श्‍वेत प्रदर (अंगावर पांढरे जाणे)

0
1169

– डॉ. स्वाती अणवेकर  ( आयुर्वेद तज्ज्ञ)

अंगावर पांढरे जाण्याची अनेक कारणे आहेत त्यातील काही कारणे ही शरीरातील नैसर्गिक प्रक्रियांशी निगडित असतात आणि या प्रक्रिया जशा थांबतात तसेच अंगावर पांढरे जाणेदेखील आपोआप थांबते.
दुसर्‍या प्रकारची कारणे ही शरीरातील विकृतीमुळे स्राव उत्पन्न करतात.

मुक्ता दिवसेंदिवस बारीक होत होती. अशक्तपणादेखील भरपूर वाढला होता. तिचे हातपाय व कंबर कायम दुखायचे. मासिक पाळीदेखील नीट येत नव्हती. दोन-तीन वर्षे पुष्कळ औषधोपचार झालेत. पण म्हणावा तसा फरक काही दिसेना. शेवटी तिचे मिस्टर आपल्या मित्राच्या सांगण्यावरून तिला एका प्रसिद्ध आयुर्वेदीक वैद्याजवळ घेऊन गेले. तेव्हा त्यांना कळले की मुक्ताची ही अवस्था तिच्या अंगावरून सतत पांढरे जात असल्यामुळे झाली आहे.
आपल्या आजुबाजूला असा कितीतरी बायका असतील ज्यांना ही तक्रार पुष्कळ वर्षांपासून असेल, पण बरेचदा निष्काळजीपणा, लाज, अज्ञान या कारणांमुळे बायका या तक्रारीचा सविस्तर उलगडा करणे टाळतात आणि जेव्हा हा प्रकार उघडकीस येतो तेव्हा मात्र बरेचदा प्रकरण फार पुढे गेलेले असते. आणि कधी कधी तर गर्भाशय काढायची देखील पाळी येते.
अंगावर पांढरे जाणे याला अर्वाचीन वैद्यक शास्त्रात ल्युकोरिया असे म्हणतात तर आयुर्वेदात याला श्‍वेत प्रदर म्हटले जाते. अंगावर असे पांढरे जाण्याचा त्रास कधी कधी स्त्रियांना फारच त्रासदायक ठरतो. जेव्हा यामध्ये जीवाणू संक्रमण होते तेव्हा तर त्या स्रावाला पूसारखे स्वरूप प्राप्त होते आणि दुर्गंधदेखील येऊ लागतो. कधी कधी सारखे पॅड किंवा कपडा बाळगावा लागतो. जेव्हा अशा स्रावातून जिवाणू संक्रमण होते तेव्हा प्रजनन मार्गातून असा पू सदृश स्राव सतत होत राहतो. त्यासोबतच ओटीपोटात दुखणे, कंबर, हातपाय, पाठ दुखणे, अशक्तपणा जाणवणे, भूक न लागणे, मासिक पाळी अनियमित होणे अशा तक्रारी सुरू होतात. जर यात जीवाणू संक्रमण झाले नसेल तर त्यास दुर्गंध येत नाही पण पुष्कळ सफेद स्राव अंगावरून होतच राहतो.
अंगावर पांढरे जाण्याची अनेक कारणे आहेत त्यातील काही कारणे ही शरीरातील नैसर्गिक प्रक्रियांशी निगडित असतात आणि या प्रक्रिया जशा थांबतात तसेच अंगावर पांढरे जाणेदेखील आपोआप थांबते. प्रथम आपण ती कारणे पाहूयात…
– पौगंडा अवस्था अर्थात प्युबर्टीमध्ये योनीमधून असा स्राव होणे स्वाभाविक आहे.
– ओव्ह्युलेशनच्या वेळेस.
– गर्भावस्थेत
– अति शरीरसंबंध केल्याने
अशा कारणांमुळे होणारा स्राव हा सिमीत असतो व कारण नष्ट झाले की उपचार न करता देखील तो आपोआप थांबतो.
दुसर्‍या प्रकारची कारणे ही शरीरातील विकृतीमुळे स्राव उत्पन्न करतात ती आपण पाहूया…
– कृमी
– ऍनिमिया
– अंतःस्रावी ग्रंथींचे आजार
– मानसिक कारणे
– जीवाणू संक्रमण
– गर्भाशयाच्या तोंडास जखम होणे
– गर्भाशय खाली सरकणे
– कंबरेमध्ये स्थित अवयवांना संसर्ग होणे
– योनीमध्ये अल्सर होणे
– गर्भाशयात गर्भनिरोधक असणे
– गर्भधारणात
– माहीत नसलेली कारणे
पुढील मुद्दा सांगायचा झाल्यास बरेचदा अंगावर पांढरे जाण्याची काही अन्य कारणेदेखील असतात, ज्यामध्ये जननांगाची नेहमी व खास करून मासिक पाळीच्या वेळेस नीट काळजी घेतली न जाणे, स्वच्छता न बाळगणे, कुपोषण, असुरक्षित संभोग, वारंवार झालेले गर्भपात, वाहनावर बसून अति प्रवास करणे, अति शारीरिक श्रम, नीट विश्रांती व झोप न घेणे, व्यसनाधीनता इत्यादी कारणांमुळे देखील योनी व गर्भाशयाचा भाग कमकुवत होऊन जंतुसंसर्ग होऊ शकतो.
पुष्कळ वेळेस हा स्राव दुर्गंधरहित व पातळ असा असतो. पण जेव्हा यामध्ये संसर्ग होतो व ते निष्काळजीपणामुळे वाढते तेव्हा त्याला पुय सदृश स्वरूप प्राप्त होते व घाण वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत औषधोपचारांची गरज भासते.
क्रमशः…