संजिताला सुवर्ण, दीपकला कांस्य

0
63

संजिता चानूने काल शुक्रवारी भारताला यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये ५३ किलो वजनी गटात १९२ किलो वजन उचलून ही सुवर्ण कामगिरी केली. यामुळे भारताच्या सुवर्णपदकांची संख्या आता दोन झाली आहे. याआधी मीराबाई चानूने गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सोनेरी कामगिरी केली आहे. त्यामुळे आता दोन सुवर्णपदकांमुळे देशाचा तिरंगा अभिमानाने उंच फडकला आहे. दीपक लाथेरने पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवसअखेर भारताच्या पदकांची संख्या चार झाली आहे. यात दोन सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्यपदकाचा समावेश आहे. ही चारही पदके वेटलिफ्टर्सनी मिळवून दिली आहेत.

संजिताने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात ८१ किलो वजन उचलले. या पहिल्या प्रयत्नात इतर कोणत्याही खेळाडूने ८१ किलो किंवा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न केला नाही. संजिताने दुसर्‍या प्रयत्नात ८३ व तिसर्‍या प्रयत्नात ८४ किलो वजन यशस्वीरित्या उचलले. टुआने दुसर्‍या वेळी ८० किलोचा प्रयत्न यशस्वी केला. परंतु, तिसर्‍यावेळी ८२ किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली. कॅनडाच्या राचेलने दुसर्‍या प्रयत्यान ८१ किलो वजन उचलून स्नॅचच्या समाप्तीनंतर टुआला एका गुणाने मागे टाकले. स्नॅचमधील तिच्या ८३ किलोच्या तिसर्‍या प्रयत्नाला यश मिळाले नाही. क्लीन अँड जर्कमध्ये संजिताने १०४ व १०८ किलो वजन उचलले. ११२ किलोचा तिचा तिसरा प्रयत्न फेल ठरला. टुआने या प्रकारात १०२ किलो वजन उचलले तर कॅनडाच्या राचेलले केवळ १०० किलो वजन उचलल्याने तिचे रौप्यपदक एका गुणाने हुकले. चार वर्षांपूर्वी ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात संजिता चानूने सुवर्णपदक पटकावले होते.

१८ वर्षीय दीपक लाथेरने पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल स्पर्धा पदार्पणातच त्याने ही स्पृहणीय कामगिरी करत अनपेक्षित पदक भारताच्या पदरात टाकले. त्याने पहिल्या प्रयत्नात १३६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५९ किलो वजन उचलून पदकाला गवसणी घातली.

दीपकने स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात १३२ किलो आणि दुसर्‍या प्रयत्नात १३६ किलो वजन उचलले. त्यानंतर तिसर्‍या प्रयत्नात मात्र तो १३८ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरल्याने पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. क्लीन अँड जर्क प्रकारात त्याच्या पुढे ६ वेटलिफ्टर्स होते. या प्रकारात त्याने १५९ किलो वजन उचलून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पदकाची आशा संपुष्टात आली असताना, समोआचा वायपोव्हा अपयशी ठरला. त्यामुळे दीपकचे पदक निश्‍चित झाले. दीपकची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. वेल्सच्या गॅरेथ इव्हान्सने सुवर्णपदक जिंकले. त्याने एकूण २९९ किलो वजन उचलले. तर श्रीलंकेच्या इंडिका दिसानायकेने २९७ किलो वजन उचलून रौप्य पदकाची कमाई केली.