‘संतसाहित्य कथासंदर्भकोशा’च्या निमित्ताने

0
133

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

प्रा. आचार्य यांनी पुराणकथांचे संदर्भ शोधून ते नोंदविण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भग्रंथात प्रा. आचार्य यांचे व्युत्पन्नता, रसज्ञता आणि मांडणीचा साक्षेप हे गुण दिसून येतात. सांस्कृतिक संचिताच्या जतनासाठी तो भविष्यकाळात फलदायी ठरणार आहे, संतसाहित्याच्या सम्यक आकलनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.

प्रा. मा. ना. आचार्य यांनी नुकताच ‘संतसाहित्य कथासंदर्भकोश’ साकार केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या आणि ‘मौज प्रकाशना’च्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. प्रा. मा. ना. आचार्य हे अलिबागला राहणारे. मराठीचे ते जुने-जाणते प्राध्यापक. मराठीच्या अभ्यासक्षेत्रात त्यांचा गेली कित्येक वर्षे चैतन्यशील वावर आहे. व्याकरण, भाषाविज्ञान, जुनी-नवी कविता, मराठीतील लघुनिबंधाची वाटचाल यांविषयी त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले आहे. त्यांच्या अभिरुचीला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा पडलेल्या नाहीत. वृत्तिगांभीर्याने मराठी भाषा आणि वाङ्‌मय यांविषयी तन्मयतेने लेखन करणार्‍या अव्वल दर्जाच्या अभ्यासकांमध्ये त्यांची गणना होते.
आपल्या संतवाङ्‌मयात दृष्टान्तादींसाठी पुराणकथा उपयोजिलेल्या असतात. गतिमान काळातील समाजजीवनात त्यांविषयीची अनभिज्ञता असते. आपली आजची शिक्षणप्रणाली त्याला पोषक नाही. शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेला आज स्थान राहिलेले नाही. भारतीय संस्कृतीशी असलेल्या अनेक कथा गतपिढ्यांना ज्ञात होत्या. तो वारसा टिकविणे आज अगत्याचे झालेले आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तर त्याची निकड प्रकर्षाने भासते. अशावेळी प्रा. मा. ना. आचार्य यांनी पुराणकथांचे संदर्भ शोधून ते नोंदविण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक प्रकल्पच आहे. सांस्कृतिक संचिताच्या जतनासाठी तो भविष्यकाळात फलदायी ठरणार आहे.
त्यांनी ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास यांच्या महत्त्वाच्या रचनांमधील कथांसंदर्भ येथे समाविष्ट केलेले आहेत. पौराणिक वाङ्‌मयातील रामायणादी महाकाव्ये, पुराणे, उपपुराणे आणि अन्य ग्रंथांचा समावेश त्यांनी केलेला आहे. पूर्वसूरींना वाट पुसतच प्रा. आचार्य यांनी हे कष्टाचे आणि व्यासंगपूर्ण कार्य सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून पार पाडलेले आहे. म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या अभ्यासामुळे आर्ष परंपरा आणि मौखिक परंपरा यांच्या समृद्धीचा प्रत्यय येतो. अनेक खाचखळग्यांमधून सहस्रावधी वर्षांपासून आजमितीला झुळझुळ वाहत असलेल्या चैतन्यपूर्ण झर्‍याचे प्रतिबिंब या कथावस्तूंमधून जाणवते. नीतिमत्ता, जीवनमूल्यांविषयीची अपार श्रद्धा आणि त्यातून निर्माण झालेली धारणा यांचे दर्शन या सांस्कृतिक ठेव्यातून घडते.
‘संतसाहित्य कथासंदर्भकोशा’मधील काही कथांच्या आशयसूत्रांचा संक्षेपाने परामर्श घेतला तर या ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा आणि स्वरूप याविषयीची कल्पना येऊ शकेल. ‘‘संतसाहित्याच्या एका जिज्ञासू वाचकाने वाचककेंद्री भूमिकेतून तयार केलेला हा एक कोश आहे,’’ असे लेखकाने सुरुवातीला म्हटलेले आहे.
प्रारंभी ‘ज्ञानदेवी’तील गणेशाचा संदर्भ देताना लेखकाने त्याचे वाङ्‌मयरूप विशद केले आहे. वाङ्‌मयाच्या शाखा दोन- शास्त्र व काव्य. शास्त्र हे तर्कानुगामी शब्दप्रतिपाद्य. काव्य हे स्वसंवेद्य. ज्या काश्मिरी शैव संप्रदायाशी ज्ञानदेवांचे नाते आहे, त्यातील आनंदवर्धन म्हणतो, महाभारत हे शांतरसाचे उत्तम उदाहरण. शास्त्रनय व काव्यनय ही दोन्ही तेथे मिळतात. यांमध्ये पूर्णपणे अद्वैत आहे. ओंकाररूप विशद करताना ते म्हणतात, उपनिषदामध्ये ओंकाराला प्रणव म्हटले आहे. ‘प्रणवरूपी धनुष्याने आत्मरूपी बाण सोडून ब्रह्मरूपी लक्ष्याचा वेध घ्यावा’ (मुंडकोपनिषद २.२.४). ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे (भगवद्गीता ८.१३).
शारदेच्या स्वरूपाविषयी लेखक म्हणतो ः शारदा-सरस्वती म्हणजे अभिनव वाग्विलासिनी. प्रतिभा म्हणजे अपूर्ववस्तुनिर्माणक्षम प्रज्ञा. ‘प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा मता’ (क्षेमेंद्र-औचित्यविचार चर्चा या ग्रंथात उद्धृत केलेले भट्टतौतांचे वचन).
चातुर्यकलाकामिनी- चौदा विद्या व चौसष्ट कला यांमध्ये प्रवीण. ‘कां टिटिंभु चांचुवे-हीं|’ (१.६८) मधील टिटवा-टिटवीच्या गोष्टीचा संदर्भ लेखकाने स्पष्ट केलेला आहे. ‘मी पार्थु द्रोणाचा केला’ (२.३७) मधील हस्तिनापुरी राजपुत्रांना धनुर्विद्या शिकवीत असताना अर्जुनाच्या कौशल्यामुळे द्रोणाचार्य कसे संतुष्ट झाले हा प्रसंग वर्णिला आहे. ‘आंधलेया गरुडाचे पांख आहाति’ (९.३०३) मधील स्वर्लोकी अमृत आणण्यासाठी गेलेल्या गरुडाचा पराक्रम पाहून विष्णूने त्याला ध्वजाचा मान दिला. त्याला आपले वाहन केले. इंद्राने त्याला महाबलाढ्य भुजंग हे कायमचे भक्ष्य म्हणून दिले असे सांगितले आहे. ‘मी सुदामेयांचिया सोडी गांठी…|’ (९.३९०) मधील श्रीकृष्ण- सुदामाच्या निर्व्याज मैत्रीची गोष्ट सांगितली आहे. नृसिंहावतार व प्रल्हाद यांची कथाही लेखकाने सांगितली आहे. व्यास, मरुद्गण व मरीची, यक्षरक्षगण, कुबेर, बृहस्पती, स्कंद, भृगु, कपिलाचार्य, वरूण, भागीरथी गंगा, जान्हवी, अजामिळ, बळी, अश्‍विनीकुमार, मार्कंडेय, दुःखकालिंदी, भीष्म, जयद्रथ, वैतरणी, त्रिसांकु, तांडव व लास्य आणि श्रीमहालसा यांविषयीचे स्पष्टीकरण मुळातून समजून घेण्यासारखे आहे.
त्यानंतर लेखकाने ज्ञानदेवांच्या अभंगातील काही संदर्भांचे आणि संकल्पनांचे स्पष्टीकरण केलेले आहे. उदा. ‘गाती नारद तुंबर’ (अ.क्र. १७), ‘संतांचे संगती मनोमार्ग गती’ (अ.क्र. ५७), ‘त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी’ (अ.क्र. ५९) आणि ‘अघटित माया नेणवेची अंत’ यासंबंधीचे स्पष्टीकरण अभ्यसनीय आहे.
नामदेवांच्या अभंगांसंबंधीच्या विवेचनात विदुराच्या कण्या, श्रीकृष्णावतार, महाबळभटाची कथा, उखळबंधन व यमलार्जुनांचा उद्धार, श्रीकृष्णाची रासक्रीडा, व्योमासुरवध, अहल्येची कथा (तपशिलाच्या भेदासह), अंबरीषकथा, हरिश्‍चंद्र, मुचुकुंद, शिबी, बाणासुर व अनिरुद्ध, ‘अठ्ठावीस युगें उभा विटेवरी’ यासंबंधीचे स्पष्टीकरण आलेले आहे. यातील काही संदर्भ रामायण-महाभारतातील आहेत. काही भागवतातील आणि पुराणांतील आहेत.
त्यानंतर लेखकाने ‘एकनाथी भागवता’त आलेल्या पौराणिक संदर्भांविषयीच्या कथा सारांशरूपाने सांगितल्या आहेत. परशुराम, याज्ञवल्क्य, वाल्मीकी, व्यास, दत्तात्रेय, नारद, कण्व (हा कण्व ऋग्वेदात उल्लेखिलेला; महाभारतातील नव्हे), दुर्वास, जांबवती, लवणासुर, नृग, ब्रह्मा, विष्णू व वृंदा, हनुमानपुत्र मकरध्वज, शंकर, नल नामक वानर, मुरारी, बौद्धावतार, ‘कल्की’ अवतार, वसिष्ठ व विश्‍वामित्रांमधील द्वेष व मत्सर, शिशुपाल, दंतवक्र, पौंड्रक व शाल्व, ऋष्यशृंग, प्राचीनबर्ही, उद्धव, तिलोत्तमा व सुंद-उपसुंद, धन्वंतरी, शालिग्राम, सुग्रीव, जांबवंत व जटायू, शतरूपा व मन, थृशुंडी, ऐल उर्वशी कथा, लोमहर्ष, पृथु या व्यक्ती आणि संदर्भ याविषयीच्या उद्बोधक कथा लेखकाने सांगितल्या आहेत.
एकनाथांच्या अभंगांत श्रीकृष्णचरित्रातील अनेक संदर्भ आलेले आहेत. रामायण- महाभारतातील काही प्रसंगांचे उल्लेख आहेत. शिव-पार्वतीचे उल्लेख आलेले आहेत. त्याविषयीचे स्पष्टीकरण लेखकाने केले आहे.
एकनाथांच्या भावार्थरामायणात आलेल्या अनेक कथाभागांविषयीचे स्पष्टीकरण लेखकाने केलेले आहे. त्यांत श्रावणाची कथा, ऋष्यशृंगकथा, पायसाची वाटणी- घारीची कथा, ताटकाहनन, सीतेचा जन्मवृत्तान्त, मंथरा, गुहक, श्रावणशापाची कथा, मंदकर्णी ऋषीचा उद्धार, पंचवटीत प्रवेश, जटायूची भेट, लक्ष्मणाची ध्यानमग्नता, जटायू-रावण युद्ध, पार्वतीने पाहिलेली रामाची परीक्षा, सुग्रीवाची जन्मकथा, वालीने केलेला रावणाचा पराभव, जांबवानाचे पूर्ववृत्त, हनुमानाचा लंकाप्रवेश, नल वानराकडून सेतुबंधन, अंगदाची शिष्टाई व त्याचा पराक्रम, इंद्रजित युद्ध, रावण-मंदोदरी संवाद, कुंभकर्णयुद्ध व त्याचा वध, मायावी सीतेचा इंद्रजिताकडून वध, राम-रावण युद्ध आणि बिभीषणाला राज्याभिषेक या उपकथानकांविषयीची टिपणे लेखकाने लिहिली आहेत.
तुकारामांच्या अभंगगाथेत भगवंताचे भक्तप्रेम, भक्तांची निष्ठा, नाममहिमा, श्रीकृष्णचरित्र अशा विषयांतील कथासंदर्भ अनेक वेळा आलेले आहेत. अंबरीष, अजामेळा, अर्जुन, अहल्या, उखळबंधन, उपमन्यू, कर्ण, कालियामर्दन, किन्नर, कुब्जा, कुर्मावतार, कोळी, गुहक, गोपीवस्त्रहरण, गोवर्धनोद्धारण, ध्रुव, नृसिंह, नलदमयंती, नारद, परीक्षित, प्रल्हाद, बळी, विभीषण, वाल्मीकी, विदुर, व्यास, शिबी, शुक श्रियाळ, सनकादिक, सुदामा, सेतुबंधन व हरिश्‍चंद्र यांचे उल्लेख त्यांच्या अभंगांत आढळतात. त्याविषयीचे स्पष्टीकरण लेखकाने केलेले आहे.
रामदासांच्या रचनांमधील ‘मनाचे श्‍लोक’, ‘हनुमंताची स्तोत्रे’, ‘द्विकांडात्मक रामायण’, स्फूट ओव्या, ‘पदरचना’ आणि ‘उपदेशपर फटका’ यांमध्ये जे जे पौराणिक व रामायणातील संदर्भ आलेले आहेत त्यांविषयीचे लेखकाने स्पष्टीकरण या ठिकाणी केलेले आहे.
‘संतसाहित्य कथासंदर्भकोश’ या महत्त्वाच्या संदर्भग्रंथात प्रा. मा. ना. आचार्य यांचे व्युत्पन्नता, रसज्ञता आणि मांडणीचा साक्षेप हे गुण दिसून येतात. संतसाहित्याच्या सम्यक आकलनासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे.