संतुलित जीवनासाठी

0
127

आजच्या तणावग्रस्त आणि बेशिस्त जीवनशैलीमुळेच मधुमेहाचे प्रमाण देशात वाढत चालल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. पुढच्या पिढीत चालत येणार्‍या आनुवंशिक मधुमेहापेक्षा वरील कारणांमुळे नव्या पिढीमध्ये मधुमेह अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. जीवनशैलीविषयक आजार ही आज केवळ भारताचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची मोठी समस्या बनलेली आहे. ‘जंक फूड’ कडे असलेला वाढता कल, वेळी – अवेळी खाण्याच्या सवयी, संतुलित आहाराकडे होणारे दुर्लक्ष, जीवनातील विविध ताणतणाव, समस्या, स्वतःकडे पाहायला पुरेसा वेळ नसणे या व अशा अनेक कारणांनी जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा आजारांची पूर्वसूचना मिळावी यासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या, तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण भारतात मोठे असल्याचेही हे सर्वेक्षण सांगते. त्यात नित्य व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष अशा आजारांमध्ये भर घालत असते. या सगळ्यावर मात करायची असेल तर संतुलित आहार, वेळच्या वेळी व्यायाम, मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठीचे प्रयत्न आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनाला एक शिस्त आणणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आज सर्वांचेच जीवन अत्यंत धावपळीचे बनू लागल्याने त्यातील शिस्त हरवली आहे. त्याचे परिणाम अर्थातच मग शरीरावर दिसू लागतात. गतवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन घोषित झाला. जगभरामध्ये योगोपासनेचे महत्त्व अधोरेखित झाले. परंतु काही काळापुरताच त्याचा प्रभाव राहिला. नित्य योगोपासना व प्राणायाम केल्याने त्याचे चांगले फायदे मिळतात, हे सर्वांना कळते पण वळत नाही अशी परिस्थिती आहे. अशाने आपणच आपले नुकसान करून घेत आहोत. ह्रदयविकाराचे भारतातील प्रमाणही जगात सर्वाधिक आहेत. भारतामध्ये ह्रदयरोग्यांचे प्रमाण पाच कोटींहून अधिक आहे आणि दरवर्षी १७.३ दशलक्ष लोक ह्रदयविकाराने मृत्युमुुखी पडतात असे सांगण्यात येते. येथेही ह्रदयविकारांत वाढ होण्यामागे अर्थातच जीवनशैली हेच कारण सांगितले जाते. विशेष म्हणजे या ह्रदयरोग्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे शहरी भागांत आढळतात, कारण ग्रामीण भागापेक्षा शहरी नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये श्रमांचा भाग कमी असतो. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आदींमुळे ते या आजारांना बळी पडतात. आणखी एक निरीक्षण सर्वेक्षणात आढळून आले आहे ते म्हणजे अलीकडे भारतातील ह्रदयविकाराच्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढू लागले आहे. वीस वर्षांपूर्वी हे प्रमाण एवढे नव्हते, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याची कारणेही पुन्हा आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीकडेच वळतात. आजकाल बहुराष्ट्रीय कंपन्या तरुणाईला मोठमोठ्या वेतनाचे आमिष दाखवतात खरे, परंतु अक्षरशः पिळून घेत असतात. रात्रंदिवस राबणार्‍या या तरुणाईची ऐन मोक्याची वर्षे या चरकामध्ये पिळवटून जातात. त्याचे परिणाम मग उत्तरायुष्यात जाणवू लागतात. या सगळ्या समस्यांवर जर मात करायची असेल, तर भारतीय तरुणाईच्या मनावर शिस्तशीर जीवनशैलीचे महत्त्व बिंबवले गेले पाहिजे आणि त्या अनुषंगाने कामाच्या वेळा, पुरेशा सुट्या आदींची अंमलबजावणी व्हावी लागेल. आज दुर्दैवाने सार्वजनिक क्षेत्रामध्ये कर्मचार्‍यांची चंगळ आणि खासगी क्षेत्रामध्ये मात्र पिळवणूक असे चित्र दिसते. हे चित्र पालटण्यासाठी सरकारने काही ठोस व ठाम निर्णय घेणे आवश्यक आहे. शाळांच्या गैरसोयीच्या वेळा असोत, सुट्यांचे चुकीचे नियोजन असो, या सगळ्या परंपरेने चालत आलेल्या चुका दुरूस्त करण्याची खरी आवश्यकता आहे. मानवी जीवनाचे मोल जाणून घेऊन आणि मानवी कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतानाच, प्रत्येकाला संतुलित जीवनशैली लाभावी यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असतील. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या याकडे आवर्जून लक्ष देत असतात असे आपल्याला दिसेल. कर्मचार्‍यांना त्या देत असलेल्या सुविधा, त्यांच्या जीवनशैलीकडे आवर्जून पुरविले जाणारे लक्ष यातून त्यांच्या प्रगतीचा आलेख वाढता राहिलेला आहे. त्यातून काही नुकसान झालेले नाही. सगळ्याच क्षेत्रांमध्ये अशा प्रकारची दृष्टी समोर ठेवून काही फेरबदल जरी करता आले, तरी त्यातून भारतीय तरुणाईपुढील जीवनशैलीविषयक आजारांच्या मोठ्या आव्हानावर मात करणे काही अशक्य ठरू नये. शालेय जीवनापासून तो संस्कार आणि त्या संतुलित जगण्याला पूरक पाठ्यक्रम आणि सोयीसुविधा यांची कास त्यासाठी धरावी लागेल.