श्रीलंकेचा द. आफ्रिकेवर १९९ धावांनी विजय

0
112

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अपेक्षेप्रमाणे जिंकत श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच लंकेचा संघ बाजी मारेल अशी शक्यता होती. परंतु, थ्युनिस डी ब्रुईन व तेंबा बवुमा यांनी लंकेचा पराभव लांबवला. रंगना हेराथने दुसर्‍या डावात ६ बळी घेत लंकेला १९९ धावांनी विजय मिळवून दिला.

तिसर्‍या दिवसअखेरच्या ५ बाद १३९ धावांवरून काल पुढे खेळताना डी ब्रुईन व बवुमा यांनी लंकेच्या गोलंदाजांना हैराण केले. डी ब्रुईनने स्वीपचा प्रभावीपणे वापर करत लंकेच्या गोलंदाजांवर अंकुश ठेवला. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १२३ धावांची भागीदारी केली. जेवणाच्या वेळेला १५ मिनिटांचा खेळ शिल्लक असताना रंगना हेराथने बवुमाला यष्टिरक्षक डिकवेलाकरवी बाद करत ही धोकादायक जोडी फोडली. यानंतर लगेचच त्याने डी कॉकला पायचीतच्या सापळ्यात अडकवून दक्षिण आफ्रिकेच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. ब्रुईनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना १०१ धावांची शानदार खेळी केली. आठव्या गड्याच्या रुपात तो परतला. श्रीलंकेकडून हेराथव्यतिरिक्त दिलरुवान व धनंजया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मालिकेत ३५६ धावा केलेला सलामीवीर दिमुथ करुणारत्ने सामनावीर व मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या दोन्ही संघांत २९ जुलैपासून पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. यानंतर एकमेव टी-२० सामना होणार आहे.