श्रीदेवी मृत्यूप्रकरणाची फाईल दुबई सरकारकडून बंद

0
107

>> खाजगी विमानाने रात्री उशिरा पार्थिव मुंबईत दाखल; आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या गेल्या शनिवारी झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर या प्रकरणाचे कसून तपासकाम करून दुबई सरकारच्या वकिलांनी या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासकाम पूर्ततेनंतर श्रीदेवी यांचे पार्थिवही काल संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान रात्री ९.३० वा. श्रीदेवी यांचे पार्थिव खासगी विमानाने मुंबईला आणण्यात आले. त्यांच्यावर आज दुपारी २ वा. अंत्यसंस्कार होणार आहेत. विमानतळावर पार्थिव स्वीकारण्यासाठी बोनी कपूर, संजय कपूर, अर्जुन कपूर, अनिल कपूर, आदी उपस्थित होते.

श्रीदेवी यांचा मृत्यू प्रथम हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर त्या राहत असलेल्या हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतरच्या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले होते. या अहवालात त्यांच्या शरीरात मद्याचे अंश आढळल्याचेही नमूद करण्यात आले होते. यामुळे या प्रकरणाचे गुढ निर्माण झाले होते. दुबई पोलिसांना या मृत्यूविषयी संशयाची स्थिती वाटल्याने आपल्या कार्यपद्धतीनुसार सखोल तपासकाम करताना हॉटेलमधील कर्मचारी तसेच श्रीदेवींचे पती बोनी कपूर व त्यांच्या निकटवर्तियांची चौकशी केली.

श्रीदेवी यांचे पार्थिव घेऊन आलेले विमान विमानतळावर उतरल्यानंतर तेथे उद्योगपती अनिल अंबानीही उपस्थित होते. पार्थिव तेथील ऍम्बुलन्समध्ये ठेवल्यानंतर त्यात बोनी कपूर व संजय कपूर सोबत होते. सपाचे नेते अमर सिंग हेही उपस्थित होते. यावेळी विमानतळ ते लोखंडवाला परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विमानतळावरून कपूर यांच्या निवासस्थानी ऍम्बुलन्स १०.३० वा. पोचली.

कुटुंबियांकडून निवेदन

श्रीदेवी यांचे पार्थिव देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खुशी, जान्हवी, बॉनी कपूर व अय्यप्पन कुटुंबियांतर्फे कृतज्ञता व्यक्त करणारे एक निवेदन माध्यमांसाठी प्रसारीत करण्यात आले. श्रीदेवींच्या मृत्यूनंतरच्या भावनिक क्षणी प्रसारमाध्यमांकडून मिळालेले पाठबळ व संवेदनशीलता याबद्दल त्यांनी या निवेदनातून मन:पूर्वक धन्यवाद दिले आहेत.

तसेच श्रीदेवींच्या आज होणार्‍या अंत्यसंस्कार विधीं विषयीही या निवेदनात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत श्रीदेवी यांचे पार्थिव अंधेरी (पश्‍चिम) येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्‌स क्लब गार्डन नं. ५, लोखंडवाला-कॉम्लेक्स येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
श्रीदेवी यांची अंत्ययात्रा सेलिब्रेशन स्पोर्ट्‌स क्लब येथून विलेपार्ले समाज सेवा हिंदू स्मशानभूमी येथे जाण्यासाठी दु. २ वा. निघणार आहे.