श्रीनगरचा वणवा

0
82

पुण्याची एफटीआयआय, हैदराबादचे केंद्रीय विद्यापीठ, दिल्लीची जेनयू, प. बंगालचे जाधवपूर विद्यापीठ, पुण्याचे फर्गसन आणि आता श्रीनगरमधील एनआयटी. विद्यार्थ्यांमधील संघर्षाने या शिक्षणसंस्थांची आवारे खदखदत राहिली आहेत. कारणे वेगवेगळी आहेत, परंतु या सगळ्या संघर्षाचे अंतर्स्वरूप विरुद्ध विचारधारांतील द्वंद्व असेच आहे. श्रीनगर एनआयटीमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी जम्मू परिसरातील किंवा इतर राज्यांतील आहेत. फुटीर विचारसरणीच्या काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी टी२० सामन्यातील भारताच्या पराभवाचे निमित्त साधून अन्य विद्यार्थ्यांना खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यातून ठिणगी उडली आणि काश्मिरी विद्यार्थी आणि अन्य राज्यांतील विद्यार्थी यांच्यात जणू युद्ध पेटले. एनआयटीच्या प्रशासनाने खरे तर या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळायला हवे होते. परंतु ते घडले नाही आणि देशाभिमानी विद्यार्थ्यांच्या निषेध मोर्चाचे निमित्त होऊन पोलिसी हैवानपणाचे दर्शन देशाला घडले. एकेका विद्यार्थ्याला चौघे चौघे पोलीस घेरून निर्दयपणे लाठ्यांनी बडवत आहेत ही दृश्ये अस्वस्थ करणारी आहेत. या विद्यार्थ्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला, वरिष्ठ अधिकार्‍यांना जखमी केले, म्हणून ‘सौम्य’ लाठीमार करावा लागला असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळेच चित्र दर्शवते आहे. काश्मिरी पोलिसांनी या विद्यार्थ्यांना एवढे अमानुषपणे का हाताळले हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये लष्कराचा सर्वत्र वावर असल्याने ते अधिक प्रभावी असते. स्थानिक पोलिसांना तेथे लोक किंमत देत नाहीत. शिवाय सततच्या फुटिरतावादी कारवायांमुळे पोलिसांवरही सततचा मानसिक ताण असतो. या सगळ्या रागाचा भडका या लाठीमाराच्या निमित्ताने उडाला असावा. परंतु विद्यार्थ्यांना अशा प्रकारे हाताळणे योग्य नव्हते. काश्मिरी पोलीसही फुटिरांना सामील आहेत आणि देशाभिमानी विद्यार्थ्यांवर त्यांनी सूड उगवला असा चुकीचा संदेश या घटनेतून देशभरात गेला आहे. श्रीनगर एनआयटीमधील अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही आता निर्माण होणार आहे. दहशतवाद्यांकडून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. स्थानिक फुटिरतावाद्यांकडून एनआयटीमधील मुलींना बलात्कार करण्याच्या धमक्या यापूर्वी दिल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांना धमकावले गेले आहे. त्यामुळेच ही एनआयटी जम्मूला किंवा इतर सुरक्षित ठिकाणी हलवा अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे. वास्तविक देशात सुरवातीच्या काळात ज्या एनआयटी स्थापन झाल्या, त्यापैकी श्रीनगरची एक. फुटिरतावादाची कीड काश्मीरला लागण्यापूर्वी स्थापन झालेली ही संस्था आहे. परंतु सध्याच्या वादामुळे तिच्याकडे यापुढे असुरक्षिततेच्या भावनेतून पाहिले जाईल. या घटनेचे पडसाद अन्य राज्यांत शिक्षणासाठी जाऊन राहिलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांवरही उमटू लागले आहेत. राजस्थानमध्ये काही काश्मिरी विद्यार्थ्यांना निलंबित केले गेले. काश्मिरी युवकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्याचा जो प्रयत्न ‘सरहद’ सारखी संस्था करीत आलेली आहे, अशा सकारात्मक प्रयत्नांना अशा घटनांमुळे धक्का पोहोचेल. काश्मिरी युवकांचे दुःख अनेकपदरी आहे. ते सगळेच फुटिरतावादी आहेत असे नव्हे. काहींना केवळ स्वतःची कारकिर्द घडवायची आहे. परंतु तशा संधी राज्यात नाहीत. सतत भीतीच्या सावटाखाली राहायचे, उच्च शिक्षणाच्या पुरेशा सोयी नाहीत, पुरेसे मार्गदर्शन नाही अशा स्थितीत हे विद्यार्थी शिकण्याची धडपड करीत असतात. परंतु फुटिरतावाद्यांना ते नको आहे. त्यामुळे अशा उच्चशिक्षित तरुणांना कडव्या धर्मांधतेचे विष पेरून आपल्या जाळ्यात ओढण्याचा पद्धतशीर प्रयत्न ते करीत असतात. श्रीनगर एनआयटीमधील घटनेत अशा प्रवृत्तीला यश मिळाले आहे. हे लोण दूर पसरत जाणे त्यांच्या पथ्यावरच पडणार आहे. श्रीनगर प्रकरणात आणखी एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बुरख्याखाली देशविरोधी विचारसरणीला अप्रत्यक्षपणे खतपाणी घालणारे बुद्धिवादी जेएनयू प्रकरणात थयथयाट करीत होते, परंतु श्रीनगर एनआयटीतील सध्याच्या वादाबाबत मात्र सोईस्करपणे मूग गिळून राहिलेले दिसत आहेत. श्रीनगर एनआयटीमधील राष्ट्रवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना तेथील पोलिसांनी कँपसमध्ये घुसून अमानुषपणे मारले, त्याबाबत ही मंडळी ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे हे पुरस्कर्ते आता कुठे बरे दडून बसले आहेत?