श्रीलंकेतून नारळ आयात करणार ः कृषिमंत्री

0
129

राज्यात नारळाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत असून त्यांना स्वस्त दरात नारळ मिळवून देण्यासाठी श्रीलंका देशातून नारळ आयात करणार असल्याची माहिती कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी काल फातोर्डा येथे दिली. या बाबतीत कृषी संचालकांशी बोलणी केली आहे. डिसेंबर महिन्यातील नारळाचा पाडा झाल्यानंतर नारळ स्वस्त होईल, असा अंदाज होता. पण तसे झाले नाही असे कृषिमंत्री म्हणाले. फातोर्डा टपाल कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

गोव्यातील कृषी फार्ममध्ये जो नारळ विकत घेतला जातो तो फलोद्यान गाड्यांवर स्वस्तात विकत देण्याची व्यवस्था केली तरी फायदा होणार नाही. आता मोठ्या बागायतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून सरळ नारळ कृषी खात्याने विकत घ्यायचा व सर्वसामान्य जनतेला स्वस्तात मिळवून द्यायचा असा उपाय आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. गोव्याला किती नारळाची गरज आहे त्याचा अंदाज करण्यात कृषी खात्याला सांगण्यात आले आहे. तालुक्यातील एका मध्यवर्ती जागी कृषी खात्याने कमी दरात नारळ उपलब्ध करून दिल्यास लोकांना ते मिळू शकतील काय? याबाबत चाचपणी चालू आहे, असे मंत्री म्हणाले.

गोमांस संबधी गोवा सरकारने चुकीचा निर्णय घेतला असून सरकारने जनतेसाठी सहज पुरवठा करण्यासाठी पावले उचलावी लागतील. आज होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्‍न उपस्थित करणार आहोत. गोव्यातील लोकांचे ते अन्न असून ते पुरवठा करण्यासाठी सरकारने गंभीरपणे विचार करायला हवा, असे सरदेसाई म्हणाले.