शेतकर्‍यांना अधिक प्रभावी योजना हव्यात

0
84
मांद्रे येथे भात कापणी व मळणी यंत्राच्या शुभारंभ प्रसंगी आमदार दयानंद सोपटे, पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे चेअरमन मिलिंद केरकर, सरपंच राजवी सावंत व कृषी अधिकारी प्रणीता देसाई व इतर.

पेडणे (न. प्र.)
शेतकरी शेतीद्वारे आपला उदरनिर्वाह चालवत असतात. विविध योजना कार्यरत असल्या तरी त्या योजना वाढवण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आगामी काळात आधुनिक यंत्रांची संख्या वाढवण्यासाठी आता शेतकर्‍यांनी शेतीची व्याप्ती वाढवून पडीक शेती ओलिताखाली आणावी, असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी केले. ते मांद्रे येथे पेडणे तालुका शेतकरी सोसायटीच्या मालकीच्या भात कापणी मळणी हार्वेस्टिंग यंत्राचा शुभारंभ करताना बोलत होते.
यावेळी पेडणे कृषी विभागाच्या अधिकारी प्रणिता देसाई, पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद केरकर, उपाध्यक्ष संतोष मलिक, संचालक शांभा सावंत, संचालक गजानन शेट कोरगावकर, कार्यकारी संचालक गोपाल सावंत, परब, आबा सावंत, माजी सरपंच नामदेव सावंत, शेतकरी उपस्थित होते. सुरुवातीला स्वागत, सूत्रसंचालन गजानन शेट कोरगावकर यांनी केले तर चेअरमन मिलिंद केरकर यांनी स्वागत केले. कृषी अधिकारी प्रणिता देसाई यांनी बोलताना भात कापणी मळणी यंत्र योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकर्‍यांनी आपापली कागदपत्रे शेतकरी सोसायटीकडे द्यावीत, ते दिल्यानंतर लगेच अनुदान देण्याची प्रक्रिया मार्गी लावता येते, असे सांगितले.
पेडणे तालुका शेतकरी सोसायटीचे चेअरमन मिलिंद केरकर यांनी बोलताना पेडणे तालुक्यातून पेडणे तालुका शेतकरी भात खरेदी करते पूर्ण तालुक्यातून ५०० टन भात खरेदी करीत असताना केवळ एकमेव मांद्रे गावातून २५० टन भात खरेदी करते. त्यावरून मांद्रे गावातून शेतकरी शेतीला किती प्राधान्य देतात हे लक्षात येते, असे सांगितले. सरपंच राजवी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष संतोष मलिक यांनी आभार मानले.