… शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रहः|

0
201

– प्रा. रमेश सप्रे
भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही. कोणत्याही परिस्थितीत मानवाला आनंदाचा अनुभव येण्यासाठी शरीर-मन-बुद्धी यांची अवस्था कशी असली पाहिजे नि ती कशी प्राप्त करता येईल, याचं समुपदेशन भगवंतांनी प्रभावीरीत्या केलं आहे. आनंदाकडे जाण्याचे चार मुख्य मार्ग म्हणजे ज्ञान-कर्म-भक्ती व ध्यान! विशेष म्हणजे मार्ग भिन्न भासले तरी एक म्हणजे ते परस्पर पूरक आहेत, एकमेकांच्या मदतीनं ते आनंदाचा अनुभव निश्चित मिळवून देतात. याचाच अर्थ या सार्‍या मार्गांचं गंतव्य स्थान (शेवटचा मुक्काम-डेस्टिनेशन) एकच आहे.आचार्य विनोबांनी यासाठी एक मार्मिक उदाहरण दिलंय. सर्वांच्या अनुभवाचं. आपल्याला बर्फी माहीत आहे नि ती खाल्ल्याचा अनुभव प्रत्येकाला असतोच. बर्फी खाल्ली नसली तर केक खाण्याचा अनुभवही तसाच असतो.
बर्फीला जाडी – रुंदी – लांबी असते. एकदा एका अतिआज्ञाधारक मुलानं आपल्या वडलांना विचारलं, ‘बाबा या बर्फीची मी लांबी आधी खाऊ की रुंदी की जाडी? तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी खाईन’.
यावर बाबा हसत म्हणाले, ‘वेड्या तू फक्त लांबी किंवा रुंदी किंवा जाडी खाऊच शकणार नाहीस. कारण लांबी खाल्लीस तरी त्याबरोबर थोडी रुंदी नि जाडी येणारच. एक खाल्लं की दुसरे दोन येणारच.’ मुलगा विचार करू लागला. बाबांनी पुढे विचारलं, ‘एक सांग की बर्फी म्हणजे काय केवळ लांबी, रुंदी नि जाडी? तशी तर साबणाची वडी, मातीची वीट किंवा लाकडाची फळीही असते. लांब – रुंद नि जाड!’ मुलगा आणखी विचारात पडला व म्हणाला, ‘खरंच की!’ खरंच बर्फी म्हणजे या तिन्ही मिती (डायमेन्शन्स) मिळून बनलेली मिठाई. पण तिला याशिवाय रंग असतो, गंध (वेलची, केशर इ.चा) असतो नि मुख्य म्हणजे गोड चव असते. या सार्‍यांचा एकत्रित अनुभव म्हणजे बर्फी!
समजा लांबीला कर्म, रुंदीला ज्ञान नि जाडीला भक्ति समजलं तर बाकी रंग – गंध – स्वाद म्हणजे ध्यान म्हणावं लागेल. गंगा – यमुना – सरस्वतीचा त्रिवेणी संगम म्हणजे ध्यान नि या स्थानी वसलेलं पवित्र तीर्थक्षेत्र प्रयाग म्हणजे बर्फी खाण्याचा आनंदानुभव!
हे विस्तारानं सांगण्याचा उद्देश हा की गीतेत भगवंतांनी कर्म – ज्ञान – भक्ती – ध्यान या सर्वांचा संगम (समन्वय) जीवनाच्या प्रत्येक अनुभवात आला पाहिजे. तरच जीवन ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ असं आनंदमय बनून जाईल. भगवंतांनी मोठ्या कौशल्यानं या चारही मार्गांवरच्या साधकांची अत्युच्च पातळीवर, आदर्श अवस्थेत पोचल्यावर दिसून येणारी लक्षणं समानच असतात हे परिणामकारक रीतीनं सांगितलंय. यातच गीतेतील समुपदेशनाचा गाभा आहे, असे ज्ञानी माणसाची लक्षणं (अ.१३) सांगताना अनेक महत्त्वाची लक्षणं कर्ममार्गी, भक्तिमार्गी किंवा ध्यानमार्गी व्यक्तीसारखीच सांगितली आहेत. पुन्हा पुन्हा सांगण्याचा हेतू स्पष्ट आहे. सारे मार्ग सारखेच आहेत. ज्ञानमार्ग श्रेष्ठ नाही की भक्तिमार्ग कनिष्ठ नाही. एकात सारे येत असल्यामुळे ज्ञानी ही कर्म – भक्ती -ध्यान कमीजास्त प्रमाणात करतच असतो. त्यानं हे अधिक जाणीवपूर्वक करावं असा भगवंतांचा आग्रह आहे. म्हणून महत्त्वाच्या लक्षणांची पुनरावृत्ती गीता व इतर संतांच्या ग्रंथातही होते.
ज्ञानी व्यक्तीच्या अंगी कोणते गुण सहजपणे असले पाहिजेत हे सांगताना आरंभीच भगवंत म्हणतात-
‘‘अमानित्वं अदंभित्वं अहिंसा क्षांतिः आर्जवम्‌|
आचार्योपासनं शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रहः॥ १३.७
आता ‘शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रहः’ या ज्ञान्याच्या लक्षणांवर सहचिंतन करुया.
* शौचम् – आपण सोयर (सुयेर)- सुतक यांच्या संदर्भात ‘शौच – अशौच’ असे शब्द वापरतो. शौच म्हणजे शुद्धी, अशौच म्हणजे अशुद्धी. गंमत म्हणून – आपल्या शरीरातील मलमूत्रासारखी अशुद्ध द्रव्यं शोषून घेणार्‍या जागेला आपण ‘शौचालय’ म्हणतो. म्हणजे ते शुद्ध करणारी शुद्ध (पवित्र) जागा आहे. विचारांच्या पातळीवर तरी शौचालयाची स्वच्छता न राखता, तिथं पावित्र्य भावना न ठेवता केलेली देवालयातील पूजासुद्धा व्यर्थ आहे. सगळीकडे विष्णू आहे – सारं विष्णूचं निवासस्थान आहे (ईशावास्यं इदं सर्वम्…) ‘सर्वं खलु इदं ब्रह्म’ हे खर्‍या अर्थानं समजून त्याप्रमाणे व्यवहार – वर्तन करणं हेच खरं विष्णुसहस्रनाम किंवा गीता समजल्याचं लक्षण आहे. सुतककाळी देवाची नेहमीसारखी पूजा करायची नसली तरी मानसपूजा अवश्य करायची असते. ‘गरुडपुराणा’सारख्या ग्रंथांचं श्रवण करायचं असतं. याचा अर्थ कोणत्याही आत्मज्ञान-विज्ञानाच्या ग्रंथाचं शांत वाचन – मनन करायचं असतं. घरातलं वातावरण गंभीर असतं कारण कुणाचातरी मृत्यू झालेला असतो. मग गीतेतल्या दुसर्‍या, पंधराव्या किंवा कोणत्याही अध्यायाचं श्रवण – मनन (अध्ययन) अशौचकाळात करायचं असतं. देवघरातल्या पवित्र पोथ्या यासाठी जरी वापरल्या नाहीत तरी पुस्तक (ग्रंथ) रूपात असं वाचन करण्यानं जीवनमृत्यूचं स्वरूप कळून आपलं आयुष्य सुधारायला मदत होते. आपण हे सहज म्हणून पाहिलं.
भगवंताला ‘शौचम्’ म्हणून हे अभिप्रेत नाहीये. शौच म्हणजे शुचिता म्हणजेच शुद्धता – पवित्रता – स्वच्छता यांचा संयुक्त अनुभव. आपण राहतो त्या स्थानाची, मुख्य म्हणजे आपण अभ्यास, साधना करतो त्या स्थानाची शुचिता महत्त्वाची असते. आजच्या काळात सर्वांत महत्त्वाची आहे ‘साधनशुचिता’. म्हणजे पैसा, यश, उपभोग वाट्टेल त्या मार्गानं मिळवणं हा सामान्य आचार झालाय. भ्रष्टाचार झालाय. इथं आपण आग्रही असलं पाहिजे.
‘शौच’ या गुणाचे अनेक पैलू आहेत. थोडक्यात म्हणजे स्थान (स्थल) शुचिता, देहशुद्धी, वस्त्र, साधनसामग्री (पैसा) यांची शुद्धी व यातून निर्माण होणारी पवित्रभावना हे सारं मिळवण्याचं ज्ञान व प्रयत्न दोन्ही हवेत. कोणाकडूनही देणगी घेऊन (विशेष म्हणजे देणगी देणार्‍या धनिक मंडळीत शुद्ध मार्गानं बनलेले धनवान, श्रीमंत अपवादानंच असतात) बांधलेल्या मंदिरातून खर्‍या भक्तांऐवजी ढोंगी, दांभिक भक्तच निर्माण होतात नि शाळेसारख्या पवित्र संस्थेतून खरे, प्रामाणिक विद्यार्थी, आदर्श नागरिक, चांगला माणूस निर्माण होण्याची शक्यता कमी होते. उदाहरणार्थ- प्रामाणिकपणे, शुद्ध मार्गानं (जोडोनिया धन उत्तम व्यवहारे|) पैसा मिळवणार्‍या व्यक्तींनी दिलेल्या अल्प देणगीतून गोठ्यासारखी शाळेची वास्तू उभारून ज्ञानदानाचं पवित्र (शौचं) कार्य करत राहिलो तर एक दिवस त्यातून श्रीकृष्ण किंवा येशू ख्रिस्त यांच्यासारखे महामानव निर्माण होतील. उलट अपवित्र मार्गानं मिळवलेल्या देणग्यांतून भव्य शाळेची वास्तू उभारली व शिक्षणोपयोगी अनेक साधनांनी ती खच्च नि गच्च भरली (वेलइक्विप्ड, वेलफर्निश्ड) तरी त्या भव्य दिसणार्‍या संस्थांतून ऍपेंडिक्स काढताना रुग्णाचं मूत्रपिंड (किडनी) काढून विकणारे डॉक्टर तयार होण्याची शक्यता अधिक तसेच सिमेंट कॉंक्रीटमध्ये मातीची किंवा राखेची भेसळ करून पूल बांधणारे की कोसळवणारे इंजिनिअर्स घडतील, खोटे हिशेब तयार करणारे कारकून नि कामचुकार कर्मचारी निर्माण होतील. दुर्दैवानं आज हा अनुभव पदोपदी नि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपल्याला येऊ लागलाय. शौचाचा घटता प्रभाव नि वाढता अभाव हे याचं कारण आहे.
भगवंत आग्रहपूर्वक जीवनाला शुचितेचा पाया देण्याचं समुपदेशन करत आहेत.
** स्थैर्यम् – भगवंत अर्थातच आर्थिक स्थैर्य किंवा राजकीय स्थिरतेबद्दल बोलत नाहीयेत. तर मन – बुद्धीची नि त्यामुळे आपल्या दैनंदिन वर्तनात (जीवनात) दिसून येणारी स्थिरता महत्त्वाची आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणजे स्थिरबुद्धी व्यक्तीची लक्षणं, युद्धातही शांत वृत्तीनं लढणार्‍या युधिष्ठिराचा आदर्श समोर ठेवण्याची प्रेरणा अशा स्थैर्यातून मिळते. महाभारतातील ‘यक्षप्रश्‍न’ प्रसंग हा यक्षानं विचारलेल्या विविध विषयांवरील प्रश्‍नांना युधिष्ठिरांनी दिलेल्या अमर उत्तरांमुळे प्रसिद्ध आहे. ‘या प्रसंगी यक्ष विचारतो- ‘सुखी कोण?’ युधिष्ठिराचं उत्तर – ‘अप्रवासी’. ज्याला प्रवास करावा लागत नाही. म्हणजेच जो स्थिर असतो. कामासाठी, व्यवसायासाठी वणवण करावी लागत नाही.
‘अन्नासाठी दाही दिशा| आम्हा फिरविसी जगदीशा॥
अशी ज्याची अवस्था नसते. आपलं आजचं जीवन एका ठिकाणाहून दुसरीकडे जात राहतानाच संपून जातं. ‘सारे प्रवासी घडीचे’ हे जीवनाचं स्वरूप झालंय. सकाळी घरातून पक्ष्यांसारखं उडायचं… कामाच्या ठिकाणी यायचं… संध्याकाळी तिथून उडून घरात परतायचं.. सुटीच्या दिवशी ‘आऊटिंग’ … म्हणजे पुन्हा प्रवासच. यात फक्त शरीर फिरत नाही तर मन-बुद्धीही फिरत राहतात. स्थैर्य लाभतच नाही.
मनाला स्थैर्य लाभण्यासाठी व त्यातून आनंदाची प्राप्ती करण्यासाठी काही उपाय–
१. जीवनाला ध्येय हवं- स्वप्नपूर्ती, ध्येयप्राप्ती निश्चित असेल तर मन एकाग्र, स्थिर राहू शकतं. प्रतिभावंताची अप्रतिम कलाकृती; कलाकाराची अपूर्व निर्मिती; क्रीडापटूची अविस्मरणीय खेळी; वैज्ञानिकाचं अनोखं संशोधन; भक्ताचा अद्वैताचा (समाधीचा) अनुभव या सार्‍यांना एकचित्त होण्याची आवश्यकता असते, अन् हे ध्येय साध्य करताना त्यांचं मन स्थिर, एकात्म बनतं.
२. मनाचं भरकटणं – कमी करण्यासाठी नाम, ध्यान करायचं असतं. पण हे करताना मनात नको नको ते विचार येतात. यानं आपण दुःखी न होता मनातला कोपर्‍याकोपर्‍यातला केरकचरा एकत्र होऊन दूर होतोय असं समजायचं.
३. सर्वत्र ईश्‍वरदर्शनाचा अनुभव – सर्व काळी-स्थळी – व्यक्ती, प्राणी, वस्तू यांच्या सहवासात – सर्व क्रियांत व सर्व घटनाप्रसंगात परमेश्‍वरी अस्तित्वाचा (चैतन्याचा), सद्गुरूंच्या इच्छेचा अनुभव घेण्याचा अभ्यास केला तर चित्त विचलित होत नाही. स्तब्धस्थिरशांत राहतं.
४. विचारपद्धतीत बदल – सारं करताना, जगताना, अनुभवताना मी ‘देहाचा’ नाही तर ‘देवाचा (आत्म्याचा) आहे’ असं मानून व जाणून शांत राहायचं. निवांत जागेतील नंदादीपाच्या ज्योतीसारखं! शांत स्थिर निवांत!
५. भविष्यातील कल्पना (चिंता) व भूतकाळातील स्मृती – यापासून दूर राहण्याचा अभ्यास. वर्तमानात – म्हणजे चालू क्षणात म्हणजेच या (इदं) श्‍वासात एकाग्र होऊन जगण्याचा अभ्यास म्हणजे स्थिरचित्ताची हमी!
६. उरलेल्या कामांचं पुनःपुन्हा स्मरण टाळायचं. मन व्यथित होतं कारण झालेल्या कामांपेक्षा करावयाची कामं अधिक असतात. खरं तर न संपणारी असतात. म्हणून त्यांची ‘महत्त्वाची व तातडीची कामं’, ‘महत्त्वाची पण विलंबानं करावयाची कामं’… अशी वर्गवारी करून आरामात क्रमाक्रमानं काम उरकणं. मन स्थिर राहील.
७. दीर्घश्‍वसन – प्रत्येक कामाच्या आरंभी दीर्घश्‍वसन, स्वयंसूचन (ऑटो सजेशन), ध्यान, प्रार्थना केल्यास मन चंचल न राहता स्थिरावेल. आतून एक शक्ती, स्फूर्ती व आश्‍वासन मिळेल. हे करताना सर्वांविषयी कृतज्ञतेची भावना हवी.
८. शारीरिक पूर्वतयारी मानसिक स्थिरतेला उपकारक ठरते. समोर दृष्टी स्थिर – पापण्यांची जलद हालचाल (उघडझाप) – सावकाश डोळे बंद – चेहरा, शरीर (सारे स्नायू – मसल्स) शिथिल (रिलॅक्स्ड) – चेहर्‍यावर प्रसन्न हास्य – मनाला सहज स्थिर होण्याचा आदेश (सेल्फ कमांड) – हे सारं कमी वेळात मनाला स्थिर करतं.
९. एक मजेदार मंत्र – ‘अडंग-बडंग स्वाहा|’ असं म्हणत विचार, कल्पना यांची आहुती मनातल्या ज्वालासक्त अग्निकुंडात देत शांत व्हा. विचार (अडंग) – प्रतिविचार, उलट विचार, कुविचार (बडंग) सारे ‘स्वाऽहा’ म्हणत आतल्या अग्नीला अर्पण! विचित्र वाटेल पण सरावानं मन स्थिर होण्यास खूप मदत होते.
* आत्मविनिग्रहः – यापूर्वी अनेकदा आत्मसंयम, आत्मनियंत्रण याविषयी भगवंत अनेकदा बोललेत. अखेर हे सारं करून मिळवायचं काय? तर मनःप्रसाद!
‘‘मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीसी कारण ॥
एका सूत्रात भगवंत सांगतात- ‘‘उद्धरेदात्मानात्मानम् ॥