शैक्षणिक विकासासाठी शिक्षण निधी मंडळ

0
102

>> शिक्षण, आरोग्य व स्वच्छ भारत या कार्यक्रमांसाठी सहकार्याचे मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

शिक्षणाच्या विकासासाठी सरकार शिक्षण निधी मंडळ उभारणार असल्याचे शिक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत शिक्षण खात्यावरील मागण्यांना उत्तर देताना सांगितले. या मंडळाला १०० ते १५० कोटी रुपये एवढा निधी देण्यात येईल व तो सदर वर्षी खर्च करता आला नाही तर तो रद्द होणार नसून पुढील वर्षीही वापरता येईल, अशी तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण, आरोग्य व स्वच्छ भारत या कार्यक्रमांसाठी विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी पर्रीकर यांनी केले.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष भागशिक्षणाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मातृभाषा ही महत्वाची आहे. मातृभाषेमुळे ज्ञानग्रहण करणे सोपे होत असते, असेही पर्रीकर यांनी यावेळी नमूद केले. सरकारी शाळांची साधनसुविधा सुधारण्यासाठी गोवा साधनसुविधा विकास महामंडळात एक विशेष विभाग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शैक्षणिक माध्यमाचा उगीच बाऊ करण्याची गरज नसल्याचे पर्रीकर यावेळी म्हणाले. भाषा ऐकून शिकता येते असा दावा त्यांनी केला. मूल्याधिष्ठित शिक्षण सरकार सुरू करणार आहे. त्यात नागरी जीवन शिक्षणाचाही तसेच स्वच्छतेसंबंधीची माहिती देणार्‍या शिक्षणाचाही समावेश करण्यात येईल. अर्थविषयक शिक्षणही सुरू करण्याचा विचार आहे. आयआयटी व एमआयटीमुळे राज्यात उच्च शिक्षणाचा सुगंध सर्वदूर पसरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एनआयटीचे काम पुढील वर्षी सुरू होणार
पुढील वर्षी एनआयटीचे काम सुरू होईल. जमीन एनआयटीच्या ताब्यात पुढील तीन महिन्यात देणार आहे. विद्यार्थ्यांना करियर गाईडन्ससाठी विशेष सल्लागार देण्याची सोय करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विद्यालयात बालरथ पुरवणार्‍यांसाठी कदंबला आणखी १०० बसेस देणार. तसेच हे बालरथ चालवणारा ड्रायव्हर व कंडक्टरला जर स्वतःची बस विकत घेऊन ती चालवायची असेल तर त्यासाठी तो ज्या विद्यालयासाठी बस चालवील त्या विद्यालयाला अनुदान देण्यात येईल.
विशेष मुलांसाठी नवी योजना
विशेष मुलांसाठी तीन महिन्यांच्या आत एक नवी योजना सरकार तयार करील. ती सुरू झाल्यानंतर विशेष मुलांची चांगली सोय होणार असल्याचे ते म्हणाले.
कंत्राट पद्धतीवर तसेच अर्धे वेळ म्हणून काम करणार्‍या शिक्षकांना कसे कायम करता येईल याचा अभ्यास करण्यात येईल. पॅरा शिक्षक हे प्रशिक्षित नाहीत. जोपर्यंत ते प्रशिक्षण घेत नाहीत तोपर्यंत त्यांना सेवेत कायम करता येणार नसल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षणासाठी सर्वांना एकत्र
येण्याचे आवाहन
सरकारी शाळांत यंदा २ हजार मुलांची संख्या वाढल्याचे ते म्हणाले. मराठी व कोकणी शाळांत राज्यात सुमारे ३५ हजार मुले शिक्षण घेत असल्याचे ते म्हणाले. शिक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊ या. मुलांचा शिक्षणाचा पायाच जर कच्चा असेल तर तो विद्यार्थी पदवी शिक्षण घेतले तरी विशेष काही करू शकणार नसल्याचे ते म्हणाले. शिक्षण, आरोग्य व स्वच्छ भारत या तीन कार्यक्रमांसाठी विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.