शिरवई – केपे येथे २० बेकायदा घरांवर बुलडोझर

0
102

>> कोमुनिदाद प्रशासनाच्या आदेशानुसार कारवाई

>> विनापरवाना बांधली होती घरे

केपे तालुक्यातील पेडामळ – शिरवई येथील कोमुनिदाद जागेत बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली २० घरे पोलीस बंदोबस्तात काल जमीनदोस्त करण्यात आली. कोमुनिदाद प्रशासनाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सकाळी ९.३० च्या दरम्यान सुरू झालेली कारवाई संध्याकाळी ४ वाजता संपली. कोणताच गोंधळ न होता ही कारवाई करण्यात आली.

पेडामळ, शिरवई येथील केपे भाग छोटा मोतीडोंगर म्हणून ओळखला जातो. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या घरे उभारण्यात आली आहेत. सुमारे १४६ घरे बेकायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यातील सर्व्हे क्रमांक ८८/१ व ९६/१ जागेतील रमीझा इस्माईल बेपारी, विजय कोलापूर, दोलाबी गोडेवाडे, रोझारीओ कार्दोझ, शिवाजी लामाणी, अलाबाकंश मुल्ला, शबीना बेगम, अमीना शेख, अजय सेन, महबूब शेख, ददापीर शेख, लिओ लुईस, कार्मिना कोस्ता, महमंद सब कलागीर, अस्लम शेख, अब्दुल लतीफ शेख, मुनीर बेपारी, अब्दुल रेहमान शेख, रामनाथ सातोसकर यांची घरे पाडण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

वरील घरे पाडण्यात येणार असल्याचे कळताच सकाळी लोकांची गर्दी जमली होती. मात्र, कोमुनिदाद प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार केपेचे मामलेदार प्रताप गांवकर व केपे उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई, केपे निरीक्षक मनोज माडोफेकर, काणकोणक निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई व कुडचडे निरीक्षक रवी देसाई यांच्यासमवेत सुमारे १०० पोलीस फौज तैनात होती. तसेच कोमुनिदाद प्रशासक परेश फळदेसाई, शिरवई कोमुनिदाद एटर्नी सुबोध शिरवईकर, वीज व पाणी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

२०१५-१६ साली बांधलेली ही घरे बेकायदेशीर असल्याचा अहवाल मामलेदार व उपजिल्हाधिकार्‍यांनी दिला होता. या कारवाईबाबत मामलेदार प्रताप गांवकर यांना विचारले असता कोमुनिदाद प्रशासनाच्या आदेशानुसार घरे पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दक्षता घेण्यात आली होती. कसलाच गोंधळ न होता शांततेत ही कारवाई करण्यात आली. ज्या घरांना वीज व पाणी जोडण्या नव्हत्या अशा घरांवर पहिल्यांदा कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.