शेती, माती आणि माणूस वाचवा!

0
142
प्रा. जयप्रभू कांबळे 
शहर महानगर झालेलं आणि गाव शहराकडे झुकलेले! माणसांची श्रीमंती मोबाईलवरच भरून राहिलेली. तो मनातल्या मनात म्हणाला जगण्यात ती कधी उतरणार? धुंदीची आणि भरधाव वेगाची ‘नशा’ घेऊन हा तिब्बल सीट काळ नेमका कुठे उधळतो आहे? ही कुजबूज नाही हा विनाश आहे….
एक बाई आहे. कसला तरी बायकांचा गट ती चालवते. या गटातल्या बायका लाखो रुपयांचे कर्ज तिला स्वत:च्या नावावर काढून देतात आणि स्वत:ही कर्ज घेतात. फायनान्सवाले त्यांना मदत करतात. दर आठवड्याला कर्जाचा हप्ता घ्यायला फायनान्सवाले येतात त्यावेळी तिच्या घरात सगळ्या गावातल्या बायका जमतात. तमाशाला गर्दी व्हावी तशी गर्दी तिच्या घरात होते. तो मनातल्या मनात म्हणाला. ‘‘गावात राहून दर आठवड्याला दोन-तीन हजारांचा हप्ता या बाया भरतात कशा?’’ तर त्याला कळले. गावात आता कामाची शिफ्ट चालू आहे, सकाळी आठ ते बारा आणि दुपारी एक ते सहा. डब्बल कमाई. डब्बल शिफ्ट. आठवड्याचा हप्ता भरलाच पाहिजे. तो चुकून चालणार नाही. गाव कर्जात, हप्त्यात, शिफ्ट करण्यात बुडालेलं.
दिवस उगवतात आणि काळोखात सामावतात. एका संध्याकाळच्या प्रहरी त्याला एका घरातून रडण्याचा आवाज येतो. तो विचारतो, ‘‘काय झाले?’’ गर्दीतून कुणीतरी कुजबुजतं, ‘‘शांताक्काची लेक पळून गेली. सकाळी तालुक्याला जातो म्हणून निघाली आणि अजूनपर्यंत घरी आलीच नाही. आताच तिचा कॉल आलेला ती त्याच्यासोबत सुरक्षित आहे आणि ते लग्न करणार आहेत.’’ शांताक्काच्या तोंडातून पोरीची धुलाई होत होती. पण तो मनातल्या मनात म्हणाला ‘‘पोरीला पळून जावून लग्न का करावसं वाटलं? आणि पोरीच्या हातात मोबाईल शांताक्कानेच दिला नव्हे. मोबाईल नसता तर ही भानगड झालीच नसती?’’ पुढे जावून तो थांबला. आणि परत एकदा मनातल्या मनात म्हणाला, ‘‘लेका तुझ्या का पोटात कळ उठली. तिला वाटलं ते तिनं केलं. अरे पण तिचं वय काय? इथे कोण कुणाचे वय पाहतो आणि तेवढा वेळ तरी कुणाला आहे. काळ ग्लोबल झालाय’’
    त्याच्या जगण्याची झाडाझडती होणार्‍या काळात शेती, माती आणि माणूस वाचला पाहिजे म्हणून तो साद घालत राहतो प्रत्येकवेळी. माणसाची स्वप्नवेल खुडणार्‍या काळाचा विक्राळ चेहरा पचवण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी यावे अशी मनोमनी प्रार्थना करतोे. तेवढ्यात दुबार पेरणी वाया गेली म्हणून गळ्याला फास लावून आत्महत्या केलेल्या माणसाची गोष्ट त्याला हैराण करते. ही गोष्ट जेव्हा सार्वत्रिक होते, तेव्हा आजूबाजूच्या वातावरणाचा मागोसा घेत काहीजण फास लावून स्वत:ला संपवलेल्या माणसाचे घर गाठतात. सांत्वनपर काहीतरी बोलतात म्हणे ते सारेजण. लेकीबाळींची काळजी घेतो म्हणतात. फास लावून घेतलेल्या माणसाच्या पोराला ‘पगारी’ आश्‍वासन देतात. पुन्हा मेलेल्या माणसाच्या स्मरणार्थ गावभर बियाणांचे वाटप करतात. तो मनातल्या मनात म्हणाला ‘‘यंदा आत्महत्येचं पीक जोमदार येणार वाटतं!’’
 झिंगू लागलेल्या कोंबडीच्या मानेसारखं मान टाकतं आहे गाव. एरव्ही कुणाच्याही घरात सहजपणे गर्दी करणारी माणसं आता माणूस मेल्यानंतरही ‘स्लो’ आवाजात टीव्ही लावतात. पुटपुटतात हळू आवाजात काहीतरी आणि पुन्हा शांतपणे बसून आनंद घेत राहतात सासू आणि सुनेचा! एवढी भयाण शांतता त्यांनी कशी बरी कमावली असेल? काळ पुढे सरकतो. पण खात्यापित्या घरातील माणसे मेल्यानंतरही सोडत नाहीत सहजपणे माणसाला. मेल्यानंतरही त्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ सारं काही स्क्रिनवर! आधुनिकीकरणाची नखे घेऊन वावरणारा हा काळ पाठवत राहतो, कुठल्यातरी साईटवरून शोकसंदेश आणि त्याच्याबरोबर इथे काहीतरी घरपोच मिळाल्याचे ‘शुभ’ समाधान. या अशा शुभवर्तमानाची त्याला सवय झालेली. सवयीचा परिणाम म्हणून तो म्हणाला ‘‘इथून पुढे माणसाला स्क्रिनवरच जाळा, म्हणजे त्याला ‘मोक्ष’ लवकर मिळेल!’’
            त्याच्या हातात मोबाईल आहे. त्याने फेसबुक उघडलेले आहे. हजारो माणसांचे चेहरे हिरव्या बल्बखाली शांतपणे पडलेले त्याला दिसतात. हे चेहरे काही ओळखीचे, काही अनोळखी. अनोळखीच जास्त. सगळे मित्र या यादीत सामावलेले. कुणीच कुणाशी बोलत नसलेले. तो म्हणाला एवढे असुरक्षित का वाटत असेल माणसाला? हिरव्या बल्बखाली पडलेल्या चेहर्‍यांचे तो बारकाईने निरीक्षण करतो. त्याला कळते, त्यातील काही चेहरे कुणाच्यातरी नावावर चिकटवलेले आहेत. काही देवांचे लावलेले आहेत. काही महापुरुषांचे आहेत. काही अभिनेते-अभिनेत्रींचे आहेत आणि काही तसेच कोरे करकरीत आहेत. तो मनातल्या मनात म्हणाला, ‘‘माणूस स्वत:च्या चेहर्‍यापासून का बरे लांब जात असावा? आणि स्वत:चा चेहरा लपवून किती दिवस अशी जगणार आहेत ही माणसे?’’
 हल्ली मुलं एकटी-एकटी राहतात. दिवसाउजेडी ती घरात येत नाहीत. तासन्‌तास बोलत असतात, तेही चोरून चोरून! आणि त्यांच्या मोबाईलवरचे नंबर..? तो मनातल्या मनात म्हणाला ‘‘या काळात तो संशोधनाचा विषय होऊ शकतो.’’ घरात इनमीन चार माणसे आणि मोबाईलही चार! त्यांचे मित्र आणि मैत्रीणीही वेगवेगळ्या. परतून मोबाईलचीही ‘डायरी,’ तो घेतानाच घातलेली. त्याच्यावरचा मालकी हक्क आणि त्याचा हक्कदार ठरलेला. त्यामुळे तो घरात कुणी हातात घ्यायच्या अगोदर ‘तो घेऊ का?’ किंवा ‘वापरू का?’ असे विचारण्याचा ‘मॅनर्स’ गावातही जोमदारपणे पोसू लागला असल्याने तो सहजपणे पाळला जात आहे. तो पाळतानाही त्याला माणसांचा, मातीचा वास लागणार नाही, याची कसोशीने काळजी घेतली जात आहे. या काळजीतही ‘सुरक्षितता’ प्रत्येकाच्या मनात घर करून उभी राहिली आहे. म्हणून मोबाईलला ‘पासवर्ड’ आणि प्रत्येक फोल्डरला देखील ‘पासवर्ड’!  पासवर्ड हीच माणसांची ओळख बनू पाहते आहे. या पासवर्डची सवय नसलेला तो म्हणाला, ‘‘असं काय सोनं साठवून ठेवलं आहे, अवतीभोवती कळत नाही.’’
शहर महानगर झालेलं आणि गाव शहराकडे झुकलेले! माणसांची श्रीमंती मोबाईलवरच भरून राहिलेली. तो मनातल्या मनात म्हणाला जगण्यात ती कधी उतरणार? धुंदीची आणि भरधाव वेगाची ‘नशा’ घेऊन हा तिब्बल सीट काळ नेमका कुठे उधळतो आहे? ही कुजबूज नाही हा विनाश आहे, हे सांगण्याचं धाडस जाणत्यांमध्ये का नाही राहीलं? जाणते ‘जाणते’ राहिले नाही आता?
पांचट विनोद आणि भानगडी अभंगांसारख्या आळवल्या जात आहेत. गावांचे बोळ आणि गल्ल्या यांना आता तोंडे फुटली आहेत. जी करताहेत बेकार तांड्यांचं मनोरंजन. हे बेकार तांडे मोठ्या हौसेने सामील होतात, गरब्यात, भजनात, सप्त्यात, उत्सवात! ताड्यांचा उत्सव, त्यांच्या वेदनांचा उत्सव! त्यांच्या लाचारीचा आणि लाळ गाळण्याचा उत्सव. उत्सवाचा पूर ओसंडून वाहत असतो. तो मनातल्या मनात म्हणाला ‘‘देशाला भवितव्य आहे तर!’’
 एक दिवस मध्यरात्री त्याला जाग आली. तो घरातून बाहेर पडला. त्या मध्यरात्रीलाही पोरांनी ‘पार’ पूर्ण भरलेला. कोणत्या संकटाचा घोर घेऊन जगताहेत ही पोरेे? त्यांचे लालभडक झालेले डोळे या काळ्याकुट्ट अंधारात कसली ‘स्वप्ने’ सर्च करताहेत, तीही एवढ्याशा धिटुकल्या उजेडात! त्याने तेथून पळ काढला. थोडा पुढे आला तर असाण्याच्या घरात कंदिलाचा ‘उजेड’ त्याला दिसला. पुस्तकात डोकं घालून बसलेली असाण्याची दोनं पोरं त्यानं पाहिली, तो मनातल्या मनात म्हणाला ‘‘ म्हणजे शिक्षणाने अजून मातेरं केलं नाही तर?’’
पिवळ्या जर्द धामिणीसारखा भात जोमाने भरलेला. मातीत रुजलेल्या भुईमुगाच्या शेंगा या काळातच वयात आलेल्या! सोयाबीनच्या अंगावरचा तपकिरी रंग यावेळी त्याला अधिकच स्मार्ट करतोय, टुमदार झालेल्या कणसातील दाणे घेऊन हा उनाड जोंधळा दिमाखात डोलतोय, असं स्वप्न तो कधीपासून पाहतोय! हे स्वप्न पाहताना कुणाची तरी दोनं बैलं एकाच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणू लागली आहेत, ‘‘मालक तुम्ही करू नका आत्महत्या, आपण मिळून राबूया!’’ तेवढाच काय तो दिलासा त्या चित्रातून त्याच्या अंगभर पसरत जातो. अशा वेळी रात्रं कात टाकते आणि दिवस जन्माला येतो. दव पडू लागणार्‍या या हंगामात काळ्या ढगांनी आभाळ गच्च भरलेलं. या काळ्या ढगांच्या नरड्याला कुणाचं तरी नख लागू दे आणि गरिबाचं स्वप्न सत्यात उतरू दे!