श्रीलंकेचा सराव सामना आजपासून

0
144

तिसर्‍या फळीतील अध्यक्षीय एकादश संघाविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्याने श्रीलंकेचा संघ आजपासून भारत दौर्‍याची सुरुवात करणार आहे. २००९-१० सालानंतर श्रीलंकेचा संघ प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. १९८२ ते २०१७ या कालावधीत त्यांनी भारतीय भूमीवर १६ कसोटी खेळले असून यातील १० सामन्यात त्यांना पराजित व्हावे लागले आहे. आत्तापर्यंत त्यांना भारतात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

संजू सॅमसन नेतृत्व करत असलेल्या अध्यक्षीय एकादशविरुद्ध जादवपूर विद्यापीठाच्या मैदानावर भारतीय वातावरणाचा या दौर्‍यातील पहिला अनुभव चंदीमल व सहकारी घेणार आहेत. या मैदानातील खेळपट्टी प्रामुख्याने मध्यमगती गोलंदाजांना पोषक असल्याचे समजल्यानंतर लंकन खेळाडूंचा हिरमोड झाला आहे.
प्रमुख खेळाडूंनी रणजी स्पर्धेला प्राधान्य दिल्याने बीसीसीआयने हैदराबाद, केरळ, मध्य प्रदेश व पंजाबमधील खेळाडूंना या सामन्यासाठी निवडले आहे. त्यामुळे या सामन्याद्वारे त्यांना उच्च दर्जाच्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार नाही किंवा त्यांच्या गोलंदाजांना कसलेल्या फलंदाजांना गोलंदाजी टाकण्याचा मौकादेखील मिळणार नाही. सराव सामन्यासाठी नमन ओझा याची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. परंतु, त्याच्या दुखापतीमुळे पंजाबचा युवा खेळाडू अनमोलप्रीतला निवडण्यात आले आहे. अनमोलने रणजीच्या नुकत्याच झालेल्या छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात २६७ धावा केल्या होत्या.

श्रीलंका संघ ः दिनेश चंदीमल, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, लाहिरु थिरिमाने, निरोशन डिकवेला, दिलरुवान परेरा, रंगना हेराथ, सुरंगा लकमल, लाहिरु गमागे, धनंजय डीसिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, लक्षन संदाकन, विश्‍वा फर्नांडो, दासुन शनका व रोशन सिल्वा
अध्यक्षीय एकादश ः संजू सॅमसन, अभिषेक गुप्ता, आकाश भंडारी, आवेश खान, जलज सक्सेना, जीवनज्योत सिंग, रवी किरण, रोहन प्रेम, संदीप, तन्मय अगरवाल, संदीप वारियर व अनमोलप्रीत.