संतप्त म्हादई समर्थकांची जावडेकरांविरुद्ध इफ्फीस्थळी निदर्शन

0
150

>> गिरीश चोडणकरांसह अनेकांना प्रतिबंधात्मक अटक

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडून म्हादई प्रकरणी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त बनलेल्या म्हादई समर्थकांनी काल ताळगाव येथे शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जावडेकर यांचे भाषण सुरू असताना तसेच स्टेडियमच्या बाहेर आणि कांपाल पणजी येथे गोवा मनोरंजन संस्थेच्या बाहेर निदर्शने केली. पोलिसांनी निदर्शने करणार्‍या राजकीय आणि सेवाभावी संस्थांच्या अनेक जणांना प्रतिबंधात्मक अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, संयुक्त सचिव संतोष सावंत, प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे हृदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे, राजन घाटे, जगदीश भोबे, कॉंग्रेसचे मेघश्याम राऊत, ग्लेन काब्राल, मनोज नाईक व इतरांचा समावेश होता.
अटक केलेल्यांची रवानगी डिचोली, पर्वरी पोलीस स्टेशनवर केली होती.
प्रोग्रेसिव्ह फ्रंटने म्हादईप्रश्‍नी इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या स्थळी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ताळगाव येथे शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे स्टेडियम परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ताळगाव येथे हृदयनाथ शिरोडकर, दुर्गादास कामत व इतरांना अटक करण्यात आली.

कॉंग्रेसच्या ५० कार्यकर्त्यांना
अटक ः ट्रोजन
ताळगाव येथे इफ्फीच्या उद्घाटन कार्यक्रम स्थळी बेकायदा जमाव न करण्याबाबत आगशी पोलिसांनी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना नोटीस पाठविली होती. बेकायदा जमाव केल्यास योग्य कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर चोडणकर यांनी कांपाल पणजी येथे गोवा मनोरंजन संस्थेच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली. कॉंग्रेसच्या निदर्शने करणार्‍या सुमारे ५० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जमावबंदी आदेश
मोडला नाही ः कॉंग्रेस
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला दिलेले पर्यावरण दाखल्याबाबतचे पत्र त्वरित स्थगित ठेवण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. कर्नाटकाकडून या पत्राचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. कॉंग्रेसचे कार्यकर्ते शांततेत चार – चार जणांच्या गटाने निदर्शने करीत होते. त्यांनी जमावबंदीचा आदेश मोडलेला नाही, असा दावा डिमेलो यांनी केला.

जावडेकरांच्या भाषणावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी
उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या भाषणाच्या वेळी कॉंग्रेसचे मेघश्याम राऊत, मनोज नाईक, ग्लेन काब्राल यांनी म्हादई प्रश्‍नी स्पष्टीकरण करण्याची मागणी करून जावडेकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सुरक्षा रक्षकांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. निदर्शने करणार्‍यांनी म्हादई समर्थनार्थ घोषणा दिल्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.