संत शिरोमणी नामदेव महाराज

0
1028

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील ‘घुमान’ हे गाव निश्‍चित झाले. संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या गावात त्यांचे स्मृतीमंदिरही उभारण्यात आले आहे. अशा या संताची आषाढ वद्य १३, शके १२७२ ही पुण्यतिथी. या तिथीला वयाच्या ८० व्या वर्षी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात ते समाधिस्त झाले. अशा या श्रेष्ठ संतांच्या व्यक्तित्वाची व कर्तृत्वाची माहिती आपण करून घेऊया.
भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य संतश्रेष्ठ नामदेवांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात केले. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाने, त्यांच्या या अजोड कामगिरीची आठवण गेली सुमारे सहा-सातशे वर्षे जतन करून ठेवली आहे.
नामदेवकालीन भारतीय समाजजीवन हे पूर्णतः धर्मप्रधान होते. धर्मातून निर्माण झालेल्या कर्मकांडाचे आणि रुढींचे मोठे प्रस्थ या काळात माजले होते. मनुष्याचे दैनंदिन जीवन धर्मकर्मांनी व्यापून गेले होते. मध्ययुगीन धर्मशास्त्रकारांनी रोजच्या क्रियाकर्मांना धर्माची बैठक दिली होती. बहुजन समाजाला समाज व्यवहारातही दोन हात दूर ठेवले जाई. देव, धर्म आणि मोक्ष यांच्यापासून त्यांना वंचित करण्यात आले होते. या सार्‍यांना विरोध करून नामदेव व समकालीन संतांना पुढे जायचे होते. नामदेवांबाबत सांगायचे म्हणजे विठ्ठल भक्ती हा यावरचा उपाय त्यांना दिसत होता. नामदेवांचे मूळ पुरुष यदुशेट हे शिंप्याचा व्यवसाय करीत असत, पण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी मात्र नित्य नियमाने त्यांच्या घराण्यात होत होती. शिवाय नामदेवांच्या वडिलांचा असा एक नेम होता की, दररोज पूजा करून पांडुरंगाला ते नैवेद्य दाखवीत असत. एक दिवस त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. म्हणून त्यांनी नामदेवाला देवळात जाऊन पूजा करावयास व नैवेद्य न्यावयास सांगितले. त्याप्रमाणे नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले व पूजा वगैरे करून देवाला नैवेद्य खाण्याची विनंती केली. पण देव नैवेद्य खाईना. नामदेवांनी पुन्हा एकदा देवाची हात जोडून प्रार्थना केली. पण देव काही ऐकेना. मग त्यांनी देवाला निक्षून सांगितले,‘देवा, तू जर आज नैवेद्य खाणार नाहीस, तर मी येथून हलणार नाही. पण देव काही ऐकेना. बराच वेळ वाट पाहून नामदेव देवाला म्हणाले, ‘विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नसशील, तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन.’ पण याचाही काही परिणाम होत नाही असे पाहताच नामदेव डोके आपटणार तोच भक्तवत्सल भगवंताने त्यांना धरले व आनंदाने नैवेद्य खाल्ला. त्यानंतर नामदेव विठ्ठलभक्त झाले, ते देवाच्या पायरीवर समाधिस्त होईपर्यंत.
नामदेव महाराजांच्या वारकरी पंथाचे स्थान हे विशेष मानाचे आहे. ‘पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार| भोळ्या भाळ्या पार दावीतसे॥ असे आश्‍वासन सर्वसामान्य जनतेला, या पंथाच्या वतीने नामदेवांनी दिले. ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांनी, सोप्या नामभक्तीच्या बळावर समाजात नवचैतन्य ओतले आणि वारकरी पंथ लोकाभिमुख केला. धर्माच्या नावाखाली माजलेला कर्मकांडाचा पसारा वारकरीपंथीय संतांनी दूर सारला. गतानुगतिक रुढीच्या दडपणाखाली ज्यांची जीवने काळवंडली होती, त्यांना भक्तीचा प्रकाशमय मार्ग दाखवून दिला. त्यांनी परमार्थाची कवाडे सर्वांना खुली केली आणि मोक्षाचे धन मुक्त हातांनी लुटण्यास सांगितले. विठोबाच्या राज्यात सगळ्यांना समान वागणूक मिळते आणि इथे ‘भेदाभेद भ्रम अमंगळ आहेत अशी उघड घोषणा संतांनी केली. भक्तीचे प्राणपणाने पालन करीत असताना, पाखंडी लोकांचे खंडनही त्यांनी केले. लोकाचार विशुद्ध रहावा यासाठी ते दक्ष राहिले. आत्मोद्धाराबरोबरच लोकोद्धार घडावा म्हणून त्यांनी आपले उभे आयुष्य लोकसेवेस्तव समर्पित केले. ‘जनी जनार्दन असल्याची साक्ष देणार्‍या नामदेवांनी वारकरी पंथाचा सर्वांगाने विस्तार केला. त्यांनी त्यांना विठ्ठलकृपेने लाभलेले दीर्घायुष्य या भक्तीपंथाच्या मुळाशी शिंपले आणि त्याच्या शाखा-उपशाखा भारतभर पसरविल्या. राजकीय धार्मिक, सामाजिक इ. स्तरांवरील विविध आक्रमणे पचवून या पंथाची पताका अजूनही उंच फडकत आहे, त्याच्या मुळाशी संत शिरोमणी नामदेव महाराजांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.
संत ज्ञानेश्‍वरांनी नामदेवांचा आदर करताना ‘भक्त भागवत’ असे संबोधून त्यांना उद्देशून म्हटले आहे
भक्त भागवत बहुसाल ऐकिले|
बहु होऊन गेले होती पुढे॥
परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व|
हा रस अद्भुत निरूपम॥
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वरांनी नामदेव महाराजांचे जे मूल्यमापन केले आहे, त्यातून अत्यंत श्रद्धेने विठ्ठलाची भक्ती केल्यानंतर ‘नराचा नारायण’ कसा होतो, हे नामदेव महाराजांच्या कर्तृत्वावरून आपल्या लक्षात येते. आज इतक्या वर्षानंतरही त्यांची कीर्ती आणि स्फुर्ती भारतीय जनतेने अखंड जतन करून ठेवली आहे, यात संत शिरोमणी नामदेव महाराजांचे कर्तृत्व आपणास दिसून येते. त्यांचा चरणस्पर्श लाभलेल्या घुमान गावी संपन्न होणार्‍या अखिल भारतीय मराठी संमेलनास शुभेच्छा देतानाच संत नामदेवांच्या पावन स्मृतीस विनम्रपणे अभिवादन करतो.