श्रीगणेश महिमा वर्णावा किती!

0
166

– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
आपले सगळेच देव तसे पाहू जाता समाजधुरीण आहेत, मानवजातीचे कल्याण व्हावे अशी इच्छा बाळगणारे आहेत आणि या बाबतीत श्रीगणपती बाप्पा सगळ्यांत पुढे आहे. गणपती किंवा श्रीगणेश म्हणजे गणांचा स्वामी. गण म्हणजे समुदाय अथवा जमात. वेदांच्या संहिता, ब्राह्मणग्रंथ यामध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कुठेही निर्देश केलेला नाही. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन ‘तत्पुरूष’, ‘वक्रतुंड’, आणि ‘दंती’ या विशेषणांनी ‘नारायणोपनिषद’ नामक उपनिषदाच्या अखेरच्या भागात आलेले आढळते. लिंग, अग्नी, शिव आणि भविष्य इत्यादी पुराणांमध्ये श्रीगणेशाच्या अवताराची कथा निरनिराळ्या पद्धतीने सांगितली गेली आहे. गणेशपुराण नावाचे उपपुराण आहे. परंतु या पुराणामध्ये प्राचीन व अर्वाचीन असे दोन भाग मिसळले गेले आहेत. पुराणात कालांतराने भर पडत गेली व काही भाग गाळले गेले. म्हणून गणेश किंवा गणपती या सद्यःस्वरूपातील देवतेचा कालनिर्णय करण्यासाठी पुराणांचा फारसा उपयोग होत नाही, असे अभ्यासकांचे मत आहे.
महाभारताच्या आदिपर्वात अशी एक सुप्रसिद्ध कथा आहे की, ‘महाभारत लिहिले गेले तेव्हा व्यासमुनींचा लेखक गणपती होता. व्यासमुनी सांगत गेले, श्रीगणेश लिहीत गेले व मग महाभारत त्रिखंडांत पसरले.’
असा हा श्रीगणेश जसा सुखकर्ता आहे, तसाच तो विघ्नहर्ताही आहे. या श्रीगणेशाचे प्रत्येक शुभकार्याच्यावेळी पूजन करण्याची प्रथा हिंदू समाजामध्ये पूर्वीपासून रूढ झालेली आहे. मुख्य म्हणजे शुभकार्याच्या वेळी पूजा करताना श्रीगणेशाची मूर्तीच पाहिजे असे नाही तर तांदूळ, सातू किंवा गहू यांच्या पुंजीवर सुपारी ठेवून, नारळ ठेवून गणपतीला मनोभावे आवाहन करून पूजा केली व अखेरीस त्याचे विसर्जन केले, तरी श्रीगणेशाला ते पावन होते, असे मानले जाते.
श्रीगणेशाच्या उत्पत्तीसंबंधी वेगवेगळे मतप्रवाह असले तरी श्रीगणेश हे बुद्धीदैवत आहे. गणपती हा ॐकार स्वरुप असून सर्व विद्यांचे ते विकसित रूप आहे, यावर मात्र कुणाचे दुमत नाही. ज्ञानदेव महाराजांनी तर श्रीगणेशाचा महिमा गाताना, ‘ॐनमोजी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा| असे म्हणत, देवा तुचि गणेशु| सकल मति प्रकाशु॥ असे सार्थ वर्णन केले आहे.
श्री गणेशावर भक्ती असलेली मराठी माणसे देशात – विदेशात कुठेही असोत, जसे जमेल, जुळेल, परवडेल त्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करतात. मग तो श्रीगणेश दीड दिवसांचा असो, पाच दिवसांचा असो किंवा सात दिवसांचा असो. आता तर नऊ दिवस, अकरा दिवस श्रीगणेश पूजन करून विसर्जन केले जाते. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव अकरा किंवा एकवीस दिवस ठरलेला असतो. सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, भजन आणि विद्यार्थ्यांपासून प्रौढांसाठीच्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमांनी सार्वजनिक गणेशोत्सवात रंगत आणली जाते आणि मग या लंबोदराचे गजाननाचे, सिद्धिविनायकाचे थाटात विसर्जन केले जाते.
श्रीगणेशाचे एक वैशिष्ट्य सांगितले जाते, ते म्हणजे तो त्याच्या कुठल्याही अवतारात कुठेच केव्हाही पराभूत झालेला नाही. तो मैदानात उतरतो तो पूर्ण विचारांनी आणि पूर्णशक्तीनिशी. गणपती हा देवांचा सेनापती अशा या श्रीगणेशाने राक्षसांशी दोन हात करताना एकवीस सैनिकांचा एक असे गट स्थापन केले होते आणि त्या गटांवर एकेक गणप्रमुख अशी योजना केली होती. आजसुद्धा भारतीय सैनिकांची विभागवार रचना अशीच केली जाते आणि या रचनेचे सूत्र सर्वप्रथम श्रीगणेशाने अंमलात आणले, असे मानले जाते.
श्रीगणेश हा आपले वडील शंकराप्रमाणेच भक्तांना लवकर प्रसन्न होणारा आहे असे मानले जाते. अशा या श्रीगणेशाची जनमानसावर पडलेली मोहिनी प्रतिदिन वाढत आहे आणि गरीबातला गरीब माणूस भक्तिभावाने त्याची पूजा करून आत्मशांती मिळवतो, हे दृश्य आपणास पाहायला मिळते. श्रीगणेशाची लोकप्रियता आता सर्वमान्य झाली आहे आणि दीड दिवसांपासून एकवीस दिवसांपर्यंत मनोभावे श्रीगणेशाची मनोभावे सेवा, पूजा, आराधना, करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याच्यातूनच हे प्रथमेशाचे ईशस्वरुप लोकमान्य झाले आहे, याची प्रचीती आपणास होते.
लोकमान्य टिळकांनी सर्वधर्मसमभाव मानून सर्वांना एकत्र आणण्याचे सूत्र सार्वजनिक गणेशोत्सवातून केले, त्याचे मर्म शोधताना आपणास ॐ नमोजी आद्या| चा प्रत्यय येतो. यातच या गणेशाचा महिमा साठवला आहे, असे म्हणावेसे वाटते.
आपल्या देशात अठरापगड जातीजमाती आहेत. असंख्य आस्तिक जसे त्यात आहेत, तसेच असंख्य नास्तिकही आहेत. हा अर्थातच प्रत्येकाच्या मताचा, मनाचा, भावनेचा प्रश्‍न आहे. आपल्याला धार्मिकतेच्या नावाखाली कुठल्याही प्रकारचे राजकारण करून ईप्सित साध्य करायचे नाही, असे एकदा ठामपणे ठरवल्यानंतर श्रीगणेशाची कीर्ती कशी अंतराळापर्यंत पोचते व ती मानवाच्या अंतापर्यंत कशी चालूच राहणार आहे, याचे एक उदाहरण येथे द्यावेसे वाटते. एकविसावे शतक सुरू झाले, त्याची चुणूक शतकाच्या प्रारंभीच अवकाशात झेप घेणार्‍या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या सुकन्येने आपल्याबरोबर श्रीगणेशाची मूर्ती अंतराळात नेऊन दाखवली. असा हा श्रीगणेश तुम्हा-आम्हां सर्वांचे कल्याण करो. सज्जनांवर कृपा करताना वाट चुकलेल्या दुर्जनांना त्यांच्या सच्च्या व प्रामाणिक कार्यात मदत करतानाच ते यापुढे वाममार्गाने जाणार नाहीत, अशी सद्बुद्धी त्यांना देवो, हीच विनंती. श्रीगणेशायनमः|