शिरसईचे माजी सरपंच कांदोळकर अपघातात ठार

0
114

शिरसईचे माजी सरपंच प्रदीप अनंत कांदोळकर (४६, शिरसई बेलविस्ता) यांच्या स्कूटरला काल सकाळी ८ वाजता थिवी येथील मेजर बेकरी जवळ कर्नाटक राज्य परिवाहन महामंडळाच्या बसने धडक दिल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला.
प्रदीप कांदोळकर आपल्या आठ वर्षे वयाच्या मुलाला शाळेत पोचविण्यासाठी जीए ०३ एस ३७५१ या स्कूटरने म्हापशाकडे चालले होते. तर सकाळी ७.३० वाजता म्हापसा कदंब बस स्थानकावरून सुटलेली केए ४२ एफ १३६० ही बस बेळगावकडे चालली होती. ती थिवी येथील मेजर बेकरी जवळ पोहोचताच बसने स्कूटरला धडक दिल्याने स्कूटर चालक कांदोळकर उजवीकडे रस्त्यावर पडले, तर त्यांचा मुलगा डावीकडे फेकला गेला.
यावेळी कांदोळकर यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. मुलगा किरकोळ जखमी झाला. बस सुमारे २० मीटर अंतरावर थांबली. बस चालक मात्र यावेळी पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सदाशिव हन्सीकुट्टी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर त्याच दिवशी अत्यसंस्कार करण्यात आले. म्हापसा पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहन चालक सोमा लिगाप्पा रामाप्पा हुगंड रामडुगी (बेळगाव) याला अटक केली व बस ताब्यात घेतली आहे.