श्री मनाचे श्‍लोक

0
341

नको रे मना क्रोध हा खेदकारी|
नको रे मना काम नानाविकारी॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू|
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
भावार्थ ः
हे मना, दुःख देणारा, खेद उत्पन्न करणारा राग करू नकोस. तसेच विविध प्रकारचे विकार उत्पन्न करणारे वाईट विचार मनात बाळगू नकोस. कोणत्याही प्रकारचा लोभ देहात साठवू नकोस, अन् मत्सर, दंभ या विकारांनी आपले मन भरून ठेवू नकोस.
या श्‍लोकामधून समर्थ रामदास स्वामीना हे सांगायचे आहे की, काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे सहा विकार आपल्या प्रगतीतील अडथळे आहेत. ते आपल्या भक्तिमार्गावरचे षड्‌रिपू आहेत. त्यांपासून नित्य दूर राहा. कामादी विकार हे आत्मनाशाचे बीज आहे. या सहा विकारांवर नियंत्रण ठेवा. खरे म्हणजे समर्थांनी या ठिकाणी ‘चित्तशुद्धी’ सांगितलेली आहे. समर्थ रामदास दांभिकपणाच्या विरोधात होते. समर्थांच्या या श्‍लोकाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण आपले मन शुद्ध ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.