शिवोलीचे प्रतिनिधित्व करणारे ऍड. चंद्रकांत चोडणकर

0
167
  • प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

 

कै. जयसिंगराव आबाजी राणे-सरदेसाई, ऍड. रमाकांत खलप, ऍड. दयानंद नार्वेकर या लोकप्रतिनिधींप्रमाणेच ज्यांची जन्मभूमी वेगळी असूनही, म्हापसानगरी कर्मभूमी असूनही इतर मतदारसंघांतून विधिमंडळात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आपण परिचय करून घेणार आहेत.

ऍड. चंद्रकांत उत्तम चोडणकर

गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळासाठी दि. ११ मार्च १९७२ रोजी झालेल्या तिसर्‍या विधिमंडळासाठी (१९७२-७७) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऍड. चंद्रकांत चोडणकर हे तत्कालीन मुख्यमंत्री व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली म.गो. पक्षाच्या उमेदवारीवर शिवोली मतदारसंघातून सर्वप्रथम निवडून आले. त्यांनी या निवडणुकीत आपले नजीकचे प्रतिस्पर्धी युनायटेड गोअन्स (सिक्वेरा गट) पक्षाचे उमेदवार ख्रि. डॉ. विल्फ्रेड डिसौझा (४७८९ मते) यांना पराभूत केले होते. ऍड. चंद्रकात चोडणकर यांना ५६३८ मते मिळाली होती.

इ.स. १९७२ च्या गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळ निवडणुकीमागे कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातील बंडखोर आमदारांच्या फुटीची पार्श्‍वभूमी होती. कै. कृष्णनाथ बाबूराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासह सात आमदारांनी कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केले होते. परंतु कै. भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्यावेळी युनायटेड गोअन्स पक्षाच्या पाच आमदारांचा पाठिंबा मिळवून आपले सरकार वाचवले होते. साधारणतः ऑगस्ट १९७० साली म.गो. पक्षातील बंडखोर आमदारांनी पाडलेल्या फुटीनंतर कै. कृष्णनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना करून दि. ११ मार्च १९७२ रोजी झालेली निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत या पक्षाला चौदा उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. परंतु कै. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखालील म.गो. पक्षाचे तेवीसपैकी अठरा उमेदवार निवडून आले. नवमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या चौदापैकी बारा उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. कै. भाऊसाहेब बांदोडकर यांची लोकप्रियता या निवडणुकीने दाखवून दिली होती. दि. २३ मार्च १९७२ रोजी भाऊसाहेबांचा तिसर्‍यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या निवडणुकीत बहुजन समाजातील एक होतकरू युवक- ऍड. चंद्रकांत चोडणकर हे म.गो.चे आमदार म्हणून विधिमंडळात दाखल झाले. दुर्दैवाने कै. भाऊसाहेब बांदोडकर यांचे दि. १२ ऑगस्ट १९७३ रोजी दुर्दैवी आणि आकस्मिक निधन झाले आणि गोमंतकीय समाजावर मोठा आघात झाला. लगेच त्यांच्या सुकन्या कै. शशिकलाताई यांना सर्वानुमते मुख्यमंत्री निवडून त्यांचा शपथविधी घडवून आणण्यात आला.

पुढे मग दि. १ जून १९७७ रोजी गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळासाठी झालेल्या चौथ्या निवडणुकीत कै. शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील म.गो. पक्षाच्या उमेदवारीवर शिवोली मतदारसंघातून ऍड. चंद्रकांत चोडणकर हे पुन्हा विधिमंडळ सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यांनी या निवडणुकीत आपले नजीकचे उमेदवार जनता पक्षाचे कै. पुनाजी आचरेकर, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे रमेश शाबी गोलतेकर यांना पराभूत केले होते. या विधिमंडळात ते अस्मादिकांचे सहकारी होते.

दुर्दैवाने कै. श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील म.गो. पक्षाचे सरकार आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करू शकले नाही. दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच हे सरकार कोसळले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे थिवीचे आमदार ऍड. दयानंद गणेश नार्वेकर व रिवण मतदारसंघाचे आमदार श्री. दिलखुश देसाई यांनी कै. शशिकलाताईंच्या नेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. दाबोळी मतदारसंघाचे म.गो. आमदार ऍड. शंकर लाड यांचा, तसेच सभापती असलेले दीवचे अपक्ष आमदार नारायण फुग्रो यांचाही म.गो. पक्षाच्या या फुटीर आमदारांना पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या बंडाला अधिक बळकटी मिळाली. अर्थसंकल्पीय मागण्यांना विरोधी कॉंग्रेस व जनता पक्षाच्या आमदारांनी आणलेल्या कपात सूचनेच्यावेळी म.गो.च्या या तिन्ही फुटीर आमदारांनी विरोधी पक्षाच्या आमदारांबरोबर कपात सूचनेच्या बाजूने मतदान करून कै. शशिकलाताईंचे सरकार पाडले. दि. २६ एप्रिल १९७९ रोजी कै. शशिकलाताईंनी आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. विरोधकांनी सत्तास्थापनेचा दावा केला असता तत्कालीन पंतप्रधान कै. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारने विरोधकांचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळून लावत गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

पुढे मग दि. ३ जानेवारी १९८० रोजी झालेली गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळाची पाचवी निवडणूक ऍड. चंद्रकांत चोडणकर यांनी शिवोली मतदारसंघातून म.गो. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून लढवली (५८४१) आणि आपले नजीकचे प्रतिस्पर्धी म.गो. पक्षाचे उमेदवार कै. लाडू बुधी साळगावकर (४०८४) यांना पराभूत करून पुन्हा निवडून आले.

परंतु दि. २७ डिसेंबर १९८४ रोजी झालेल्या सहाव्या गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळ निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवारीवर शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार श्री. अशोक तुकाराम नाईक साळगावकर (५९६७ मते) यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. या निवडणुकीत त्यांना ५२०१ मते मिळाली होती. त्यानंतर दि. २२ नोव्हेंबर १९८९ रोजी झालेल्या पहिल्या गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत पुन्हा म.गो. उमेदवार श्री. अशोक नाईक साळगावकर (६४३८ मते) यांच्याकडून शिवोली मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवारीवर ऍड. चंद्रकांत चोडणकर (६४२५ मते) यांना फक्त १३ मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. दि. १६ नोव्हेंबर १९९४ रोजी झालेल्या दुसर्‍या गोवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीवेळी ऍड. चंद्रकांत चोडणकर हे पुन्हा म.गो. पक्षाचे उमेदवार म्हणून शिवोली मतदारसंघात उभे होते. तत्पूर्वी मार्च १९९० मध्ये श्री. रवी नाईक म.गो. पक्षातून फुटून कॉंग्रेसवासी झाले होते आणि श्री. रवी नाईक यांच्याबरोबर श्री. अशोक नाईक साळगावकर हे म.गो. पक्षातून फुटून त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले होते. त्यामुळे ऍड. चंद्रकात चोडणकर यांना दुसर्‍या गोवा राज्य विधानसभेच्या निवडणुकीत म.गो. पक्षाने पुन्हा शिवोली मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

त्यानंतर दि. १६ नोव्हेंबर १९९४ रोजी झालेल्या दुसर्‍या गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत अस्मादिकांच्या नेतृत्वाखालील म.गो. पक्षाच्या उमेदवारीवर ऍड. चंद्रकांत चोडणकर पुन्हा शिवोली मतदारसंघातून ७३७३ मते मिळवून निवडून आले होते. त्यांनी आपले नजीकचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार श्री. अशोक तुकाराम नाईक साळगावकर (५३२७ मते) यांना पराभूत केले होते. परंतु या निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकले नाही, त्यामुळे त्यांनी म.गो. पक्षाचे आमदार कै. देऊ गुणाजी मांद्रेकर (धारगळ), डॉ. विल्फ्रेड मिस्किता (वास्को द गामा) व गोविंद उपाख्य जगदिश आचार्य यांच्यासह भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या कॉंग्रेस प्रवेशानंतर त्यांचा श्री. प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊन सुरुवातीला त्यांना समाजकल्याण खाते व नंतर सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले होते. परंतु अंदाजे साडेतीन वर्षानंतर दि. २९ जुलै १९९८ रोजी ख्रि. डॉ. विल्फ्रेड डिसौझा यांच्या नेतृत्वाखाली ऍड. दयानंद नार्वेकर, सुभाष शिरोडकर, डॉ. कार्मो पेगादो, ऍड. चंद्रकांत चोडणकर, कै. देऊ मांद्रेकर, श्रीमती फातिमा डिसा, पांडुरंग भटाळे, पांडू वासू नाईक, जगदिश आचार्य या दहाजणांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षापासून फारकत घेत ‘गोवा राजीव कॉंग्रेस’ हा पक्ष स्थापन केला.

विधिमंडळात घटनात्मक पदे भूषवित असतानाच ऍड. चंद्रकांत चोडणकर हे विधिमंडळ सदस्य म्हणून विधिमंडळाच्या विविध समित्यांवर कार्यरत होते.

१) कायदे प्रतिनिधी मंडळ समिती अध्यक्ष, २) हस्तभंग समिती अध्यक्ष, ३) विधिमंडळ नियमावली समिती सदस्य, ४) विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती सदस्य. ५) सार्वजनिक लेखा समिती अध्यक्ष, ६) पीठासीन मंडळ सदस्य.

ऍड. चंद्रकांत चोडणकर यांनी आपल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात अनेक पदे भूषविली आणि संस्थाही निर्माण केल्या.

१) सुरुवातीला ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते व कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते.

२) कै. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे गोवा विभागाचे सरचिटणीस व उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या या कार्यकाळात सार्वत्रिक निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यातील उमेदवार निवडण्यासाठी त्यांची नियुक्ती केली होती. सध्या ते कॉंग्रेसच्या कार्यकारी मंडळावर कायम सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शिवाय अस्मादिकांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गोवा शाखेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही कार्य करीत होते.

सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या.

अ) अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा खारवी समाज या संस्थेचे प्रवर्तक आणि अध्यक्ष म्हणून तीन वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी कार्य केले. प्रामुख्याने ही संस्था हिंदू मच्छीमार समाजासाठी कार्य करते. याशिवाय पारंपरिक मच्छीमारांच्या अखिल गोमंतक मच्छीमार संघाचे प्रमुख प्रवर्तक म्हणून व अध्यक्ष म्हणून ते आजवर कार्यरत तर आहेच, शिवाय गोमंतक मच्छीमार महासंघाचे ते दहा वर्षे संचालक होते. याच कार्यकाळात त्यांची इ.स. १९८० मध्ये इतर पन्नासपेक्षा जास्त राष्ट्रांच्या जपान-टोकियो येथे भरलेल्या मच्छीमार अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळात निवड करण्यात आली होती.

आ) सहउद्धार सहकारी पतसंस्थेचे प्रमुख पर्वतक व अध्यक्ष म्हणून संस्था स्थापनेपासून आजवर अध्यक्ष.

इ) बार्देस तालुका सहकारी गृह तारण संस्थेचे प्रवर्तक व गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ अध्यक्ष म्हणून आजवर कार्यरत.

ई) गोवा नागरी सहकारी बँकेचे पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून निवृत्त.