श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधन

0
342
  •  रमेश सावईकर

बहीण आपल्या भावावरची संकटे दूर करण्याची ईश्‍वराला प्रार्थना करते. व भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देऊन तिला प्रेमाची भेट म्हणून काहीतरी वस्तू देतो. अशा प्रकारे बहीण-भावातील हे नाते या सणामुळे दरवर्षी अधिकाधिक दृढ आणि घट्ट होते.

श्रावण महिना. देविदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा-प्रार्थना करून त्यांच्या कृपाप्रसादास पात्र होण्यासाठी धार्मिक विधी, सण, व्रतवैकल्ये करण्याचा हा महिना. श्रावण मासात केलेल्या भक्ती – व्रत – सेवा – साधनेचे फलित अन्य महिन्यांपेक्षा अधिक आहे.

श्रावण पौर्णिमा ही ‘नारळी पौर्णिमा’ म्हणून महाराष्ट्र, कोकण, गोवा व पश्‍चिम किनारपट्टीतील भागांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः मच्छीमारी करणारे कोळी लोक मोठ्या उमेदीनं-आनंदानं साजरी करतात. जलाची अधिष्ठात्री देवता असलेल्या वरुण देवाची प्रार्थना-पूजा करतात. खवळलेला समुद्र या दिवसापासून शांत होऊ लागतो. समुद्रात मच्छीमारी करण्यास गेल्यावर आपले रक्षण करावे, संकटे दूर व्हावीत म्हणून समुद्राची देवता असलेल्या वरुणाची पूजा – प्रार्थना करून आपले रक्षण करण्याची आळवणी मच्छीमारी समाजबांधव तसेच मीठ उत्पादक व इतर संबंधित व्यावसायिक करतात.

नारळी पौर्णिमेला शिवाची पूजा करतात. नारळाला तीन डोळे असतात, ते शिवाच्या तीन नेत्रांची प्रतिकृती आहे असे मानले जाते. यामुळे या दिवशी नारळाला फार महत्त्व दिले आहे. निसर्गाला विशेष महत्त्व देऊन लोक किनारपट्टी भागात नारळाचे रोपण करतात. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून बंद असलेला मच्छीमारी व्यवसाय या दिवसापासून सुरू होतो. मच्छीमारीसाठी वापरल्या जाणार्‍या होड्या, बोटी विविध रंगीत कागद – फुलांनी – रंगांनी हे लोक सजवतात. नारळाची विधिवत पूजा केल्यानंतर नारळ समुद्राला अर्पण करतात.

सजविलेल्या बोटीतून समुद्रात जवळच फेरफटका मारून मच्छीमार लोक किनारी परततात. नारळापासून बनविलेला गोड पदार्थ सर्वजण एकत्र बसून खातात. दिवसभर विविध कार्यक्रमांद्वारे आनंदाने दिवस साजरा करतात. येणार्‍या मोसमी वर्षात आनंद, सुख-समाधान, धनसंपत्ती प्राप्त व्हावी, वरुण देवाची कृपादृष्टी लाभून संकटांचा नाश व्हावा तसेच भगवान शंकराच्या कृपेने आपले जीवन मंगलमय व्हावे, अशी अपेक्षा बाळगून मोठ्या भक्तिभावाने कोळी समाजबांधव ही पौर्णिमा साजरी करतात.
श्रावणी पौर्णिमेलाच ‘रक्षाबंधन’ किंवा ‘राखी’ हा सण हिंदू धर्मीय धार्मिक विधीसह मोठ्या प्रेमाने व उत्साहात साजरा करतात. हिंदू धर्मीयांशिवाय शीख व जैन लोकही हा सण साजरा करतात.
‘रक्षा’ या संस्कृत शब्दाचा ‘रक्षण’ असा अर्थ असून ‘राखी’ हे त्या शब्दाचेच मराठी रूपांतर होय. अक्षता, मोहर्‍या व सोने एकत्र बांधून राखी तयार करतात. हळदीत भिजवलेला सुती दोरा राखीसाठी वापरला जातो. बहीण-भावामधले प्रेम-माया-आत्मीयतेचे बंधन अधिक दृढ होऊन दोघांनीही जन्मभर एकमेकांशी प्रेमाने वागून एकमेकांना साथ द्यावी, या उद्देशाने प्रत्येक बहीण भावाच्या उजव्या मनगटाला राखी बांधते. नात्याचे रेशीम-धागे अतूट राहावेत, ही त्या मागची भावना आहे.
स्नानानंतर देव, पितर, ऋषी यांना तर्पण करून दुपारी रक्षाबंधनाचा विधी करावा असे शास्त्र सांगते. रक्षाबंधनामुळे सर्व असुरांचा नाश होऊन संकटे दूर होतात. जय, सुख, आरोग्य, धन, यश इत्यादींची प्राप्ती होते अशी यामागची श्रद्धा आहे. आता ही प्रथा पूर्व-उत्तर भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून ती देशभर रूढ झाली आहे.
मूळच्या प्रथेनुसार राखी राजासाठी होती. राजपुरोहिताने ती राजाच्या उजव्या हातावर समंत्रक बांधावी असा नियम होता – ज्यामुळे ‘सामर्थ्यशाली बळी राजा बांधला गेला. त्याने तुला बांधले. हे रक्षे विचलित होऊ नकोस..’ अशा अर्थाचा मंत्र म्हटला जात होता.

राखी बांधण्याची प्रथा ‘आर्यन’ लोकांनी सुमारे ६ हजार वर्षांपूर्वी सुरू केली. इतिहासकाळापासून बहिणीने भावाला राखी बांधण्याची प्रथा आहे.
‘भविष्योत्तर’ पुराणांत भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला इंद्राची कथा सांगितली. त्यानुसार देवाधिदेव इंद्राचा उन्मत्त असुरांनी पराभव केला. इंद्र घरी परतल्यावर इंद्राणीने त्याच्या उजव्या हातावर राखी बांधली. तिच्या प्रभावामुळे इंद्राने असुरांची दाणादाण उडवून दिली. ‘राखीचा प्रभाव वर्षभर टिकणार असल्यामुळे तोपर्यंत वाट पहा’, असे शुक्राचार्यांनी असुरांना सांगितले. दर वर्षी राखी बांधणे म्हणजे राखीच्या त्या प्रभावाचे पुनरुज्जीवन करणे असा होता. म्हणून दर वर्षी राखी बांधण्याची प्रथा रूढ झाली.

चित्तोडची राणी कर्मवती हिने गुजरातचा सुलतान बहादूर शहा याच्यापासून चित्तोडचे रक्षण करण्यासाठी मदतीची अपेक्षा ठेवून बादशहा हुमायून यास भाऊ मानून राखी पाठवली होती. द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधून कौरवांपासून आपले रक्षण करण्याची विनवणी केली होती. अशी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी ‘रक्षा बंधन’ किंवा ‘राखी’ या सणाला आहे.
स्नान करून राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे आरती ओवाळून औक्षवाण करते. त्याच्या कपाळी कुंकवाचा टिळा लावते व त्याच्या उजव्या मनगटाला राखी बांधते. तसेच त्याला काहीतरी गोड-धोड खायला घालून त्याचे व सगळ्यांचे तोंड गोड करते. यावेळी बहीण आपल्या भावावरची संकटे दूर करण्याची ईश्‍वराला प्रार्थना करते. व भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देऊन तिला प्रेमाची भेट म्हणून काहीतरी वस्तू देतो. अशा प्रकारे बहीण-भावातील हे नाते या सणामुळे दरवर्षी अधिकाधिक दृढ आणि घट्ट होते.

कालमानानुसार रक्षाबंधनाचे स्वरूपही आज काहीसे पालटून गेले आहे. आपले भाऊ नसलेले स्नेही-मित्र यांनाही राखी बांधण्याची प्रथा रूढ होत असून पिवळा रेशमी किंवा सुती दोरा बांधण्याऐवजी, आकर्षित स्वरूपातल्या विविध रंगांच्या – आकारांच्या – चित्रांच्या महागड्या ‘राख्या’ बांधण्याकडे भगिनींचा कल वाढला आहे. ‘राखी’ हे पवित्र नात्याच्या अनुबंधाचे प्रतीक आहे. ती प्रतीकात्मक भावना अभिवृद्धीत करणे अधिक गरजेचे आहे.

राखी पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी पवित्रारोहण म्हणजे देवतांना ‘पोवती’ अर्पण करून नंतर स्त्री-पुरुष यांच्या हातांवर बांधण्याचा विधी असतो. ‘पोवते’ म्हणजे देवतेला वाहण्याचा (अर्पण करण्याचा) पवित्र दोरा होय. रक्षाबंधन हे या विधीचेच रूपांतर असण्याची शक्यता आहे.
श्रावणी पौर्णिमेला ‘श्रावणी’ वा उपकर्मा विधी केला जातो. ‘ब्राह्मण समाजातील पुरुष जुने यज्ञोपवीत बदलून नूतन यज्ञोपवीत विधिवत धारण करतात तर इतर समाजातील पुरुष मंडळी नारळी पौर्णिमेला त्या सणानिमित्त यज्ञोपवीत घालतात. यज्ञोपवीताला ‘जानवे’ असेही संबोधतात. नवा सुती धागा धारण करतात म्हणून या पौर्णिमेला ‘सुता पुनव’ असे संबोधले जाते. बहीण-भाऊ-आप्त यांच्यामध्ये स्नेहार्द्र – पवित्र – भावभावनांच्या रेशीम धाग्यांचे अनुबंध वृद्धीत करणारा ‘रक्षाबंधन’ हा सण नि समुद्राशी संबंधित व्यवसाय करणार्‍या मच्छीमारी व इतर व्यावसायिकांचा जलाची पूजा करून समुद्रास नारळ अर्पण करण्यामागची भावना अशा दोन सणांचा मिलाफ करणारी ‘श्रावणी पौर्णिमा’ सर्वांना फलदायी होवो!!