श्रीकांतची आठव्या स्थानी घसरण

0
107

जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) काल गुरुवारी जाहीर केलेल्या साप्ताहिक क्रमवारीत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याला खराब कामगिरीचा फटका बसला आहे. दोन स्थानांच्या घसरणीसह श्रीकांत आठव्या स्थानी पोहोचला असून ‘टॉप १०’मधून बाहेर पडण्याच्या तो मार्गावर आहे.

समीर वर्मा (-२, २१वे स्थान), पारुपल्ली कश्यप (-२, ५१वे स्थान), लक्ष्य सेन (-१, ७८वे स्थान) व अजय जयराम (-२२, ९३वे स्थान) या ‘अव्वल १००’मधील खेळाडूंची पदावनती झाली आहे. केवळ साईप्रणिथ (+ २, २४वे स्थान) व आरएमव्ही गुरुसाईदत्त (+ ४, ९७वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. महिला एकेरीतही परिस्थिती वेगळी नाही. ‘फुलराणी’ सायना नेहवाल ‘अव्वल १०’मधून बाहेर फेकली गेली आहे. ताज्या क्रमवारीत ती ११व्या स्थानी आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदकाच्या बळावर पी.व्ही. सिंधूने आपला तिसरा क्रमांक राखला आहे. श्रीकृष्णप्रिया कुदरावली (-१, ७२वे स्थान) व रुत्विका शिवानी गड्डे (-१, ८०) यांना प्रत्येकी एका स्थानाचा तोटा झाला आहे. ‘अव्वल १००’ बाहेरील खेळाडूंमध्ये रितुपर्णा दास (-२५, १३४वे स्थान) व तन्वी लाड (-४८, २११वे स्थान) यांना सर्वाधिक फटका बसला आहे. गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईने दोन स्थाने वर सरकताना १२०वा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या खात्यात १४ स्पर्धांतून १३,६२० गुण जमा आहेत.

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी ही सर्वोत्तम स्थानावरील भारतीय जोडी दोन स्थानांची उडी घेत २३व्या स्थानी आली आहे. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी (-१) यांना असातत्यपूर्ण कामगिरीमुळे आपले २८वे स्थान गमवावे लागले आहे. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी (-२, २४वे स्थान) यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असून अश्‍विनी पोनप्पा व सात्विकसाईराज जोडी १२ स्थानांची झेप घेत २८व्या स्थानी विराजमान झाली आहे.