शिमगोत्सवाची वर्दी देणारा ‘इंत्रुज’

0
125

– राजेंद्र पां. केरकर

१७ ते २२ फेब्रुवारीपर्यंत संपन्न होणार्‍या डोंगरीतल्या इंत्रुजाच्या उत्सवाद्वारे पाच दिवस हा सारा परिसर नृत्य, गायन, वादनकलेच्या विविध पैलूंच्या उत्साहपूर्ण आविष्काराने भरून जातो. सुवारीवादनाने सुरू होणार्‍या या उत्सवाची गुलालोत्सवाने होणारी सांगता डोंगरीच्या संस्कृतप्रेमी कष्टकरी समाजाचा आपल्या निसर्ग आणि पर्यावरणाबरोबर मातीविषयीचा जिव्हाळा अभिव्यक्त करतो.

गोव्यातल्या शेताभाटात कष्टाच्या कामात वर्षाचा प्रदीर्घ काळ गुंतलेल्यांना शिगमोत्सव आगळ्यावेगळ्या विश्‍वात नेऊन, नव्याने काम करण्याची जणुकाही ऊर्जा देत असतो आणि त्यासाठी इथल्या बहुजन समाजाला शिगम्याच्या सादरीकरणाअभावी राहणे याची मुळी कल्पनाही करवत नाही. याच आत्मियतेपायी तिसवाडीतल्या मंडुर गावच्या डोंगरवासियांवरती शिगमोत्सवाचे सादरीकरण करण्यावरती बंदी आली तेव्हा त्यांनी इंत्रुज साजरा करण्याची परवानगी मिळवून शिगमोत्सवाचा आनंद लुटण्याचा एक महिन्याअगोदर प्रयत्न केला.
सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी जुलूम-जबरदस्तीने जुन्या काबिजादीतल्या जनतेला ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले. जे हिंदू धर्मात राहिले, त्यांच्यावरती लोकनृत्याचे सादरीकरण, लोकगीतांचे गायन आणि विधी, परंपरांचे पालन करण्यावरती बंदी घातली. त्यामुळे नवख्रिस्ती समाजाला त्यांच्या मूळ संस्कृतीपासून दुरावण्यासाठी असंख्य वेळा प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. परंतु ते बरेच महाकठीण ठरल्याने, नवख्रिस्तांना इंत्रुजद्वारे लोकोत्सवाचा अनुभव घेण्याची संधी प्राप्त झाली. ख्रिस्ती धर्मात येशुच्या महानिर्वाणाअगोदरचे चाळीस दिवस लेंट म्हणजे उपवासाचे मानले जातात. उपवासाच्या व्रताचा आरंभ करण्यापूर्वी तीन दिवस इथल्या स्थानिक ख्रिस्ती समाजाने लोकोत्सव साजरा केला, त्याला इंत्रुज म्हटले जाऊ लागले.
इंत्रुज हा मूळ शब्द पोर्तुगीज भाषेतल्या ‘एंत्रादु’ शब्दाद्वारे प्रचलित झाला. उपवासव्रतात प्रवेश करणे म्हणजे एंत्रादु. पारंपारिक मांडावर जाऊन लोकनृत्य, लोकगीतांचे सादरीकरण करणे, ढोल, ताशा, कासाळेचे वादन करणे या बाबींना इंत्रुजाच्या माध्यमातून व्यासपीठ लाभायचे. आज इंत्रुजाची परंपरा लोप पावत चालली असून त्याची जागा गोवा सरकारच्या ‘खाओ, पिओ, मजा करो’चा संदेश देणार्‍या कार्निव्हलने घेतलेली आहे. परंतु असे असताना मंडूरच्या डोंगरीतल्या विविध समाजांनी वडिलोपार्जित इंत्रुजाच्या लोकोत्सवाच्या परंपरेचे केवळ जतन केलेले नाही तर त्या परंपरेला गायन-वादन-नर्तन आदी कलागुणांची साथ देऊन ती अधिकाधिक उन्नत केलेली आहे. मानवी समाजाला लोकसंगीताने आदिम काळापासून भुरळ घातलेली आहे. पोर्तुगीजांनी इथल्या कष्टकरी समाजाला या लोकसंगीताच्या सुरावटींना पर्याय देण्यासाठी पाश्‍चिमात्य संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. परंतु असे असताना जुन्या काबिजादीतल्या, तिसवाडी तालुक्यातल्या लोककलाकारांनी ख्रिस्ती धर्म संस्कृतीने पवित्र मानलेल्या शुक्रवारी इंत्रुजोत्सवाचा प्रारंभ अवर लेडी ऑफ पिएदाद सायबिणीला नमन करून केला. परंतु इंत्रुज नावाखाली ज्या उत्सवाचे उत्स्फूर्तरीत्या सादरीकरण केले त्यात शिगमोत्सवाची लोकपरंपरा ठासून भरली होती. सांतेर, शांतादुर्गा यांना पर्याय देण्यासाठी ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांनी अवर लेडीची संकल्पना गोव्यात लोकप्रिय केली आणि त्यासाठी डोंगरीवासियांनी प्रारंभी अवर लेडी ऑफ पिएदादचे स्मरण करून षष्ठी शांतादुर्गेशी संबंधित शिगमोत्सवाचे पुनरुज्जीवन माघ महिन्यातल्या तिसर्‍या शुक्रवारी करून त्याची सांगता मंगळवारी केली. इंत्रुज मेळ, लालखी मिरवणूक आणि शेवटी गुलालोत्सवाने संपन्न होणार्‍या इंत्रुजातून विस्मृतीत जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शिगमोत्सवाला नवा उजाळा दिला. डोंगरीतल्या थोरले भाट आणि धाकटे भाट येथे असलेल्या पाच देवस्थानात सुवारीवादनाने इंत्रुजोत्वाचा शुभारंभ शुक्रवारी संध्याकाळी होतो. त्या रात्री डोंगरी परिसराला पारंपारिक लोकसंगीताच्या सुरावटीचा परीसस्पर्श करत सुवारीवादन आणि श्रींच्या नामघोषाने युक्त मिरवणूक गावातल्या कष्टकर्‍यांत चैतन्याची सनद जागृत करते. छत्र्या, गुढ्या, तोरणे, अबदागिरी हा लवाजमा शिगमोत्सवाचे खास आकर्षण अंत्रुज तालुक्यातल्या गावोगावी अनुभवायला मिळते. डोंगरीत याची प्रचिती मिळते ती इथल्या इंत्रुजोत्सवात. घुमट, समेळ आणि कासाळ्याच्या पार्श्‍वसंगीतावर सुवारीवादनाला प्रारंभ डोंगरीच्या षष्ठी शांतादुर्गेसमोर होतो. देवीच्या पालखीसमोर प्रतिकात्मक पेणे गायन आणि नर्तनाद्वारे सुवारीवादन मंदिराच्या परिसराला आपल्या सुरावटीशी एकरूप करते. घुमट, समेळ, कासाळे या वाद्यांबरोबर सुवारीत चंद्रावळ सादर करताना लहान आकाराचा डोबही वापरला जायचा.
चंद्रावळ प्रकाराच्या वादनाला प्रारंभ करताना कलाकार मूकवादनावरती भर देतात. मूकवादन चंद्रावळीचे सूर कानी पडले की घरातल्या व्यक्तींच्या पावलांना षष्ठी शांतादुर्गेच्या मंदिराकडे लगबगीने जाण्याची ओढ निर्माण व्हायची. मूक वादनाची सुरावट जरी एकसुरी असली तरी पुढे मंदिरात संपन्न होऊ घातलेल्या उत्सवाला अल्पावधीत प्रारंभ होणार असल्याची पूर्वसूचना त्यातून मिळते. विद्या, कला, ज्ञान यांची देवता गणपती आणि ग्रामदेवी षष्ठी शांतादुर्गेसमोर नतमस्तक होण्यासाठी सुवारी वादनात चंद्रावळीचे नियोजन केले असावे. चंद्रावळीतील चार कडवी म्हणून झाल्यावर चाल वाजवण्याची पद्धत आहे. चाल म्हणून झाल्यावर वेगवेगळी गीते सादर केली जायची आणि फाग गायनाद्वारे सुवारीवादनातले शिखर गाठले जायचे. फाग गायिल्यानंतर देवाची पालखी एका जागेवरून दुसर्‍या जागी नेत असताना खाणपदाचे गायन केले जायचे.
‘देवाला आनंद झाला हो… षष्ठीमायेचा उत्सव झाला हो…’
अशा शब्दांद्वारे देवाच्या पालखीची मिरवणूक गावात फिरून झाल्यावर मंदिराची परती वाट धरायची. गोव्यात अंत्रुज महालात सुवारीवादनाची समृद्ध परंपरा असून तिसवाडीत प्रतिकूल स्थिती असतानाही इथळ्या लोकमानसाने तिचे जतन, संवर्धन केले. घुमट हे चर्मवाद्य घोरपडीच्या कातडीने मढवलेले, समेळ बकर्‍याच्या कातडीने तर छोटा डोम बैलाच्या कातडीने मढवलेला असतो. या तिन्ही चर्मवाद्यांना तीन वेगवेगळ्या प्राण्यांच्या कातडीने मढवलेली असताना त्यांची सुरावट कांसाळ्याच्या साथीत सुवारीवादनाच्या परंपरेला आगळीवेगळी उंची मिळवून देते. सुवारीवादन ही डोंगरीच्या इंत्रुजाची शान असून त्याद्वारे इथल्या भूमीपुत्रांचे लोकसंगीतावरचे अमाप प्रेम आणि श्रद्धा यांचे मनोज्ञ दर्शन या उत्सवावेळी होते.
आज डोंगरीतली तरुणाई उच्च विद्याविभूषित होत असली तरी आपल्या संस्कृतीचे प्रेम त्यांच्या नसानसात भिनलेले असल्याने त्यांनी सुवारीवादनाची परंपरा जतन आणि उन्नत करण्यात अभिरुची बाळगलेली आहे. गोव्यात अन्य ठिकाणी असलेले साखळ्यो देवचाराचे प्रस्थ डोंगरीतही आहे. साखळ्योच्या जागेत इंत्रुजाचा मंडप उभारलेला असून, जेव्हा इथे फुलांनी अलंकृत केलेल्या पाच छत्र्या एका रांगेत ठेवून अवसराच्या साथीत गुलालोत्सवाला प्रारंभ होतो तेव्हा रंगांच्या बरसातीत इथले आबालवृद्ध एकरूप होतात. गुलालोत्सवाने इंत्रुजाची सांगता होते.
डोंगरीच्या इंत्रुजाच्या माध्यमातून इथल्या हिंदू आणि ख्रिस्ती समाजातल्या एकोप्याचे दर्शन पूर्वापार घडत आलेले आहे. गोवामुक्तीनंतर ही भूमी लोकशाही भारतीय राष्ट्राचा अविभाज्य घटक बनल्याने शतकांनंतर धार्मिक स्वातंत्र्य डोंगरीवासियांना लाभले. त्यामुळे अवर लेडी सायबिणीला नमन करून सुरू होणार्‍या इंत्रुजोत्सवाच्या पूर्वापार परंपरेत मुळी खंड पडलेला नाही. शुक्रवारी इंत्रुज सुरू झाल्यानंतर रविवारी अवर लेडीचे फेस्त संपन्न होते. हिंदू मंदिराचे परिसर नाटकांनी तर ख्रिस्ती समाज तियात्रांत रममाण होतो. परंतु आपण पूर्वाश्रमी एकाच मातीतले आणि संस्कृतीचे वारसदार याचे भान त्यांना असल्याने आज या गावाने आपल्या जुन्या परंपरांचे जतन आजतागायत करताना प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष केलेला आहे. दर तीन वर्षांनी अवर लेडीची मिरवणूक फेस्तावेळी डोंगरीभर फिरते. आज धार्मिक भिन्नतेची छाया तीव्र होत असताना डोंगरीवासियांनी आपल्या पूर्वजांनी ख्रिस्ती परंपरेतले नाव घेऊन साजरा केलेल्.या इंत्रुज उत्सवाद्वारे या मातीतून कधीकाळी जन्माला आलेल्या शिगम्यालाच संजीवनी दिल्याचा प्रत्यय इंत्रुजातले सुवारीवादन. इंत्रुजाचे पारंपरिक मेळ, देवाची लालखीची मिरवणूक या सार्‍यातून मंडुरातल्या सांस्कृतिक वैभवाच्या वैविध्यपूर्ण पैलूंचे दर्शन घडते. भूमातेच्या रुपालाच इथल्या कष्टकरी समाजाने षष्ठी शांतादुर्गा आणि ख्रिस्ती समाजाने अवर लेडी म्हणून पूजलेले आहे., एकाच दैवत संकल्पनेची दोन भिन्न नावे आणि भिन्न स्वरूपे., परंतु त्यांच्या ठायी वास करणारे तत्त्व मात्र एकच.
१७ ते २२ फेब्रुवारीपर्यंत संपन्न होणार्‍या डोंगरीतल्या इंत्रुजाच्या उत्सवाद्वारे पाच दिवस हा सारा परिसर नृत्य, गायन, वादनकलेच्या विविध पैलूंच्या उत्साहपूर्ण आविष्काराने भरून जातो. सुवारीवादनाने सुरू होणार्‍या या उत्सवाची गुलालोत्सवाने होणारी सांगता डोंगरीच्या संस्कृतप्रेमी कष्टकरी समाजाचा आपल्या निसर्ग आणि पर्यावरणाबरोबर मातीविषयीचा जिव्हाळा अभिव्यक्त करतो.