शिरोड्यात कॉंग्रेसचे मगोबरोबर फिक्सिंग ः मुख्यमंत्री सावंत

0
76

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या गोव्यात सभा ः तयारी जोरात सुरू

शिरोड्यात कॉंग्रेसने मगोबरोबर फिक्सिंग केले आहे. त्यामुळे महादेव नाईक यांचा बळी जाणार असून भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांचाच विजय होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेवेळी सांगितले. यावेळी मांद्रे मतदारसंघाविषयी बोलताना ते म्हणाले की, काल (रविवारी) दिवसभर आपण मांद्रे मतदारसंघात होतो. तेथे कॉंग्रेस, मगोमध्ये प्रचंड घोळ असून तेथेही भाजपचा विजय निश्‍चित आहे.

लोकसभेसह पोटनिवडणुकाही
भाजपच जिंकणार
लोकसभेसाठीच्या दोन्ही आणि विधानसभेसाठीच्या तिन्ही जागा भाजपच जिंकणार असल्याचा दावा सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.
केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीलच सरकार सत्तेवर येईल, असा विश्‍वासही सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

… म्हणून चोडणकरांना
उत्तरेत कॉंग्रेसची उमेदवारी
भाजपचे दोन्ही उमेदवार श्रीपाद नाईक व नरेंद्र सावईकर यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्तरेत कॉंग्रेसकडे उमेदवारच नव्हता. त्यामुळे कॉंग्रेसने दक्षिणेतील नेता असलेल्या गिरीश चोडणकर यांना उमेदवारी दिल्याचे ते म्हणाले.

सार्दिन निष्क्रिय
भाजपचे दक्षिण गोव्यातील उमेदवार नरेंद्र सावईकर हे एक अत्यंक सक्रीय असे नेते असून मागच्या पाच वर्षांच्या काळात खासदार म्हणून त्यांनी चांगले कार्य केले असल्याचा दावा सावंत यांनी केला.
कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन हे एक अत्यंत निष्क्रिय असे नेते असल्याची टीका त्यांनी केली.

पोटनिवडणुकीतही भाजपच
विजयी होणार
म्हापसा, शिरोडा व मांद्रे या तिन्ही मतदारसंघांत भाजपचा विजय निश्‍चित असल्याचे सावंत म्हणाले. म्हापशात मगो पक्षाने आपला पाठिंबा कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना जाहीर केलेला असला तरी तेथे भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा हेच विजयी होणार असल्याचे सावंत म्हणाले.

प्रचारात पर्रीकरांची उणीव
निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपला मनोहर पर्रीकर यांची उणीव निश्‍चितच भासत आहे. मात्र, भाजपकडे पर्रीकर यांच्यासारखे वक्ते नाहीत अशातली मात्र गोष्ट नाही, असे सावंत यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले.

माविनसारखेही वक्ते आहेत
राज्यात भाजपकडे आपल्या भाषणांद्वारे लोकांची मने जिंकू शकतील असे वक्ते नाहीत असा अर्थ कुणी लावू नये. पक्षात मॉविन गुदिन्हो यांच्यासारखे वक्ते आहेत. आपण स्वतः चांगले बोलू शकतो, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोवा फॉरवर्ड प्रचारात सक्रीय
गोवा फॉरवर्ड हा घटक पक्ष भाजपच्या प्रचारात सक्रीयपणे भाग घेताना दिसत नसल्याचे पत्रकारांनी सावंत यांच्या नजरेत आणून दिले असता ते म्हणाले की गोवा फॉरवर्ड पक्षाने सक्रीयपणे आमच्या प्रचार कार्यात भाग घेतलेला आहे. त्याशिवाय अपक्ष आमदारही आमच्या प्रचारात सक्रीयपणे भाग घेत आहेत.

पंतप्रधानांची उद्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या १० एप्रिल रोजी ताळगाव पठारावरील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये जी जाहीर सभा होणार आहे त्या सभेसाठी प्रत्येक मतदारसंघातून पक्षाचे सुमारे एक ते दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. स्टेडियममध्ये आता आम्ही १५ हजार आसन व्यवस्था करणार असून स्टेडियमबाहेर शामियाना घालून तेथे आणखी १० हजारांची आसन व्यवस्था करणार आहोत. शामियान्यात स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. संध्या. ४ वा. सभा सुरू होणार आहे.
दरम्यान, भाजपचे उत्तर व दक्षिण गोव्यासाठीचे उमेदवार तसेच म्हापसा, मांद्रे व शिरोडा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांनी आपल्या प्रचाराची दुसरी फेरी जवळ-जवळ पूर्ण केलेली असून मोदी यांच्या जाहीर सभेनंतर त्यांची तिसरी फेरी सुरू होणार असल्याचे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.