संगणक वाढवणार अन्नाची लज्जत

0
117

‘संगणकीय तंत्रज्ञानाने आधुनिक मानवाच्या जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श केला आहे…’ हे किंवा अशा अर्थाचे विधान वाचण्याची आपणा सर्वांना गेल्या दहा वर्षांत चांगलीच सवय झाली आहे. इतकी की संगणकीय प्रणालींचा वापर टाळून संपूर्णपणे हाताने बनवल्या जाणार्‍या वस्तूंना तसेच केल्या जाणार्‍या कामांना वेगळेपण प्राप्त झाले आहे! हे ठीक आहे, परंतु संगणक व स्मार्टङ्गोन यांनी स्वतंत्रपणे अथवा संयुक्तपणे कोणकोणत्या क्षेत्रांत प्रवेश केला आहे याची सर्वंकष कल्पना ङ्गार थोड्यांना असते. अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र यांमध्ये संगणकांचा वापर गेल्या तीन दशकांपासून आहेच. गेल्या दशकात त्यांनी क्रीडा, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक पातळीवरील खरेदी-विक्री, ङ्गॅशन इ. मध्ये आपला जम बसवला आहे आणि आता तर त्यांनी चक्क स्वयंपाकघरात प्रवेश केला असून – येत्या दशकातच – हटके ‘रेसिपीज्’ शोधण्यात, स्वयंपाकात मदत करण्यात आणि नवे प्रयोग करण्यात त्यांचा मोठा वाटा असणार आहे! काही वर्षांतच यंत्रमानवाने बनवलेले अन्नपदार्थ आपल्याला सर्व्ह करण्याचेही काम यंत्रमानवच करेल. इतकेच नाही तर थ्री-डी प्रिंटरचे तंत्रज्ञान वापरून काही पदार्थ चक्क छापताही येतील, त्यांच्या उपयुक्त पोषणमूल्यांना धक्का न लावता!!
या संपूर्ण संकल्पनेची प्रत्यक्ष सुरूवात केली आहे ‘आयबीएम’ ने (आताची लेनोव्हो) बनवलेल्या वॉटसन या संगणकाने. वॉटसन या नावाने बहुतेकांना काही बोध होणार नाही – अगदी थोडक्यात सांगायचे तर हा एक महासंगणक असून तो मानवी पद्धतीने विचार करू शकतो व त्यामुळेच थेट विचारले जाणारे प्रश्न किंबहुना त्यांतील शब्दांमधून मांडलेला मूळ मुद्दा समजून घेऊन अचूक उत्तरे देऊ शकतो. या संगणकीय विचारतंत्राला ‘कॉग्निटिव कॉँप्यूटिंग’ असे नाव आहे. अमेरिकेत अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘ज्योपार्डी’ (गशेरिीवू) – ह्याचे ‘यक्षप्रश्न’ असे काहीसे भाषांतर होऊ शकेल! आपल्या ‘कौन बनेगा करोडपती’ सारखा हा शो असतो परंतु त्यापेक्षा ङ्गारच अवघड!!) ह्या कार्यक्रमाच्या अंतिम ङ्गेरीत दोन मानवी स्पर्धकांना हरवून वॉटसन जिंकल्यामुळे तो (आणि आयबीएम) एकदम सर्वांच्या नजरेत भरले! जाता जाता – आयबीएमने असाच चमत्कार ह्यापूर्वीही करून दाखवला आहे. १९९७ साली बुद्धिबळाच्या विश्वविजेत्या गॅरी कास्पारोवला हरवणारा ‘डीप ब्ल्यू’ हा संगणक याच कंपनीने बनवला आहे.
असो. तर मूळ मुद्दा असा की ‘कॉग्निटिव कुकिंग’ या एका नव्या उपक्रमानुसार वॉटसन सध्या स्वयंपाकघरांत शिरला असून त्याने स्वतःच्या डोक्याने नवनवीन पाकक्रिया उर्ङ्ग रेसिपीज् शोधण्यास सुरूवात केली आहे! वरवर विचित्र किंवा अशक्य देखील भासणार्‍या त्याच्या काही पाककृती (उदा. व्हिएटनामीज् ऍपल कबाब किंवा बेकन पुडिंग इ.) खाल्ल्यानंतर जाणकार खवय्यांनीही त्याला दाद दिली आहे.
वॉटसनने शोधून काढलेले हे खाद्यपदार्थ आत्तापर्यंत कोणत्याही खानसाम्याच्या स्वप्नातही न आलेलेच असतील अशी खास व्यवस्था याबाबतची सॉफ्टवेअर्स आणि प्रोग्रॅम्स लिहिणार्‍यांनी केली आहे. यंत्रांना मानवी व्यवहारांच्या, विचारप्रक्रियेच्या आणि तीमधून जन्म घेणार्‍या संभाव्य नवनिर्मितीच्या अधिक जवळ आणण्याच्या आयबीएम कंपनीच्या योजनेचा हा एक भाग आहे. ‘मानवी बुद्धिमत्तेच्या यथायोग्य वापराचा उच्चतम बिंदू म्हणजे नवनिर्मिती असे मानले जाते. त्यामुळे यंत्रांना मानवी ‘चेहरा’ देण्याचे आव्हान आम्ही या वेगळ्या मार्गाने स्वीकारले असे म्हणता येईल.‘ असे मत आयबीएम मधील वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता श्री. फ्लोरिअन पिनेल ह्यांनी व्यक्त केले आहे.
नवीन खाद्यपदार्थ शोधून काढण्यासंबंधीचे तीन पायाभूत नियम वॉटसनला शिकवले गेले आहेत –
१. सुखद आश्चर्य – नव्या पाककृतीला समरूप किती खाद्यपदार्थ ह्यापूर्वीच अस्तित्वात आहेत काय हे पाहणे (हो, नाहीतर ‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ म्हणतात तसे ङ्गक्त वेगळे नाव देऊन आणि इथेतिथे किरकोळ बदल करुन नेहमीचाच पदार्थ तयार व्हायचा!)
२. पदार्थाचे दृश्य रूप आणि चव तसेच त्याच्या सुवासाचाही अंदाज घेणे
३. घटकांचा योग्य संयोग – नव्या डिशमधील सर्व खारे-गोडे मसाले, कृत्रिम रंग इ. परस्परांशी बंधुभावाने वागतात ना हे तपासणे. याखेरीज आणखी तीन घटकांवर मात्र संबंधित व्यक्तीने नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. वापरलेल्या पदार्थांची निवड, एखाद्या विशिष्ट देशातील वा मुलूखातील स्वयंपाकाची खास शैली आणि तयार होणार्‍या खाद्यवस्तूचा प्रकार (म्हणजे तिखट / गोड, मसालेदार / साधी, शाकाहरी / मांसाहारी इ.) यांबाबतचा निर्णय वॉटसनला दिला की तो लवकरच दहापेक्षाही जास्त नव्या पाककृती सांगतो. वर म्हटल्याप्रमाणे त्या संपूर्णतः नव्या असतात हे विशेष! यांमधून आपण, आपल्या पसंतीनुसार, एखादी निवडू शकता.
वॉटसनची शिकवणी जोरात चालू असल्याने तो प्राथमिक अडथळे ओलांडून लवकरच प्रगती करील असा आयबीएमला विश्वास आहे. कोणतीही कंपनी आर्थिक ङ्गायद्यासाठीच काम करते व कॉग्निटिव कुकिंग या संकल्पनेच्या विविध उपांगांचाही विकास घडवून त्यामधून लाभ मिळवता येईल असे चित्र दिसत आहे. जगातल्या विविध देश-प्रदेशातील स्वयंपाकाची वैशिष्ट्ये संगणकीय पद्धतीने एकत्र आणण्याचे काम सध्या चालू आहे. माहितीचा हा स्रोत किंवा लायब्ररी अङ्गाट आणि अनंत आहे यात शंकाच नाही!! या माहितीचे योग्य विश्‍लेषण करून ती एखाद्या ‘ऍप’च्या रुपात सादर करता येईल. एखाद्या कुटुंबातील व्यक्तींच्या खाण्याच्या आवडीनिवडींचा अंदाज त्या घरातील दरमहाच्या वाण्याच्या यादीचा अभ्यास करून बांधता येईल व त्यानुसार हा ‘रोबो-शेङ्ग’ योग्य बदल सुचवू शकेल. ‘ङ्गूड-चेन’ प्रकारची बहुसंख्य दुकाने आज स्मार्टङ्गोनवरुन (म्हणजेच इंटरनेटवरून) आपली ऑर्डर स्वीकारतात. हा डेटा वॉटसनला पुरवल्यास आपला सर्वाधिक आवडता पदार्थ कोणता हे त्याला समजेल आणि त्यामधील घटकांत तो काही सकारात्मक सूचना करू शकेल. लेखात इतरत्र म्हटल्याप्रमाणे उपाहारगृहाचा चालक प्रत्येक ग्राहकागणिक स्वतःची रेसिपी बदलू शकत नाही परंतु तोच पदार्थ घरी बनवताना वॉटसनच्या सूचना अमलात आणल्यास काहीतरी हटके हाती लागू शकेल!
अर्थात वॉटसन अजून बच्चा म्हणजेच अननुभवी असल्याने तूर्त त्याला एका चांगल्या स्वैपाक्याची किंवा शेङ्गची मदत मोठ्या प्रमाणात लागते. म्हणजे ब्रेड बनवण्यासाठीच्या मैद्यात किंवा कणकेत घालण्यासाठी तो एखादा जगावेगळा, आत्तापर्यंत कोणीही न वापरलेला (तरीही चांगल्या चवीचा आणि अर्थातच खाण्यास सुरक्षित!) घटक सुचवेल परंतु त्याचे प्रमाण, तो आधीपासून मिसळायचा की नंतर, त्यामुळे भाजण्याचा कालावधी वा पद्धत बदलावी लागेल काय या बाबी संबंधित शेङ्गलाच ठरवाव्या लागतील. आणि हो, वॉटसनचे सध्याचे ज्ञान पारंपारिक ‘वेस्टर्न कुकिंग’ वर आधारित आहे, त्याला अजून आशियाई किंवा इंडियन कुकिंगमागील संकल्पना शिकवल्या गेलेल्या नाहीत. तसेच तो किचन आट्यापाशी उभा राहून प्रत्यक्ष स्वयंपाक करू शकत नाही, ते काम माणसालाच करावे लागते. चांगल्या चवीचा खाद्यपदार्थ बनवण्यामध्ये शेङ्गचा अनुभव ङ्गार महत्त्वाचा असतो आणि त्याच्या अंदाजानुसार घटकांचे प्रमाण कमीजास्त झाल्याने वेगळी लज्जत मिळू शकते. परंतु ङ्गुड जॉइंट / मेस / रेस्तोरॉँसारख्या व्यावसायिक पातळीवर सातत्याने एकसारखी चव असणे अपरिहार्य असल्याने अचूकता आणि विविधता यांचा मेळ घालणे वॉटसनला शिकावे लागेल. याला किती काळ लागेल हे निश्चितपणे वर्तवता येणार नसले तरी सध्या टीव्हीवर लोकप्रिय असलेल्या ‘मास्टरशेङ्ग’ स्पर्धेतील स्पर्धकांमध्ये भविष्यात एखादा यंत्रमानव दिसणे अगदीच अशक्य नाही एवढे मात्र खरे!!