शॅक्स वाटप प्रक्रियेस सोमवारपासून प्रारंभ

0
116

राज्यातील विविध किनार्‍यांवर पर्यटन मोसमाच्या प्रारंभीच शॅक्स उभारून व्यवसाय सुरू करता यावा यासाठी विनाविलंब व्यावसायिकांना शॅक्स देण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल स्पष्ट केले. शॅक्सची वाटणी करण्यासाठीची प्रक्रीया दि. ४ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार असून येत्या २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आजगावकर यानी नमूद केले.
२०१७-१८ या पर्यटन मोसमासाठी शॅक्स व्यावसायिकांना निश्‍चित वेळेत शॅक्सचे वितरण होईल याकडे पर्यटन खाते लक्ष देणार असून व्यावसायिकही शॅक्ससाठीचे आवश्यक परवाने व कागदपत्रे निश्‍चित वेळेत खात्याला सादर करतील याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी औपचारिकपणा पूर्ण करण्यास विलंब झाल्याने व्यवसायिकांना शॅक्सचे वितरण होण्यास विलंब झाला होता. परिणामी त्यांना नुकसान सोसावे लागले होते. मात्र, यंदा तसे होणार नाही याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे आजगावकर म्हणाले.
दरम्यान, व्यावसयिकांना शॅक्सची वाटणी करण्याचे काम येत्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय पर्यटन खात्याचे संचालक मिनिनो डिसोझा यांनी घेतल्याबद्दल त्यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.