शौचालय नसलेल्यांना सरकार जैविक शौचालये पुरविणार

0
106

येत्या ३१ ऑगस्टपर्यंत गोवा हागणदारीमुक्त राज्य बनवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असून त्यासाठी ज्या लोकांना शौचालयाची सोय नाही त्यांना जैविक शौचालये पुरवण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

ज्यांना जैविक शौचालये हवी आहेत त्यांना आपल्या पंचायतीत अथवा नगरपालिकेत उपलब्ध असलेले अर्ज घेऊन ते भरून द्यावे लागतील. ३० जूनपर्यंत हे अर्ज उपलब्ध असतील. सर्वसामान्य गटातील लोकांना शौचालयासाठी ४५०० रु., ओबीसीतील लोकांना २५०० रु., तर अनुसूचित जाती व जमातीतील लोकांना १ हजार रु. मोजावे लागणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी या शौचालयांचे दर हे १० हजार व ५ हजार रु. एवढे होते. ही जैविक शौचालये पुरवण्यासाठीचे कंत्राट यापूर्वीच देण्यात आले आहे, अशी माहितीही सावंत यांनी दिली. पाच कंत्राटदारांना हे कंत्राट देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. घन कचरा महामंडळाने हे कंत्राट दिले असल्याचे ते म्हणाले.

ऍपआधारीत टॅक्सी
चालकांना संरक्षण
गोवा पर्यटन महामंडळाने सुरू केलेल्या ऍपधारीत टॅक्सी चालकांना पूर्ण संरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगभरात ऍपधारीत टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गोव्याला त्याबाबतीत मागे राहून चालणार नसल्याने आम्ही ज्या ज्या लोकांकडे टॅक्सी आहे त्यांना ऍपधारीत सेवेत सहभागी करून घेण्याचे ठरवले आहे.

सर्व टॅक्सी चालकांनी
गोवा माईल्समध्ये यावे
जे लोक ‘गोवा माईल्स’ या ऍपधारीत टॅक्सी सेवेत सहभागी झाले आहेत त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आता सर्व टॅक्सी चालकांनी या ऍपधारीत सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन सावंत यांनी केले.