श्रीलंकेतील आठ बॉम्बस्फोटांत २१५ ठार

0
167

श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरात काल सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत विविध ठिकाणच्या चर्च व चार पंचतारांकीत हॉटेल्समध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २१५ जण ठार व ४५० हून अधिक नागरिक जखमी झाले. मृतांमध्ये ३५ विदेशी नागरिक असून त्यात तीन भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. जगभरात काल ईस्टर संडे साजरा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या हल्ल्यांमुळे संपूर्ण जग हादरले असून याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर श्रीलंका सरकारने संध्याकाळी ६ पासून आज सकाळी ६ पर्यंत कोलंबोत संचारबंदी जारी केली. श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमे सिंगे यांनी भ्याड हल्ला अशा शब्दात या हल्यांचे वर्णन केले आहे. जगभरातील देशप्रमुखांनी या नृशंस हत्याकांडाचा निषेध केला आहे.

वृत्तसस्थांच्या माहितीनुसार सकाळी ८.३० वा. या आत्मघाती बॉम्बस्फोटांना कोलंबोतील ४५, नेगोम्बे भागातील सेंट अँटनी चर्चमध्ये प्रारंभ झाला. तेथे ६७ भाविक मृत्यूमुखी पडले. तर बट्टिकलोआ येथे २५ जण ठार झाले. सर्वात प्रथम बॉम्बस्फोट सेंट अँटनी चर्चमध्ये, दुसरा सेंट सेबेस्तियन चर्चमध्ये, तिसरा बट्टिकालो आतील चर्चमध्ये झाला. तसेच दशांग्रिला, द सिनामॉन ग्रांद, द किंग्सबरी या पंचतारांकीत हॉटेल्समध्ये नंतर स्फोट झाले.

दशकभराच्या शांततेनंतर
श्रीलंकेत पुन्हा हिंसाचार
श्रीलंकेत एलटीएटीईबरोबरील हिंसक संघर्षानंतर गेल्या दशकभराच्या काळात शांततेचे वातावरण दिसत असतानाच काल हे हल्ले झाले होते. ईस्टर संडेदरम्यान कोलंबोतील चर्च तसेच पंचतारांकीत हॉटेल्समध्ये विदेशी नागरिकांचा वावर असल्याने ही ठिकाणे हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. सिनामॉन ग्रांद या हॉटेलच्या रेस्टॉरंटसमोर एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून लावले अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र सर्वच बॉम्बस्फोट हे आत्मघाती होते की काय याची पुष्टी मिळाली नाही असे सांगण्यात आले. नॅशनल हॉस्पिटलमध्ये ६६ मृतदेह ठेवण्यात आले असून १०४ मृतदेह नेगोम्बो हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. जखमी झालेल्या ३६० जणांवर इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.
श्रीलंकेचे विदेश सचिव रवीनाथ अरियासिंघे यांनी ३५ विदेशी या हल्ल्यांमध्ये ठार झाल्याचे सांगितले.

तीन पोलीस ठार
या हल्ल्यांमध्ये पाकिस्तान, अमेरिका व बांगला देश या देशांमधील पर्यटकांचा जखमींमध्ये समावेश आहे. सर्वात शेवटचा बॉम्बस्फोट उत्तर कोलंबोमधील एका प्राणीसंग्रहालयाजवळ झाला व त्यात तिघेजण ठार झाले. यावेळी संशयावरुन पोलिसांची एक तुकडी तेथील एका घरात गेली असता तेथे असलेल्या हल्लेखोराने स्वत:ला उडवून लावले. त्यात त्याच्यासह तिघे पोलीस मृत्यूमुखी पडले.
श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी या हल्ल्यांमुळे आपल्याला जबरदस्त धक्का बसल्याचे सांगून नागरिकांनी शांतता पाळावी असे आवाहन केले आहे.

कोलंबो जिल्ह्यातील सर्व
प्रार्थना सभा रद्द
कोलंबो जिल्ह्यातील चर्चमधील सर्व प्रार्थना सभा रद्द करण्यात आल्याचे कार्डिनल माल्कम रंजित यांनी जाहीर केले आहे. दरम्यान श्रीलंकेतील भारतीय दुतावासाने आपण परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचे म्हटले आहे. श्रीलंकेतील सर्व पोलीस कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या सरकारने रद्द केल्या आहेत. तसेच रजेवरील डॉक्टर्स, परिचारिका यांना तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गोव्यातील चर्चेसना सुरक्षेचे आदेश

श्रीलंकेतील चार चर्चेस व चार हॉटेल्सवर झालेल्या बॉंम्ब हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील चर्चेसना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश आपण गोव्याचे पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काल पत्रकारांना सांगितले.
यासंबंधी आपण गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांच्याशीही बोलणार असल्याचे सावंत म्हणाले. श्रीलंकेवर झालेल्या बॉंबहल्ल्यांचा आम्ही निषेध करीत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.