ‘स्टेटस’ असतं त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांनी टक्केवारी घ्यायला हवी हाही एक अलिखित नियम असतो. त्यामुळेच त्याला ‘माणूस’ बनविण्याची कृती मागे पडून इंजिनियर – डॉक्टर – वकील कसे बनवता येईल याकडे असलेला ओढाच जास्त दिसतो. आपल्या मुलांकडून अशी अपेक्षा बाळगत असताना त्यांच्या कॉलेजजीवनासाठी तसे वातावरण करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. पोषक वातावरणाची प्राप्ती झाली की आपली स्वप्ने पुरी होण्याची वाट मोकळी होते. त्याबरोबरीनेच एक संवेदनशील व्यक्ती म्हणून जगण्याचे मार्ग त्याला मोकळे करून द्यायला हवेत. या वयातही मुलांच्या सगळ्याच लढाया जर पालक आपणच लढू लागले तर त्यांनी स्वावलंबी कधी बनायचे? आपले मूल केव्हातरी डॉक्टर- इंजिनियर – वकील – शिक्षक वगैरे होईलच. सर्व्हिस करून तो स्थिरावणार… आपणही आपली प्रतिष्ठा मिरविणार पण त्या त्या पेशातही त्याला असावं लागणारं समाजभान, अंतर्मुख व्हायला लावणारं मन- संवेदनशील हळवे जग कसे काय निर्माण करणार? त्यासाठी प्रगल्भतेच्या उंबरठ्यावर असलेल्या या युवामनात वेळीच भावकोमलता जागी करायला हवी. घरातील आपल्या माणसांशी – शेजार्‍यापाजार्‍यांशी कसा संवाद साधायला हवा ही शिकवणूक देणं गरजेचं आहे. यशाच्या जोडीने अपयशही पचवायला शिकवायला हवे. त्यासाठी त्यांना वस्तूंवर प्रेम करायला न शिकवता शब्दावर – मानवी भावभावनांवर प्रेम करायला शिकवायला हवे. प्रेमातूनच विचाराने वाढणं होतं. खूप फिरावसं वाटतं, वाचावसं वाटतं – लिहिण्याची – विविध अनुभव घेण्याची प्रेरणासुद्धा यातूनच मिळते. आधीच्या काही पिढ्यांनी मनस्वी प्रेम केले अभिजात साहित्यावर, संगीतावर, काव्य – नाटक – चित्र – शिल्प सगळ्यांचाच मनमुराद आस्वाद घेतला. एम्.बी.बी.एस् डॉक्टर संवेदनशील – सामाजिक बांधिलकी हेच व्रत मानणारे साहित्यिक झाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांनी शेकडो पुस्तके लिहून समाजमनाला अंधश्रद्धा, जाचक रुढी-परंपरांच्या जोखडातून बाहेर काढण्याचा वसा स्विकारला. आपल्या उच्च शिक्षणाचा वापर दीन-दलित-दुबळे आदिवासी यांच्यासाठी वापर करणार्‍या अनेक पावलांचे पाऊलठसे आजही प्रेरणादायी बनलेले आहेत. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले असे देखणे ‘हात’, ध्यासपंथी चालणारी पावले, मृत्यूलाही आपल्या खांद्याचा बळकट आधार देणारे ‘खांदे’ ही या भूमीची समस्त जगाला दिलेली प्रेरणा आहे. हे मोठे सांस्कृतिक – सामाजिक संचित आपल्या मुलांसमोर उलगडून दाखविण्याची हीच वेळ आहे. धड कोवळेपण नाही की अजून परिवक्वताही जाणवत नाही अशा एका वळणावरील हा कॉलेजजीवनातील त्यांचा प्रवेश! जबाबदारीचे भान आणि जगण्याचा सन्मान त्यांना द्यायला हवा. हे पालक करू शकतात. त्यासाठी तुझ्या यशापेक्षाही सर्व गुणदोषांसकट तू माझी… तू माझा आहेस… माझं तुमच्यावर प्रेम आहे… ही भावना वाढीस लावताना श्रमातून, ध्यासातून शिकणं होतं. यशाची पायरी गाठता येते असा स्वावलंबी विचार मुलांना या टप्प्यावर ज्ञानसमृद्ध करणारा ठरेल! जीवनाचे यश यातच सामावलेलं असेल.