श्रीलंकेतील मृत्युतांडव

0
132

श्रीलंकेमध्ये काल ईस्टर संडेला दहशतवाद्यांनी घडवून आणलेले मृत्यूचे तांडव भयावह आहे. एका परीने ही भारताच्याच उंबरठ्यावर दिली गेलेली दस्तक आहे. जगाचा कोणताही कोपरा आज दहशतवादापासून सुरक्षित नाही हेच श्रीलंकेतील या भीषण बॉम्बस्फोट मालिकेने जगाला दाखवून दिले आहे. खरे म्हणजे तब्बल तीस वर्षे धुमाकूळ घालणार्‍या लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलमसारख्या जगातील सर्वाधिक धोकादायक दहशतवादी संघटनेचा समूळ निःपात करण्यात यशस्वी ठरलेल्या श्रीलंकेमध्ये गेले दशकभर पूर्ण शांतता होती. तामिळी दहशतवादाने पुन्हा डोके वर काढू नये याचा पूर्ण बंदोबस्त त्या देशाने केला. त्यासाठी प्रसंगी मानवाधिकारांची वगैरे तमा न बाळगता अत्यंत कडक उपाययोजना केली गेली. परिणामी लिबरेशन टायगर्ससारख्या अत्यंत जहाल दहशतवादी संघटनेचा समूळ नायनाट करणे त्या देशाला शक्य झाले. काल घडवून आणली गेलेली आत्मघाती बॉम्बस्फोटमालिका ही तामिळी दहशतवाद्यांनी नव्हे, तर आयसिसचे पाठबळ असलेल्या इस्लामी दहशतवाद्यांनी घडवून आणली असल्याचा दाट संशय आहे आणि म्हणूनच केवळ त्या देशासाठीच नव्हे, तर भारतासाठी देखील हा अतिशय चिंतेचा विषय आहे. अशा प्रकारचा एखादा दहशतवादी हल्ला चढवला जाऊ शकतो याची पूर्वसूचना भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दहा दिवसांपूर्वीच श्रीलंकेला दिलेली होती. श्रीलंकेच्या पोलीस प्रमुखांनी तशी स्पष्ट कबुली काल दिली आहे, परंतु गेले दशकभर देशात शांतता असल्याने त्या इशार्‍याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नसावे. काल सकाळी उजाडल्यापासून जी बॉम्बस्फोटमालिका सुरू झाली तो श्रीलंकेच्या सरकारसाठी आणि सुरक्षा यंत्रणांसाठी फार मोठा धक्का होता. दहशतवादाला धर्म नसतो असे जरी म्हटले जात असले तरी इस्लामी मूलतत्त्ववादी संघटना श्रीलंकेत गेल्या काही वर्षांपासून डोके वर काढत आल्या आहेत. बौद्ध व ख्रिस्ती सिंहली आणि तामीळ व मुस्लीम अल्पसंख्याक यांच्यामध्ये श्रीलंकेच्या काही भागांत अधूनमधून संघर्ष सुरू असतो. याच संघर्षातून अलीकडेच त्या देशातील बौद्ध मूर्तींची मोडतोड व नासधूस करण्याचा प्रकार घडला होता. म्यानमारमधील रोहिंग्यांवर तेथील बौद्धांनी केलेल्या अत्याचाराच्या प्रतिक्रिया श्रीलंकेतही उमटल्या होत्या. कालचे बॉम्बस्फोट हे सरळसरळ तेथील ख्रिस्ती अल्पसंख्यकांना आणि विदेशी पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. बॉम्बहल्ल्यासाठी निवडली गेलेली ठिकाणे त्याची साक्ष देतात. चर्चमध्ये ईस्टरच्या रविवारी सकाळी प्रार्थनासभा सुरू असतानाच हे बॉम्बस्फोट घडवून आणले गेले आहेत. शिवाय काही आघाडीच्या पंचतारांकित हॉटेलांनाही ठरवून लक्ष्य करण्यात आले आहे. नॅशनल तौहित जमात या दहशतवादी संघटनेवर सध्या संशयाची सुई आहे, परंतु हल्ल्याचे एकूण स्वरूप आणि प्रमाण लक्षात घेता आंतरराष्ट्रीय दहशतवादी शक्तींचे पाठबळ त्याला निश्‍चितच असले पाहिजे. एकेकाळी श्रीलंकेतील तामिळींचा खात्मा करण्यासाठी तेथील सैन्यदलच मुस्लीम बंडखोर गटांना तामिळींविरुद्ध वापरून घेत असे. त्यासाठी त्यांना शस्त्रास्त्रे पुरवीत असे. एलटीटीईमध्ये करुणा गटाची फूट पडली, तेव्हा त्याच्याकडील शस्त्रास्त्रे या बंडखोरांना पुरविली गेली होती. तामिळी दहशतवाद संपुष्टात आला, परंतु विविध अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांच्यातील तेढ मात्र संपुष्टात आलेली नाही. अल फतह, सद्दाम ग्रुप, ओसामा ग्रुप, मुजाहिद वगैरे वेगवेगळ्या नावांनी जवळजवळ आठ जिहादी गट श्रीलंकेत कार्यरत होते आणि काही अजूनही आहेत. कालचा हल्ला हा न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमधील मशिदीवरील हल्ला, ईजिप्तमधील गतवर्षीचा पाम संडेच्या दिवशीचा हल्ला अशा स्वरूपाचा हा सुनियोजित हल्ला आहे आणि त्यामागे केवळ स्थानिक जिहादीच नव्हेत, तर आयसिससारखी मोठी ताकद असली पाहिजे. स्फोट घडवणारे दहशतवादी स्थानिक आहेत की विदेशातून पर्यटक व्हिसावर आलेले परदेशी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराक आणि सीरियामधून आयसिसला हुसकावून लावण्यात आलेले असले, तरी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अधूनमधून ‘लोन वूल्फ’ प्रकारचे एकाकी हल्ले चढविले जात असत. अलीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे हल्ले चढविले जाऊ लागल्याचे दिसते आहे. आता हे लोण दक्षिण आशियापर्यंत येऊन थडकलेले आहे. श्रीलंका हे खरे तर एक बेट आहे. मग एवढे स्फोट घडवण्यासाठी ही स्फोटके त्या देशात आली कशी आणि कुठून हा संशोधनाचा विषय ठरावा. ही स्फोटके निश्‍चितच समुद्रमार्गे आणली गेली असतील, तर त्याचा संबंध भारतीय किनारपट्टीशी असू शकतो. म्हणूनच भारतासाठीही हा धोक्याचा इशारा आहे. श्रीलंकेचे उत्तर टोक असलेले तलायमनात आणि भारताचे दक्षिण टोक धनुष्कोडी यामध्ये फक्त २९ किलोमीटरचे अंतर आहे!