श्रीलंकेत परिवर्तन

0
104

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना तेथील अल्पसंख्यक मतदारांनी पराभवाची धूळ चारली आहे. सिंहलींची मते त्यांच्या पारड्यात भरभरून पडलेली असली, तरी तामीळ आणि मुस्लीम मतदारांनी त्यांची हुकूमशाहीच्या वाटेने गेलेली राजवट पूर्णपणे नाकारली. दक्षिण श्रीलंकेतील सिंहलीबहुल मतदारसंघांमध्ये मतांची आघाडी घेऊनही अल्पसंख्यकबहुल उत्तर आणि ईशान्य भागांतील मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारले. राजपक्षे यांना त्या भागात तीन लाख, तर त्यांचे प्रतिस्पर्धी मैत्रीपाल श्रीसेना यांना पावणेदहा लाखांपर्यंत मते तेथे मिळाली. अल्पसंख्यकांचा हा कौलच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरला आहे. महिंदा राजपक्षे यांचा अतिआत्मविश्वास त्यांना नडल्याचे दिसते, कारण आपला राष्ट्राध्यक्षपदाचा तिसरा कार्यकाल पूर्ण झालेला नसताना आणि तो पूर्ण होण्यास तब्बल दोन वर्षे बाकी असतानाच राजपक्षे यांना आपली देशावरील पकड सिद्ध करण्याची घाई झाली होती. अल्पसंख्यक मतदारांना जिंकण्यासाठी भारतीय सिनेस्टार सलमान खानलाही त्यांनी प्रचारासाठी नेले होते. पण तामिळी जनता एलटीटीईचा खात्मा करताना आपल्यावर झालेले अत्याचार विसरली नाही. मतपेटीतून त्यांनी पुरेपूर सूड उगवला. महिंदा राजपक्षे यांची श्रीलंकेतील गेल्या नऊ वर्षांची राजवट अशी अपमानास्पद परिस्थितीत संपुष्टात आली आहे. खरे तर त्यांनी श्रीलंकेला यादवी युद्धाच्या खाईतून वर काढले. एलटीटीईसारख्या जगातील सर्वांत कडव्या दहशतवादी संघटनेला जमीनदोस्त केले. अत्यंत निर्दयपणे सैन्यबळावर त्या संघटनेला आणि तिच्या समर्थकांना चिरडून टाकले. पण हे करीत असतानाच देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग असलेल्या तामिळींवरही अनन्वित अत्याचार केले गेले. युद्धकाळात झालेल्या छळांच्या त्या कहाण्या जगाला सुन्न करून गेल्या. राजपक्षे यांनी देशावरील आपली पकड राखण्यासाठी देशाचे संविधानही बदलले आणि तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्याचा आपला मार्ग खुला करून घेतला. अठराव्या घटनादुरूस्तीने त्यांच्या हाती सगळे अधिकार एकवटले. श्रीलंकेची जनता हे सगळे पाहात होती. त्यामुळे जेव्हा राजपक्षेंच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री असलेले मैत्रिपाल श्रीसेना विरोधकांना जाऊन मिळाले, तेव्हा त्यांच्यामागे या हुकूमशाहीवर नाराज असलेल्या सिंहलींनी आणि त्यांची हुकूमशाही नीती मान्य नसलेल्या सगळ्या अल्पसंख्यक समुदायांनी आपले बळ उभे केले. तामिळी तर नाराज होतेच, शिवाय तेथील मुस्लीमांवर आक्रमक बौद्ध गटांनी हल्ले चढवल्याने तेही राजपक्षे यांच्या विरोधात गेले. त्यामुळे श्रीसेना यांच्या पाठीशी या सगळ्या शक्ती उभ्या राहिल्या आणि राजपक्षे यांच्या राजवटीची कबर खोदली गेली. जनतेला दिलेले शंभर दिवसांत परिवर्तनाचे आश्वासन आता श्रीसेना यांना पाळावे लागेल. सर्वांत आधी त्यांना घटनादुरूस्ती करावी लागेल. पण संसदेत सध्या राजपक्षे यांच्या युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्सचेच बहुमत आहे. त्यामुळे या समस्येतून मार्ग आधी काढावा लागेल. कदाचित संसद निवडणुकाही जाहीर कराव्या लागतील. आपल्या विजयात अत्यंत महत्त्वाचा वाटा असलेल्या तामिळी आणि मुस्लिमांना त्यांच्या भवितव्याच्या वाटा खुल्या करून द्याव्या लागतील. भेदभावाचे राजकारण करणार नाही याची ग्वाही द्यावी लागेल. राजपक्षे यांची राजवट जशी फोडा आणि झोडा नीतीने कलंकित झाली होती, तशीच ती भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीमुळेही बदनाम झाली होती. सगळीकडे त्यांनी आपलेच बगलबच्चे घुसवले असा त्यांच्या विरोधकांचा त्यांच्यावरील आरोप आहे. त्यामुळे राजपक्षे यांच्या पराभवात त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आणि वशिलेबाजीच्या या आरोपाचाही मोठा वाटा आहे. भारतासाठीही श्रीलंकेतील हे परिवर्तन महत्त्वाचे आहे. राजपक्षे यांनी सतत चीनला झुकते माप दिले. जपानसारख्या भारताच्या मित्रदेशाला बाजूला काढून चीनला जवळ करून त्यांच्या आर्थिक मदतीचा ओघ आपल्या देशाकडे वळवला. भरीस भर म्हणून चिनी पाणबुड्यांना कोलंबो बंदरात उतरायला देऊन राजपक्षे यांनी भारताचा रोष ओढवून घेतला. आता नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर येणारे श्रीसेना यांनी चीन आणि भारत या दोघांशीही समान मैत्री करण्याचे सूतोवाच केलेले असल्याने या संधीचा लाभ घेत भारताने आपल्या श्रीलंकेशी आपले मैत्रिपूर्ण संबंध दृढ करण्याची गरज आहे.