षट्‌कर्मातील एक ः त्राटक

0
164
  •  डॉ. सुरज स. पाटलेकर
    (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव)

त्राटक हे सूर्य उगवतो व सूर्य मावळतो त्या वेळेच्या सूर्यास बघून करायचे असते व हेच त्राटक श्रेष्ठ असे सांगितले आहे. पण सुरुवात करत असताना दिव्यापासूनच करावे व नंतर सूर्य हा पर्याय निवडावा. कारण सूर्याची किरणे अधिक प्रभावशाली असल्याने डोळ्यांना इजासुद्धा होऊ शकते.

त्राटक हे षट्‌कर्मामधील एक कर्म होय. शरीरात मेद (चरबी) व कफदोष जर अधिक वाढले असतील तर ते प्राकृत अवस्थेत आणण्यासाठी षट्‌कर्म ही प्राणायामाच्या अगोदर करावीत. ज्यांचे दोष समस्थितीत/समावस्थेत असतील त्यांनी षट्‌कर्म करायची गरज नाही. षटकर्म- धौती, बस्ति, नेति, त्राटक, नौली व कपालभाती अशे सहा. त्राटक केल्याने डोळ्यांना शक्ती मिळते, नेत्ररोग होत नाहीत, दूरची-जवळची नजर/दिसणे सुधारते. डोळ्यातील कफ कमी झाल्याने डोळे स्वच्छ होतात. जास्त झोप येणे, झोप व्यवस्थित न लागणे, मानसिक विकार यांसारख्या तक्रारींमध्ये लाभ होतो.
आयुर्वेदानुसार डोळे (ज्ञानेंद्रिय/चक्षुरेन्द्रीय) हे अग्नी महाभूतापासून बनतात व अग्नीमुळेच डोळ्यांना व्यवस्थित कार्य करण्याची शक्ती मिळते.

त्राटक म्हणजे कुठल्याही एखाद्या दिवा किंवा दिव्याच्या जळणार्‍या वातीसारख्या, सूक्ष्म व बारीक वस्तूला डोळ्यांची उघडझाप न करता एकटक बघत राहणे, जोपर्यंत डोळ्यांतून अश्रु येत नाहीत! हे तुम्ही एखाद्या बंद खोलीत करू शकता जिथे फक्त तुम्ही आणि दिव्याचा प्रकाशच असेल. खिडकीतून प्रकाश आत येत असेल तर खिडकीला पडदे लावावेत जेणेकरून प्रकाश आत येणार नाही.

सर्वप्रथम पेटता एक दिवा अथवा मेणबत्ती आपल्या शरीराच्या एक मीटर/एक हाताच्या अंतरावर ठेवावी. शक्यतो जमिनीवर (योगचटईवर) मांडी घालूनच पद्मासनासारख्या ध्यानात्मक मुद्रेतच बसावे व दिवा हा नजरेच्या समोरच असावा (न जास्त वर, न जास्त खाली) म्हणजे मान सरळ राहील. जर दिवा नसेल, लावणे शक्य नसेल तर भिंतीवरचा एखादा टिंब/बिंदुसुद्धा आपण त्राटकाकरिता वापरू शकतो. जर बिंदु नसेल तर एखादा लहान बिंदु एक हाताच्या अंतरावरून दिसेल एवढा, आपण भिंतीवर काढू शकतो. पाठीचा कणा सरळ ठेवावा. जोपर्यंत डोळ्यांतून पाणी यायला सुरुवात होत नाही, तोपर्यंत एकटक त्या पेटत्या दिव्याच्या वरच्या टोकाला/ भिंतीवरच्या बिंदुला बघत राहावे. प्रथम ज्वालेच्या (फ्लेम) बाहेरील बाजूस व नंतर आतील बाजूस असे बघत राहावे. डोळ्यांतून पाणी येऊ लागल्यास तिथेच थांबावे, डोळे बंद करावेत व डोळे बंद असतानाच वर-खाली, उजव्या-डाव्या व वर्तुळात (गोल/सर्कल) मध्ये डोळे फिरवावेत मान न हलवता. आता डोळे उघडून, थंडगार पाणी डोळ्यांना लावावे (पाणी डोळ्यांवर मारू नये एवढी काळजी घ्यावी).

जर दिवा लावायचा असेल तर पणतीमध्ये तिळाचे तेल/तूप घालावे. प्राचीन काळात एरंडेल (कॅस्टर ऑइल) वापरायचे. एरंड तेल घालून पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश सर्वात लक्ख, उजळ, चकचकीत (ब्राईट) असायचा. त्राटक हे सूर्य उगवतो (सनराईज) व सूर्य मावळतो (सनसेट) त्या वेळेच्या सूर्यास बघून करायचे असते व हेच त्राटक श्रेष्ठ असे सांगितले आहे. पण सुरुवात करत असताना दिव्यापासूनच करावे व नंतर सूर्य हा पर्याय निवडावा कारण सूर्याची किरणे ही अधिक प्रभावशाली असल्याने डोळ्यांना इजासुद्धा होऊ शकते. म्हणून वैद्यांचा/तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.
त्राटक ३ प्रकारचे असते. त्राटक हे एखादा तारा (स्टार), कागदावर ॐ काढून त्यावर लक्ष केंद्रित करून, भ्रूमध्य (दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष ठेऊन) किंवा नासाग्र (नाकाच्या टोकावर) यावर पण करू शकतो.