शिरगाव जत्रोत्सवात आज लोटणार भक्तांचा महापूर

0
133

>> लईराईचा प्रसिद्ध जत्रोत्सव आजपासून

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव, डिचोली येथील सुप्रसिद्ध श्री देवी लईराईचा जत्रोत्सव आज दि. २० एप्रिल पासून सुरू होत असून तो पाच दिवस चालणार आहे. या उत्सवानिमित्त शिरगावला लाखो भाविक भक्त मंडळींचा महापूर येणार असून आगामी पाच दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असेल. दरम्यान, देवस्थान समितीने यंदाची जत्रा प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था केली असून देवस्थान समितीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सुविधांची सोय केली आहे. तमाम भाविकांनी शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष यदुवीर गावकर यांनी केले आहे. जत्रोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी देवस्थान समितीने सर्व सरकारी अधिकारी तसेच मये, अस्नोडा, शिरगाव पंचायतीच्या सरपंचांची संयुक्त बैठक घेऊन जय्यत तयारी केली आहे.

आज सकाळपासून भक्तांचा महापूर लोटणार असून सर्व भाविक धोंड मंडळी देवीच्या तळीत पवित्र स्नान करून देवीचे दर्शन घेतील. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे अस्नोडा ते शिरगाव हा रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलणार आहे. मोगरीच्या कळ्यांना प्रचंड मागणी असून हजारो महिला व पुरुष गोव्याच्या कानाकोपर्‍यांतून शिरगावात दाखल होणार आहेत. जत्रेनिमित्त भव्य फेरी भरलेली असून मिठाईसह विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. घरोघरी सजावट, कमानी उभारून भाविकांच्या स्वागतासाठी शिरगाव सज्ज झाले आहेत.