शैलीनुसारच खेळण्यास गोवा-चेन्नईन सज्ज

0
118
FC Goa players warming up before the match 85 of the Hero Indian Super League between FC Goa and ATK held at the Jawaharlal Nehru Stadium, Goa, India on the 28th February 2018 Photo by: Faheem Hussain / ISL / SPORTZPICS

हीरो इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नईन एफसी आणि एफसी गोवा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आणखी एक चुरशीचा सामना मंगळवारी होईल. दुसर्‍या उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्याच्या सामन्यात आपल्या शैलीनुसारच खेळण्यास हे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना होईल.
२०१५च्या अंतिम सामन्यात हे दोन संघ आमनेसामने आले होते. तेव्हापासून हे दोन्ही संघ नेहमीचे प्रतिस्पर्धी ठरलेले नाहीत. त्यांच्यातील सामने रंगतात. त्यावेळी चेन्नईने नाट्यमय प्रतिआक्रमण करीत विजेतेपद मिळविले. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी गोव्याला पुन्हा हरविण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.

गोव्यातील पहिल्या टप्यातील सामन्यात चेन्नईने १-१ अशी बरोबरी साधली. त्यावेळी चेन्नईने अवे गोल नोंदवित बहुमोल कामगिरी बजावली.
चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी म्हणाले की, त्या सामन्यातील निकाल आमच्या बाजूने लागण्याच्या योग्यतेचा खेळ आम्ही केला. आम्ही झुंजार खेळ करीत बरोबरी साधली, पण अवे गोलचा फायदा फार कमी असतो. मी त्याविषयी फार विचार करण्यात खूप वेळ दवडणार नाही. आम्ही क्लीन शिट राखली तर आगेकूच करू, पण गोव्याने गोल केला तर सारे समीकरण बदलेल. वेगवेगळ्या शक्यता घडू शकतात.

गोव्याला एकही गोल करू न देता क्लीन शीट राखण्यास चेन्नईचे प्राधान्य असेल असेही ग्रेगरी यांनी सांगितले. त्याचवेळी गोव्याने आमचा बचाव भेदला तर आम्ही पर्यायी डावपेच वापरू.
ग्रेगरी यांनी पुढे सांगितले की, आम्ही एकमेकांविरुद्ध काही वेळा खेळलो आहे. गोव्याचे कोणते खेळाडू धोकादायक आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही क्लीन शीट राखली तर आगेकूच करू. त्यास आमचे पहिले प्राधान्य असेल, पण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्ही तयार असू. अर्थातच पेनल्टी शूटआऊटपर्यंत निकाल लांबू शकतो.

चेन्नईचा बचाव भक्कम आहे. त्यामुळे प्रत्येकाच्यादृष्टिने गोवाचे पारडे जड असेलच असे नाही. चार जणांच्या बचाव फळीत तीन परदेशी खेळाडू खेळविणारा चेन्नई हा एकमेव संघ आहे. त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. फेरॅनो कोरोमीनास आणि मॅन्युएल लँझारोटे या जोडीला त्यांनी फारशी मोकळीक दिलेली नाही.
बरेच मार्किंग होऊनही लँझारोटेने पहिल्या टप्याच्या सामन्यात पहिला गोल केला. साखळीतील निकालही गोव्यासाठी जमेची बाजू असेल. तेव्हा पहिल्या ४५ मिनिटांत गोव्याने तीन गोलांचा धडाका लावला होता.

गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा म्हणाले की, आमची लढत खडतर संघाविरुद्ध असल्याची जाणीव आहे. चेन्नईत त्यांच्याविरुद्ध खेळलो तेव्हा दोन्ही सत्रांत त्यांचा खेळ वेगळा होता. मध्यंतरास आम्ही ३-० असे आघाडीवर होतो. दुसर्‍या सत्रात चेन्नईचा खेळ बदलला. त्यात त्यांनी दोन गोल केले. आम्ही आमचा नेहमीचाच खेळ करू, कारण त्यामुळेच आमची कामगिरी भक्कम झाली आहे.

गोव्यासाठी गोलरक्षक नवीन कुमार निलंबन संपल्यामुळे उपलब्ध असेल. त्यामुळे संघाची ताकद वाढली आहे. जमेदपूर एफसीविरुद्ध लाल कार्ड मिळण्यापूर्वी त्याने दोन सामन्यांत क्लीन-शीट राखली होती. त्याच सामन्यात जायबंदी झालेला मध्यरक्षक ह्युगो बौमौस हा सुद्धा परतला आहे. हे दोघे महत्त्वाच्या लढतीसाठी उपलब्ध असल्याची माहिती लॉबेरा यांनी दिली.

लॉबेरा यांनी पुढे सांगितले की, आम्ही नेहमीच्याच शैलीचा खेळ करू. आम्ही जिंकण्यासाठी खेळू. जमशेदपूरविरुद्ध केला तसाच खेळ आम्ही करू. तेव्हा केवळ बरोबरी पुरेशी असताना आम्ही जिंकण्यासाठी खेळलो होतो.