श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल.

0
138
  •  मनोहर जोशी
    (फोंडा)

श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेनं ‘स्वरनाद’ ही सर्व शैक्षणिक साधनांनी परिपूर्ण अशी कर्णबधीर मुलांसाठी सुरू केली. तिथे प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहे. वाचनालय आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एका वर्षात पंचवीस उपक्रम राबवण्याइतके मनुष्यबळ आज संस्थेकडे आहे आणि हे सर्व कार्य फक्त महिला आपापले घरसंसार सांभाळून करतात… त्या स्त्रीशक्तीला सलाम.

साहित्य संमेलन महिला आयोजित करतात म्हणून त्याला महिला साहित्य संमेलन असं म्हणायचं. पण याचा अर्थ असा नाही की ते फक्त महिलांसाठीच आहे. पुरुषवर्गानेही आवर्जून उपस्थित राहून या संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन या निमित्ताने करावेसे वाटते.

फोंड्याची ‘श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था’ या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. एखाद्या संस्थेच्या दृष्टीने २५ वर्षांचा कालावधी कदाचित फार मोठा नसला, तरी गेल्या २५ वर्षात संस्थेनं काय कमावलं, काय गमावलं याचा आढावा घेण्याइतपत निश्चित पुरेसा आहे आणि त्या दृष्टीने पाहिलं तर या संस्थेनं गेल्या २५ वर्षात बरंच काही कमावलं आहे असं म्हणावं लागेल. १९ डिसेंबर १९९२ या दिवशी ‘श्री शारदा बाल वाचनालय’ या नावाने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला संस्थेची परिस्थिती नाजूकच होती. मिळतील ती पुस्तके घेऊन वाचनालय सुरु केले. संस्थेच्या सदस्यांनी वर्गणी जमा करून काही पुस्तकांची भर घातली. दात्यांना आवाहन केले आणि पुरेशी पुस्तके जमा झाली. पण जागेची समस्या होतीच. कधी या घरात तर कधी त्या घरात असं करता करता विश्व हिंदू परिषदेच्या इमारतीत एक खोली मिळाली आणि वाचनालय स्थिर झाले. बालवाचकांची संख्याही वाढू लागली आणि संस्थेच्या सदस्यांना हुरूप आला. मुलं सुसंस्कृत व्हायची असतील तर त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवली पाहिजे याची जाण असलेल्या सदस्यांनी मुलांना वाचनालयाकडे आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या अंगी असणार्‍या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा सुरु केल्या. झरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सवात मुलांचे कार्यक्रम सादर केले. हळूहळू पालकही संस्थेशी जोडले जाऊ लागले आणि संस्थेला स्थैर्य लाभले.

याच दरम्यान वंदनीय थोर साहित्यिका माधवीताई देसाई यांचा संस्थेत प्रवेश झाला आणि त्यांच्या परिसस्पर्शाने संस्थेने कात टाकायला सुरुवात केली. वाचनालयाच्या परिघात न राहता बाहेर पडा, काहीतरी करून दाखवा. वाचा, लिहा. तुमच्यातल्या कलागुणांना कोंडून ठेवू नका. त्यांना वाव द्या. असं त्या नेहमी सांगत. त्यांच्या या प्रोत्साहनाने महिला भारावल्या. आणि माधवीताईंनी महिला साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली. महिला साहित्य संमेलनाचे हे शिवधनुष्य पेलवेल का अशी भीती प्रारंभी वाटत होती. पण माधवीताईंनी विश्वास दिला आणि सर्वजणी उत्साहाने कामाला लागल्या. संमेलनाला प्रमुख अतिथींना निमंत्रित करायची जबाबदारी माधवीताईंनी घ्यावी आणि संमेलनाची तयारी संस्थेच्या सदस्यांनी करावी असे ठरले. आपण काहीतरी वेगळं करतोय या विचाराने भारलेल्या महिला, घरचे कार्य असावे अशा उत्साहाने कामाला लागल्या. संमेलनासाठी हॉल आरक्षित करणे, व्यासपीठ, त्याची सजावट, खुर्च्यांची व्यवस्था, संमेलनाला आलेल्यांची नाश्ता-भोजनाची व्यवस्था, ध्वनियंत्रणा, निमंत्रित पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रसिद्धी अशी एक का दोन अनेक कामे होती. पण सर्वांनी त्यांना शक्य होतील त्या जबाबदार्‍या उचलल्या. आणि अत्यंत सुनियोजितपणे आयोजन करून पहिल्या वहिल्या साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले.

प्रचंड आत्मविश्वास लाभलेल्या संस्थेच्या सदस्यांनी मग मागे वळून पहिले नाही. यंदाचे हे सलग पंधरावे संमेलन आहे हे लक्षात घेतले तर स्त्रीशक्ती काय करू शकते याची जाणीव होईल. या संमेलनाला साहित्य आणि कला क्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती लाभली. अनेकींनी स्फूर्ती घेऊन त्यांचे कथा, काव्य संग्रह प्रसिद्ध केले. स्त्रीप्रतिभेचे अविष्कार यानिमित्ताने पाहायला मिळाले. आपणही लिहू शकतो, श्रोत्यांपुढे उभं राहून बोलू शकतो, उत्कृष्ट सूत्रसंचालन करू शकतो याचा साक्षात्कार त्यांना झाला. घर-संसार याच्या पलीकडे न पाहणार्‍या स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा विकास चारी अंगाने होऊ लागला आणि त्याचबरोबर संस्थेचाही. संस्थेचे कार्य आता फोंड्यापुरतेच मर्यादित राहिले नाही. शिरोडा, पणजी, वास्को यासारख्या ठिकाणच्या महिला स्वयंस्फूर्तीने पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्या गावात साहित्य संमेलने यशस्वी करून दाखवली. थोडक्यात सांगायचे तर ही संस्था राज्यव्यापी झाली.

संस्थेनं आता आणखी एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले. जन्मतः कर्णबधीर असलेली मुले मोठ्या संख्येने आहेत. ती मुले बोलूही शकत नाहीत. त्यांच्या न बोलण्याचे कारण कर्णबधिरत्व हे असते. योग्य वेळी योग्य वैज्ञानिक उपचार व ‘स्पीच थेरपी’ दिली तर ही मुले सामान्य मुलांप्रमाणेच आपले जीवन जगू शकतात. हे लक्षात घेऊन ‘स्वरनाद’ ही शाळा सुरु करण्याचे ठरवले. हा उपक्रम हाती घेणे म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्यासारखे होते. पण पुन्हा स्त्रीशक्ती उभी राहिली. प्रत्येकीने आपल्याला जमेल तितका हातभार लावला. समाजातले काही सहृदयी दातेही संस्थेच्या मदतीला आले आणि अथक प्रयत्नानंतर ही शाळा उभी केली. आपल्या मुक्या मुलाच्या तोंडून शब्द फुटताना पाहून गहिवरलेल्या पालकांच्या डोळ्यात उभे राहिलेले आनंदाश्रू हे संस्थेला मिळालेले आशीर्वाद आहेत असे मला वाटते आणि अशा आशीर्वादाच्या बळावरच ही संस्था भविष्यात याहीपेक्षा भव्य कार्य करेल याची मला खात्री वाटते.

या आगळ्या वेगळ्या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे संस्थेचा सर्व कार्यभार महिला आणि फक्त महिलाच पाहतात. मग ते भाषण असो, ग्रंथदिंडी असो, व्यासपीठाची सजावट असो किंवा शिडीवर उभं राहून पताका किंवा बॅनर लावण्याचं काम असो. संस्थेमध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक, लघुउद्योजिका, गृहिणी अशा सर्व स्तरातील महिला आहेत. त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्या त्यांच्या पदावर असतात. पण संस्थेत आल्यावर मात्र त्या सर्व सख्या होतात. सामान्यतः आढळणारे रुसवे फुगवे, गटबाजी इथे नाही. अगदी चहाचे कप उचलायचे असले तरी हे काम माझे नाही असे कोणी म्हणत नाही. सर्व सख्यांच्या आत्मीयतेचा, प्रेमाचा आणि मैत्रीचा एक सुंदर गोफ ‘श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थे’च्या रूपाने विणला गेला आहे.

या विश्वासावरच संस्थेनं फोंड्याच्या मध्यवर्ती भागात स्वतःची वास्तू घेतली आहे. तिथे ‘स्वरनाद’ ही सर्व शैक्षणिक साधनांनी परिपूर्ण अशी कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालते. तिथे प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहे. वाचनालय आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एका वर्षात पंचवीस उपक्रम राबवण्याइतके मनुष्यबळ आज संस्थेकडे आहे आणि हे सर्व कार्य फक्त महिला आपापले घरसंसार सांभाळून करतात… त्या स्त्रीशक्तीला सलाम.
हे साहित्य संमेलन महिला आयोजित करतात म्हणून त्याला महिला साहित्य संमेलन असं म्हणायचं. पण याचा अर्थ असा नाही की ते फक्त महिलांसाठीच आहे. पुरुषवर्गानेही आवर्जून उपस्थित राहून या संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन या निमित्ताने करावेसे वाटते.
भविष्यात या संस्थेकडून याहीपेक्षा अधिक भव्य कार्य घडो अशा मन:पूर्वक शुभेच्छा.