शेवटचा संशोधक

0
256

आपल्या गोमंतकाला जशी मुक्तिपूर्व काळापासून साहित्यिकांची थोर परंपरा लाभली आहे, तशीच साहित्य संशोधकांचीही येथे अशीच उज्ज्वल परंपरा राहिली आहे. अ. का. प्रियोळकर, डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, लक्ष्मीकांत प्रभू भेंब्रे, पां. पु. शिरोडकर अशा या संशोधकांच्या मांदियाळीमध्ये चपखल बसणारे विद्वान गोमंतकीय संशोधक डॉ. विठ्ठल बाबू तथा वि. बा. प्रभुदेसाई यांचे काल पुण्यात निधन झाले आणि व्यासंगी संशोधनाची एक दीर्घ परंपरा खंडित झाली असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन अत्यंत गांभीर्याने त्याच्या सर्व बाजूंनी सखोल संशोधन करून विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्याची महती येणार्‍या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य उपरोल्लेखित संशोधकांनी केले, तसे करताना गोव्यात आज तरी कोणी दिसत नाही. अशा प्रकारचे मूलगामी संशोधन म्हणजे एक साधना असते. त्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो, परिश्रम घ्यावे लागतात, हाती येणार्‍या दुव्यांची चिकित्सा करावी लागते आणि नीरक्षीरविवेकानिशी त्याचे नवनीत पुढील पिढ्यांपर्यंत मांडावे लागते. डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी अखंडपणे ही संशोधन साधना केली. गोव्यापासून दूर नागपूर ही कर्मभूमी असूनही गोव्याच्या मुक्तिपूर्व इतिहासातील कालांतराने अपरिचित बनलेल्या साधनांना घासून पुसून पुढील पिढ्यांसाठी लखलखीतपणे समोर आणण्याचे जे कार्य वि.बां.नी केले त्याला खरोखर तोड नाही. विशेषतः पोर्तुगीज राजवटीत ख्रिस्ती मिशनर्‍यांनी एतद्देशीय भाषांमध्ये केलेल्या लेखनासंबंधीचे अत्यंत मूलगामी व मौलिक असे संशोधन करून काळाच्या उदरात गडप होत चाललेल्या एका अज्ञात भागावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांच्या आधी हे कार्य अर्थात प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी केले होतेच. आपल्या या गुरूंच्याच पावलांवर पाऊल टाकून वि.बां.नी ते कार्य पुढे नेले आणि त्यातून जेजुईट मिशनर्‍यांनी लिहिलेल्या विलापिका आणि ज्ञानोपदेश आपल्यासमोर येऊ शकला. ‘ख्रिस्ताच्या वधस्तंभारोहण प्रसंगीचे विलाप’, फादर मिंगेल द आल्मैदचा ‘वनवाळ्याचो मळो’, ‘सर्वेश्वराचा ज्ञानोपदेश’ अशा जेजुईटांच्या वाङ्‌मयकृतींची पाठचिकित्सा करून येथील पोर्तुगीजपूर्व भाषिक व वाङ्‌मयीन परंपरांचाही त्यांनी शोध घेतला.‘सतराव्या शतकातील गोमंतकी बोली’ हा त्यांचा प्रबंध तर वि.बां.च्या उत्तुंग प्रतिभेची प्रचीती देणारा बृहद्ग्रंथ आहे. सतराव्या शतकातील जेजुईटांच्या वाङ्‌मयाच्या आधारे या प्रदेशातील तत्कालीन बोली भाषा आणि तिच्या परंपरेचा मागोवा त्यांनी त्यात घेतला आहे. केवळ जेजुईट मिशनर्‍यांच्याच वाङ्‌मयाची ओळख त्यांनी घडविली असे नाही. गोमंतकातील उपलब्ध असलेला पहिला ज्ञात मराठी काव्यग्रंथ ज्याला मानले जाते, त्या कृष्णदास श्यामाच्या श्रीकृष्णचरित्रकथेला त्यांनी पाठचिकित्सेनिशी आपल्या समोर आणले हे केवढे मौलिक कार्य आहे! एकनाथांनी भागवतावर टीका लिहिण्यापूर्वी हा ग्रंथ गोमंतकात लिहिला गेला होता याहून गोव्याच्या समृद्ध वाङ्‌मयीन परंपरेचा दुसरा पुरावा काय हवा? ‘क्रिस्तपुराण’ लिहिण्याआधी फादर थॉमस स्टीफन्सने ह्या श्रीकृष्णचरित्रकथेचे लिप्यंतर करून घेतले होते हेही वि.बां.नी दाखवून दिले. कविनंदन विरचित उषाहरण कथा, विप्रविश्वनाथ विरचित अभीमन्ये वीवाव्हो आदींवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे. मूलभूत वाङ्‌मयीन संशोधनाचा हा वारसा त्यांना अर्थातच त्यांचे गुरू अ. का. प्रियोळकर यांच्याकडून प्राप्त झाला असेल यात काही संशय नाही. आपल्या या गुरूच्या जीवितकार्याची महतीही त्यांनी ‘अ. का. प्रियोळकर ः व्यक्ती आणि कार्य’ या ग्रंथातून पुढील पिढ्यांसमोर आणली आहे. वि.बां.नी प्रसंगपरत्वे लिहिलेले लेख व निबंध यांची तर गणतीच नाही. गोमंतकाच्या वाङ्‌मयीन इतिहासाचा पहिला खंड त्यांनी प्रा. रवींद्र घवी यांच्या सोबत संपादित करून येणार्‍या पिढ्यांना एक मौलिक संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिला आहे. मराठी भाषा आणि गोमंतकातील तिचे शतकानुशतकांचे ऐतिहासिक स्थान हा त्यांचा सदैव अभिमानाचा विषय राहिला. ‘गोमंतकाचा मराठी वारसा’, ‘मराठीची कैफियत’ या त्यांच्या ग्रंथांतून त्यांच्या या जाज्वल्य मराठी भाषाभिमानाचे प्रखर दर्शन घडते. त्यांचा हा मराठी भाषाभिमान वरवरचा व राजकीय हेतूंनी प्रेरित नव्हता. त्याला भाषिक, वाङ्‌मयीन संशोधनाचा भक्कम आधार होता. मराठी राजभाषेसाठी ते नेहमीच आग्रही राहिले.
‘‘स्वभाषाविकास म्हणजे अन्य भाषांचा दुस्वास नव्हे हे ध्यानी घेऊन केवळ मराठीच्याच नव्हे, तर कोकणीच्याही अभिवृद्धीच्या दृष्टीने मराठीला गोव्यात राजभाषेचा समान दर्जा देऊन या दोन भाषाभगिनींमध्ये एकात्मता निर्माण करणे’’ त्यांना अभिप्रेत होते. गोमंतकाची ‘सरस्वती’ म्हणजे वाङ्‌मयीन व्यवहाराची भाषा मराठीच आहे ही त्यांची दृढ श्रद्धा होती. नव्या पिढीकडून त्यांच्या अपेक्षा होत्या, परंतु दुर्दैवाने असे मूलगामी संशोधन करणारे शिष्योत्तम त्यांना लाभलेले दिसत नाहीत. गोमंतकाच्या साहित्य संशोधन परंपरेतील हा अखेरचा दुवा आता कायमचा निखळला आहे. मूलभूत संशोधनाचे एक उर्जस्वल पर्व संपले आहे.