शुभमनला संधी; राहुलला डच्चू

0
111

>> दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा याची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. विंडीज दौर्‍यात अपयशी ठरलेल्या लोकेश राहुल याची जागा तो घेणार आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने काल गुरुवारी टीम इंडियाची घोषणा केली. टी-ट्वेंटीसाठी दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर शुभमन गिल याच्यासाठी कसोटी संघाचे दार प्रथमच उघडण्यात आले आहे.

विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत लोकेश राहुल सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी रोहित शर्माला सलामीला संधी द्यावी, अशी मागणी केली होती.
खुद्द प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी या मागणीबद्दल सकारात्मकता दर्शवली होती. यानंतर अपेक्षेप्रमाणे भारतीय संघातून लोकेश राहुलला डच्चू देण्यात आला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. १० ऑक्टोबरपासून दुसरा सामना पुण्यात, तर १९ ऑक्टोबरपासून तिसरा सामना रांची येथे खेळवण्यात येणार आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे.

भारतीय कसोटी संघ ः विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा व शुभमन गिल.