शेवगा ः एक बहुपयोगी वृक्ष (मॉरिंगा ऑलिफेरा)

0
352

– वर्षा नाईक

आपण आपल्या अंगणात शेवग्याचे झाड लावून त्यातील पौष्टीक घटकांचा लाभ घेऊ शकतो. हे आकर्षक पदार्थ, ताज्या स्वरूपात तसेच पानांच्या किंवा शेंगांच्या रुपात कोणत्याही वयाच्या व्यक्तीने आणि कोणत्याही ऋतुमध्ये नियमितपणे सेवन करण्याची गरज आहे.

मॉरिंगा ऑलिफेरा म्हणजेच शेवगा किंवा सहजन (हिंदी) वृक्षाला आज वाढती लोकप्रियता मिळते आहे ज्यामुळे तिला ‘वृक्षांची राणी’ म्हणता येईल. गोवेकर याला राणी – म्हाशिंग म्हणतात याला कारण याच्या शेंगा आणि पानांच्या उपयुक्ततेमुळेच! या वृक्षाचा प्रत्येक भाग हा अत्यंत उपयोगी असून त्याचे सेवन केले जाते- जसे पाने आणि कोवळी फळे – अन्न म्हणून तर बिया, साल, फुलं आणि मुळी ही औषधांच्या रुपात सेवन केली जातात. हे वृक्ष जरी हिमालयाच्या पायथ्याशी जास्त प्रमाणात आढळत असली तरी कुठल्याही उष्णकटिबंधीय किंवा तत्सम परिसरात ती वाढतात. ही झाडे दुष्काळातही वेगाने वाढतात. याची पाने खतांसाठी वापरली जातात तर बिया पाणी शुद्ध करण्याकरिता. आज शेवगा हे भारतात आणि फिलिपाईनमध्ये सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणात आढळत असले तरी त्याची लागवड मोठ्या प्रमाणात एशिया, आफ्रिका, सेंट्रल अमेरिका आणि कॅरीबिअनमध्ये केली जाते.
वातावरणीय बिघाड किंवा कीडेपासून बचाव करण्यासाठी या वृक्षाकडे नैसर्गिक संरक्षक पद्धती आहे. याचे कारण यांच्याकडे रासायनिक संयुगे आहेत ज्यांना फायटोकेमिकल्स म्हणतात ज्यामध्ये अँटीऑक्सिडन्ट असतात आणि संरक्षक संयुगे असतात. जेव्हा आपण याचे सेवन करतो तेव्हा ही संयुगे आपलेसुद्धा विविध रोगांपासून संरक्षण करतात.

शेवग्याची पाने ही सर्वांत जास्त पौष्टीक असतात. एकदा लावली आणि वाळवली की त्यात ३० टक्के प्रथिने असतात- सगळी उपयुक्त अमिनो ऍसिड्‌स आणि भरपूर प्रमाणात व्हिटामिन्स आणि मिनरल्स (क्षार) असतात.
शेवग्याची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासून पाहिली तेव्हा असे आढळून आले की मधुमेह आणि हृदयविकाराच्या व्यवस्थापनामध्ये शेवगा फारच लाभदायक सिद्ध झाला आहे. शेवग्याच्या पानांमध्येही प्रदाहविरोधी गुणधर्म आढळून आले.
अनेक फायटोकेमिकल्स, विशेषतः वृक्षातील संरक्षक संयुगे हे किड्यांना मारण्यासाठी वापरली जातात जे साठवले जातात. जेव्हा पाने कुसकरली जातात किंवा किड्यांद्वारे चावली जातात तेव्हा एन्झायमॅटिक प्रक्रिया घडते ज्यामध्ये एक घटक सोडला जातो जो किटकांना प्रतिबंध करतो व जो चवीला कडू किंवा तेलकट असतो. हेच घटक आपल्या शरीरात प्रदाह प्रतिबंधक घटक म्हणून काम करतात.
आपण जेव्हा आजारी असतो किंवा जेव्हा आपल्याला कॅन्सर, मधुमेह किंवा स्थौल्य यांसारखे आजार असतात तेव्हा आपले शरीर जास्त प्रतिक्रिया देते आणि त्यामुळे जुनाट प्रदाह होतो. हा सततचा प्रदाह होत असल्यामुळे आपल्या शरीराचे संतुलन बिघडते व ते सतत लढण्याच्या पवित्र्यात असते. जेव्हा की तीव्र प्रदाहसुद्धा बरा होऊ शकतो त्यावेळी हा जुनाट प्रदाह हानिकारक सिद्ध होऊ शकतो कारण त्यावेळी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही जास्त क्रियाशील असते. प्रदाहामुळे साखर आणि विषारी घटकांच्या अयोग्य प्रमाणात प्रक्रिया होऊ शकतात. शेवग्याच्या वृक्षामधील फायटोकेमिकल्स हा प्रदाह कमी करू शकतात.

शेवग्यामधील जैवी घटकांना ‘आयसोथायोसायनेट्‌स’ म्हणतात आणि ते ब्रोकोली, पत्ताकोबी किंवा फुलकोबीमधील घटकांसारखीच चवीला असतात. ताजी पाने जेव्हा कुस्करली जातात, तेव्हा हे घटक सोडले जातात आणि त्यानंतर यांना वाळवून त्याची पावडर बनवली जाते जी मानवाच्या आरोग्याकरता फारच उपयोगी ठरलेली आहे.
संशोधनात्मक अभ्यासान्ती असे आढळून आले आहे की जुनाट प्रदाह कमी करण्यामध्ये, तसेच रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्टेरॉलची पातळी आणि आतड्यांमधील प्रदाह कमी करण्यात त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.
लोकांमधील स्वास्थ्याविषयीच्या जागरुकतेमुळे या बहुपयोगी वृक्षाला वाढती मागणी मिळते आहे. मागील पाच वर्षांत शेवगा – ही एक हिरवी भाजी म्हणून उदयाला आली असून याची हिरवी पावडर रूपात येणार्‍या उत्पादनाने सर्व जगातील बाजारात लोकप्रियता मिळवली आहे.

शेवग्याची पाने कशी एकत्र करून ठेवायची ते पाहू या…
ताजी शेवग्याची पाने ही सलाद, सूपमध्ये, अंड्यावर आणि कुठल्याही पदार्थास स्वाद आणण्यासाठी खूप चवदार आहेत. पण ताजी पाने ही फार लवकर खराब होतात त्यामुळे तोडल्यानंतर ती एक-दोन दिवसातच वापरता येतात. याची छोटी फळे सूपमध्ये वापरली जातात. ज्या लोकांकडे शेवग्याचा वृक्ष वाढवण्याची सोय किंवा जागा नाही अशांसाठी शेवग्याच्या वाळलेल्या पानांची पावडर हा एक सुयोग्य पर्याय होऊ शकतो. ही वाळलेली पावडर रबडी, लापशी, दही किंवा कोणत्याही पातळ पदार्थात टाकून शिजवू शकतो व जेवणामध्ये खाऊ शकतो.
जवळजवळ शेवग्याच्या पावडर स्वरुपात १५ प्रकारची उत्पादने आज सेंद्रीय प्रमाणपत्रासहित बाजारात मिळतात. आणखी नवीन उत्पादनेही येऊ घातलेली आहेत पण दर्जेदार उत्पादनेच वापरणे हितावह ठरेल. शिवाय त्या वृक्षाची लागवड करण्याची पद्धतही त्यातील पोषण मूल्यांना हानी पोहचवू शकते. चांगल्या दर्जाची पावडर तयार करण्यासाठी अजूनही संशोधन करण्याची गरज असली तरी आपण आपल्या अंगणात शेवग्याचे झाड लावून त्यातील पौष्टीक घटकांचा लाभ घेऊ शकतो. हे आकर्षक पदार्थ, ताज्या स्वरूपात तसेच पानांच्या किंवा शेंगांच्या रुपात कोणत्याही वयाच्या व्यक्तीने आणि कोणत्याही ऋतुमध्ये नियमितपणे सेवन करावयास हवे!!