शिवसेनेकडून भाजपची गोची

0
78

युती टिकवण्याची आमची मनस्वी इच्छा : उध्दव
शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपसमोर काल नवा व शेवटचा प्रस्ताव दिला. मात्र या प्रस्तावामुळे सत्ता काबीज करण्यासह मुख्यमंत्रिपदासाठी आसुसलेल्या भाजपासमोरील पेच कायम असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेने आपल्यासाठी १५१ जागा ठेवून भाजपाला ११९ जागा देण्याच्या या नव्या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या १८ जागा कमी होणार आहेत. मात्र युती टिकवण्याचा फैसला शिवसेनेने भाजपवर सोपवला आहे.
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने भाजपने जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला दबावाखाली ठेवण्याचे डावपेच चालवले होते. शिवसेनेकडून अधिक जागा मिळवून मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या डावपेचही त्यात समावेश होता. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही त्याला संमती दिली होती. मात्र गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच या पक्षांच्या युतीत तलाव निर्माण झाला. युती तुटण्याचीही वृत्ते पसरली. उभय पक्षांकडून स्पष्ट वक्तव्य होत नसल्याने तर्क विर्तकांना पेव फुटले.
तथापि काल उध्दव ठाकरे यांनी रंग शारदा सभागृहात आतापर्यंतच्या चर्चेचा व प्रस्तावांचा तपशील सांगून चर्चांना विराम दिला. ते म्हणाले, ‘युती टिकविण्याची आमची मनस्वी इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही शेवटचा प्रयत्न करत आहोत’. या वक्तव्याबरोबरच त्यांनी भाजपसमोर जागावाटपाचा अखेरचा प्रस्ता ठेवला. शिवसेना १५१, भाजपा ११९ व मित्रपक्ष १८ असा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या १८ जागा कमी होणार असल्या तरी भाजपची एकही जागा कमी होणार नाही. मात्र १८ पैकी भाजपाला कोणत्या ९ जागा सोडायच्या हे ठरविण्याचा अधिकार उध्दव ठाकरे यांनी स्वत:जवळ ठेवल्यामुळे भाजपची गोची होणार आहे.
भाजपने प्रस्ताव फेटाळला
शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी जरी जागांसंदर्भात नवा प्रस्ताव ठेवून भाजपची गोची निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी भाजपने हा प्रस्ताव फेटळला आहेत. यामुळे हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोचला आहे. शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावात नवीन असे काहीच नाही असे सांगत भाजपने १४०: १३०: १८ असा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला आहे.
मुंबईत पदाधिकार्‍यांचा मेळावा घेऊन दिलेल्या इशार्‍याला भाजप नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ‘जागा वाटपाच्या प्रस्तावांची चर्चा टिव्हीवरून करणे अयोग्य आहे. युती टिकवण्याची जबाबदारी दोघांची आहे’ अशी प्रतिक्रिया भाजपनेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या प्रस्तावावर समाधानी नसल्याचे ते म्हणाले. तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे म्हणाले, ‘युतीमध्ये अंतिम वगैरे काही नसते. शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही यावर चर्चा करू’.