शॅक, प्रमुख इमारतींमधील अग्नी सुरक्षेचा आढावा घ्या

0
75

>> उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या काल (शुक्रवारी) घेण्यात आलेल्या बैठकीत उत्तर गोव्यातील समुद्र किनार्‍यांवरील सरकारी व खासगी जागेतील शॅक यांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत अग्नि सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

या बैठकीत सरकारी, खासगी इमारती, रेस्टॉरंट, हॉटेल, हॉस्पिटल, थिएटर, डिस्को आदी ठिकाणच्या अग्नि सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. अग्निशामक दलाने महत्वाच्या इमारतींमधील अग्निसुरक्षेचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. अग्नि सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन सक्तीचे करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे.

नगरपालिका, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांनी अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन करणार्‍या आस्थापनाना व्यवसाय सुरू करण्यास मान्यता द्यावी, ३१ मार्च २०१८ पर्यत अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणार्‍या आस्थापनांच्या परवान्यांचे नूतनीकरण करू नये, अशी सूचना बैठकीत करण्यात आली आहे. मुंबई येथे एका पबमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत राज्यातील अग्नि सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी नीला मोहनन तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील किनारी भागातील शॅक मालकांकडून अग्नि सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात नसल्याचे आढळून येत आहे. पर्यटन खात्याने समुद्र किनार्‍यावरील शॅकना अग्नि सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन सक्तीचे करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील घातक पदार्थाचा वापर करणार्‍या उद्योगांना सुरक्षेबाबत प्रात्यक्षिक घेण्यासाठी संबंधित खात्याशी संपर्क साधून सुरक्षेबाबत प्रात्यक्षिक करून घ्यावे, अशी सूचना बैठकीत करण्यात आली आहे.