शिरोपरिषेक (शिरोधारा, धारा)

0
372
  • वैदू भरत म. नाईक
    (कोलगाव)

शिरोपरिषेक म्हणजे रुग्णाला उत्तानशयन अवस्थेमध्ये झोपवून औषधी द्रवांचे कपाल व शिरोभागी सिंचन करणे होय. म्हणजेच डोक्यावर औषधी द्रवांची धारा सोडणत. दोष दुष्य यांचा विचार करून स्नेह, तक्र, दुग्ध, क्वाथ, इक्षुरस आदी औषधी द्रवांची शिरोपरिषेकाकरिता योजना केली जाते.

उपयोगिता – ऊर्ध्वजत्रुगन विकारासाठी, मस्तिक विकारासाठी, सार्वदेहिक व्याधींकरिता शिरोधारा उपयोगी पडते. ही एक सोपी परंतु उपयुक्त व फलदायी चिकित्सा आहे. सदासर्वकाल करता येते. दुर्धर व दुर्जय व्याधींमध्ये मोलाची ठरते.
संभारसंग्रह – उपकरण, शराव, सुती दोरी, काष्ठकीलक, वर्तिका, धाराद्रव पात्रे, गॅस.
शराव (धारापात्र)
शराव हा शक्यतो मातीचा असावा, अभावी स्टेनलेस स्टीलचा असावा. त्याची क्षमता सुमारे २ लिटर इतकी असावी. आकृतीत दाखविल्याप्रमाणे गोलाकार व पसरट असावा. मातीचा शराव हा गुळगुळीत व मजबूत असावा. हा शराव मजबूत दोरीच्या साहाय्याने छतास किंवा स्टँडला टांगावा. शरावाच्या मध्यभागी कनिष्ठिका अंगुलीइतके एक छिद्र पाडावे. शरावामध्ये पक्क नारळाची एक करवंटी बरोबर मधोमध छिद्र पाडून पालथी ठेवावी.

या करवंटीवर एक ५ ते ६ सें.मी. लांबीचा काष्ठकीतक बसवून त्याला सुती दोर्‍यांची वळलेली एक १५ सें.मी. लांबाची वाती बसवावी. ती बसविण्यापूर्वी धारा द्रवामध्ये भिजवून बसवावी, ज्योयोगे धाराद्रव सहजतेने खाली पडू शकेल. रुग्णाच्या डोळ्यांमध्ये धाराद्रव जाऊ नये याकरिता रुग्णाच्या कपाळावर डोळे झाकले जातील अशा प्रकारे सुती कापडाची पट्टी बांधावी. शराव हा काठाशी दोर्‍या बांधून सावधपणे वर लटकावा. रोगी द्रोणीमध्ये उत्तनशयन स्थितीत झोपल्यानंतर सहजतेने त्याच्या कपाळावर सुमारे १५ सें.मी. वरून अखंड धारा पडेल अशा पद्धतीने त्याची स्थिती असावी. या स्थितीत शराव थोडा दोलायमान व्हावा. ४५ मिनिटे ते दीड तास असा क्रियाकालवधी असावा. तो क्रमवृद्ध करावा. ओळीने ८ दिवस ते १५ दिवसांपर्यंत ही क्रिया (प्रायः प्रतःकाली) करावी. पित्तयुक्त तसेच रुक्षतायुक्त बातप्रकोपामध्ये धारेचा कालावधी जास्तीत जास्त दोन तास इतका असावा. कफयुक्त, स्निग्ध गुणयुक्त वातप्रकोपामध्ये तो जास्तीत जास्त एक तास असावा.

शिराधारेसाठी पुरुष रुग्णाची तयारी करताना त्याचे केस बारीक करणे महत्त्वाचे आहे. केस बारीक असतील तर शिरोधारेचा उपयोग चांगला झालेला दिसतो. स्त्रियांसाठी दोषप्रकोपाचे शमन होते. अग्निमांध, अरुची, कर्णरोग यांमध्ये उपयोगी होतो.

स्त्रियांसाठी धारा करताना स्विमिंग कॅपचा वापर केल्यास तैलाचा अपव्यय टाळता येऊ शकतो. रुग्णाने पांढर्‍या रंगाचे स्वच्छ व सुती वस्त्र परिधान करावे व एकांतात राहावे.
यासाठी एखाद्या शांत निसर्गरस्य ठिकाणी वैद्याच्या देखरेखीखाली रुग्णालय प्रवेशित होणे आवश्यक आहे.

धारापतनाने स्वेद प्रादुर्भाव होऊ लागल्यास धारा करणे थांबवावे. काही वेळा धारा करीत असताना रुग्णांच्या मनोभावनांचा कल्लोळ झाल्याचे प्रत्ययास येते. हा मनोभावनांचा कल्लोळ इतका वाढतो की रुग्ण रडू लागतो. त्याला त्या रूदनाची कारणमीमांसा देत येत नाही असे आमच्या निदर्शनास आले आहे. मात्र असा अश्रुपात झाल्यानंतर रुग्णांच्या ‘मन’ इंद्रियाचेही विरेचन होते व रुग्णास बर्‍याच प्रमाणात मानसिकदृष्ट्या हलके व बरे वाटू लागते व रोगलक्षणेही कमी झालेली आढळून येतात. धारेची अतियोग लक्षणे निर्माण झाल्यास गंडूष व नश्याने शुद्धी संपादन करून शुंठी सिद्धजल रुग्णास द्यावे. सायंकाळी लघू व सुपाचा आहार द्यावा. कटुरसयुक्त सुप द्यावे. सैंधवयुक्त बस्तिप्रयोग करावा. पूर्वोक्त दोषांचा परिहार झाल्यानंतर पुन्हा धाराप्रयोग करावा.

धारा पश्‍चात कर्म – धारा झाल्यानंतर सिद्ध घृताबरोबर कटूरसांनी सिद्ध तक्र किंवा सुप रुग्णास द्यावे. यामुळे शेष दोषांचे शमन होण्यास मदत होते. त्यानंतर सात्विक, लघु, उष्ण असे अन्न अल्प प्रमाणात सेवन करावे.
रोज नवीन तेलाने कायसेक/धारा करणे उत्तम मानले जाते व त्वचारोगामध्ये असे करणे गरजेचे आहे. परंतु इतर रुग्णांची जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल, जर फारसे शरीरमल तेलात मिसळलेले नसतील तर एकदा वापरलेल्या तैलाचा ‘पात्रपाक’ करून वापरावे. यामध्ये पात्र गरम करून त्यात तेल ओतावे. वरचे शुद्ध तेल काढून घ्यावे व समान मात्रेत नवीन तेल मिसळावे व पुढील १ दिवस हेच तेल वापरावे. चौथ्या दिवशी नवीन तेल घ्यावे व वरील कृतिप्रमाणेच तेही ३ दिवस वापरावे. सातव्या दिवशी पहिले बदललेले तेल व नंतर दुसर्‍यांदा बदललेले तेल ही दोन्ही तेलं एकत्र करून वापरावीत. परंतु १-२ दिवसांनी नवीन तेल ही दोन्ही तेलं एकत्र करून वापरावीत. परंतु १-२ दिवसांनी नवीन तेल वापरणे हेच उत्तम होय. प्रत्येक रुग्णास नवीन तेल वेगळे वापरावे व ते वेगळे ठेवावे.

१. स्नेहधारा – वातप्रधान व्याधींमध्ये धारा करताना क्षीरबलादी तैल, दुग्ध सिद्धदुग्ध, सिद्धदुग्ध, बलादी औषधांनी सिद्ध स्नेह, केवल स्नेह किंवा क्वाथसहित स्नेह यांची योजना केली जाते.

धारेसाठी केवळ वातविकांरामध्ये चतुर्विध स्नेह (घृत, तैल, वसा, मज्जा) किंवा व्यवहारामध्ये श्ाुद्ध किंवा विविध औषधींनी घृताचा तसेच कफप्रधान व्याधींमध्ये कफध्न औषधीनी सिद्ध तिलतैलाचा उपयोग केला जातो. रक्त व पित्तसंबंधी व्याधींमध्ये तैल व घृत सममात्रेत मिसळून, तर कफधिक वातदोषामध्ये तैलाच्या मात्रेत घृत मिसळून धारा केली जाते.

धारेमुळे वाचा व मन स्थिर होतात. शरीराचे बल वाढते. धृतिधारणशक्ती वाढते. अरूची दूर होते. स्वरमाधुर्य वाढते, त्वचा कोमल होते, ‘तिमिर’ रोग नष्ट होतो. शुक्र, रक्त या धातूंचे पोषण होते. निद्रा गाढ लागते. आयुष्य वाढते. बला तैल, शतावरी तैल, यष्टिमधू तैल, चंदनबलालाक्षादी तैल ही तैलं व्यवहारात धारेसाठी वापरली जातात.

२. तक्रधारा – कफपित्तव्याधी, शिरोशूल, शिरोदाह, अनिद्रा, अतिस्वेद, हृदयरोग, मूच्छारोग, उन्माद, अपस्मार, दोष प्रकोप, मूत्ररोग, संधिशैथिल्य, मेह इ. व्याधींमध्ये ही केली जाते. सोरायासिस, रक्तप्रदर, रजोनिवृत्तीजन्य लक्षणे यांमध्ये या विविधचा विशेष उपयोग होताना दिसतो. तक्रधारेमध्ये दोषप्रकोपाचे शमन होते. अग्निमांध, अरुची, कर्णरोग यांमध्ये उपयोग होतो. केरळीय पंचकर्म चिकित्सेमध्ये धारा कर्माकरिता सहसा तक्राचाच उपयोग होताना दिसतो. यामुळे तिथे शिरोधाराबरोबर तक्रधारा असे समीकरण पडून गेले आहे. तक्र उष्ण असू नये. दोषांनुसार कफरोगांमध्ये मुस्ता पित्तरोगांमध्ये यष्टमधू अथवा आमलकी या द्रव्यांचा उपयोग तक्र सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा समजला जातो. याखेरीज चंदन वा उशीर ही द्रव्ये वापरली जातात.
आदल्या दिवशी गोदुग्धाचे दही लावावे व त्यामध्ये ही द्रव्ये क्काथ वा चूर्ण स्वरुपात मिश्र करावीत. दुसर्‍या दिवशी प्रातःकाली या दह्याचे तक्र करून त्याचा उपयोग धारेकरिता करावा.

तक्रधारा करण्यापूर्वी रुग्णाच्या शिरस्थानी स्नेहन करावे. सर्वांग स्नेहन केल्यास उत्तम. कायसेक झाल्यानंतर तक्रधारा करावी.
तैलद्रोणी- रुग्णाला उत्तानशयन अवस्थेमध्ये झोपण्याकरिता जे लाकडी पीठ वापरले जाते त्याला तैणद्रोणी असे म्हणतात. ही द्रोणी खैर, शाल, बेल, प्लक्ष, औदुंबर, वरुण, न्यग्रोध, देवदार, अग्निमंथ, अर्जुन, अशोक, आम्र असन, पंचक, निंब आदी वृक्षांच्या उत्तम कोष्ठापासून केली जाते. ती चारही बाजूंनी उपचारकांना उचलता यावी याकरिता तिला चार दांडे असतात. (११/२ ते २ फुटाचे) ही दोणी स्नेहन, कायसेक, शिरोधारा, षष्टिकाली, पिंडस्वेद, मुधर्र्सेक आदी कर्मांकरिता वापरण्यात येते. सर्वसाधरणपणे सात ते साडेसात फूट लांब, ३ फूट रुंद व ४ ते ६ इंच खोल असते. समतल दृढ व गुळगुळीत पृष्ठभागाची असते. शिराच्या बाजूने ३ ते ४ इंच उंचवटा असावा. जिथे रुग्णाचे शिर प्रत्यक्ष टेकले तिथे ती थोडीशी खोल असावी. डोक्याची बाजू व पायाची बाजू या दोन्ही बाजूंनी द्रव्य बाहेर जाऊ शकेल अशी रंध्रे असावीत.

३. शिर ः प्रदेशी पिचू धारण
कापसाचा बोळा किंवा गॉजचा तुकडा स्नेहद्रव्यामध्ये बुडवून तो शिरःप्रदेशी ठेवणे यास पिचू धारणा असे म्हणतात. हा पिचू ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी म्हणजे टाळूवर ठेवून त्यावर पट्टबंधन केले जाते. यामध्ये तैल वा स्नेहद्रव्य हे ब्रह्मरंध्राच्या सान्निध्यात रहात असल्याने मुर्धैतैलाचे गुण उत्तम रीतीने मिळतात. ही सोपी क्रिया रुग्णांना घरच्या घरीसुद्धा करता येते.

उपयोगिता
केसांचे आजार- खालित्य, पालित्स, दारुणक
मानसिक व्याधी – चिंता, क्रोध, भय, अनिद्रा, अतिविचार, उन्माद, अपमार
नेत्रविकार – नेत्रस्तंभ डोळे तळावणे, वारंवार डोळ्यांना जंतुसंसर्ग होणे
केसभूमिविकार- केशभूमी रुक्ष असणे, व्रण
इतर विकार – करचरणदाद, अर्दित
दिवसभरातील शारीरिक व मानसिक श्रमामुळे केस, शिर, मस्तिष्क व मज्जाधातू यांच्यामध्ये उष्ण, रुक्ष हे गुण वाढीस लागतात. ही उष्णता कमी करण्यासाठी पोटात घेतलेली औषधे अपेक्षित ठिकाणी पोहचवण्यास स्वाभाविकपणे वेळ लागतो. त्यापेक्षा ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी तेल वा घृताची पट्टी भिजवून पिचू धारण केल्याने त्वरित व प्रत्यक्ष कार्य होताना दिसते. याकरिता स्थिरचित्त ठेवून सकाळी व सायंकाळी निवांत वेळी हे पिचू धारण करावे. सुरुवातीस ५ ते १० मिनिटांनी पिचू बदलावा. असे ३ ते ४ पिचू बदलावे. एकूण कालावधी अर्धा तास असावा.

यातज व्याधीमध्ये या क्रियेचा उपयोग होतोच. परंतु पित्तदोषाच्या चय या प्राथमिक अवस्थेमध्ये या उपक्रमाचा अधिक फायदा होताना दिसतो. म्हणून या क्रियेला स्वस्थवृत्तामध्येही विशेष महत्त्व आहे.

गुदपिचू – अर्श, भगंदर, गुदशूल, गुददाह, गुदगत, रक्तस्राव, गुदभ्रंश, गुदाचा कर्करोग याकरिता उपयुक्त.
योनिपिचू- योनिरोग, योनिव्यापत्, योनिभ्रंश, मूत्रविकार, वंध्वत्व या विकारांसाठी योनिपिचूची योजना केली जाते.
४. शिरोबस्ती (शिरोतर्पण)
बसलेल्या स्थितीमध्ये रुग्णाने शिरःप्रदेशी तैल धारण करणे म्हणजेच ‘शिरोबस्ती’ होय.

निरुहादी बस्ती प्रकार वा शिरोबस्ती हे दोन्हीही पूर्ण वेगळे आहेत. शिरोबस्तीमध्ये केवळ स्नेहधारणाचे कार्य बाह्यतः अपेक्षित आहे, तर बस्तीमध्ये विविध औषधी गुदद्वारावाटे पक्वाशयात केल्या जातात. ‘शिरोबस्ती’ हा उत्तममांगाचे स्नेहक व तर्पण करतो.

उपयोगिता- शिरोबस्ती ही चिकिस्ता प्रामुख्याने वातरोगावर उपयुक्त आहे. शिरोरोग, मन्यास्तंभ, कर्णशूल, शिरोकंप, मास्तिष्क रोग, शिरस्थित बाह्यविकार जसे खालित्य, पालित्य, दारुणक, सर्वांग वातरोग, मानसरोग, पित्तजव्याधी आदी व्याधींमध्ये तसेच स्वस्थ व्यक्तीमध्ये निद्रा, बल, ओज, मानसिक स्वास्थ्य यांची वृद्धी होण्याकरिता शिरोबस्तीची योजना केली जाते.